श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय ८

बुधवार, 9 डिसेंबर 2020 (17:05 IST)
॥ श्रीगणेशाय नमः ॥
 
हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना ।
हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥
 
तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान ।
परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥
 
तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं । गीर्वाण भाषेभीतरीं ।
त्यांचें सांग करुं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥
 
गीर्वाणाचा नसे गंध । त्यांतून माझी मती मंद ।
कमलांतील मकरंद । बेडुकाला मिळतो कसा ? ॥४॥
 
अन्नदानें तुझी प्राप्ति । जरी करुन घेऊं श्रीपती ।
तरी धनाचा अभाव निश्चिती । दारिद्रय पदरीं बांधिलें त्वां ॥५॥
 
जरी करुं मी तीर्थयात्रा । तरी सामर्थ्य नाहीं गात्रां ।
तशांतही अंधत्व आतां । आलें आहे दृष्टीतें ॥६॥
 
ऐसा सर्व बाजूंनीं । मी हीनदीन चक्रपाणी ।
दारिद्रयाचे मनीच्या मनीं । जाती जिरोनी मनोरथ ॥७॥
 
हें व्यावहारिक दृष्टया खरें जरी । परी तुझी कृपा झाल्यावरी ।
स्वानंदाच्या सागरीं । पोहत राहे अहोरात्र ॥८॥
 
तुझ्या कृपेचें महिमान । आगळें आहे सर्वांहून ।
घनाच्या पाण्यालागून । दाम देण्याची गरज नसे ॥९॥
 
मेघांनीं आणिल्या मनांत । तळीं विहिरी भरतात ।
निवळ खडकास फुटतात । पाट पाण्याचे पांडुरंगा ! ॥१०॥
 
ऐशा त्या तव कृपेचा । दासगणू हा भुकेला साचा ।
घास एखादा तरी त्याचा । घाल माझ्या मुखांत ॥११॥
 
तेणें मी तृप्त होईन । अवघ्या सुखातें पावेन ।
अमृताचा लाभतां कण । रोग सारे दूर होती ॥१२॥
 
असो मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं ।
मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बसली हें ऐकिलें ॥१३॥
 
जेथ जेथ ही नादे दुफळी । तेथ तेथ ही करी होळी ।
अवघ्या सुखाची रांगोळी । इच्या पायीं होतसे ॥१४॥
 
क्षयरोग तो शरीराला । वा दुफळी रोग समाजाला ।
नेतसे यमसदनाला । प्रयत्‍न पडती लुळे तेथ ॥१५॥
 
असो तळ्याचिया कांठावर । देशमुखांचा एक महार ।
करुं लागला चरचर । या खंडूपाटलापुढें ॥१६॥
 
पाटील गांवीचा अधिकारी । पाटील गांवीची पांढरी ।
कांहीं कामावरुन खरी । कुरबुर झाली उभयतांत ॥१७॥
 
तो असे मर्‍या महार । देशमुखांचा ज्याला जोर ।
तो बोलला उणें उत्तर । खंडू पाटलाकारणें ॥१८॥
 
पाटील वदला त्यावरी । तुझी रीत ही नाहीं बरी ।
गरीबानें पायरी । आपली कधीं सोडूं नये ॥१९॥
 
उणीं उत्तरें बोलण्याचा । अधिकार आहे देशमुखाचा ।
तुझ्यासारख्या नकटयाचा । नाहीं हें आण मनीं ॥२०॥
 
तरी महार ऐकेना । करुं लागला चेष्टा नाना ।
त्याच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥२१॥
 
बाचाबाचीचें कारण । होतें अति क्षुल्लक जाण ।
कागद ठाण्यालागून । पाठवणें होते पाटलाला ॥२२॥
 
तो टप्पा न्यावयासी । सांगितलें होतें महारासी ।
कीं तूं असाच जा अकोल्यासी । तहशिलींत टप्पा द्याया हा ॥२३॥
 
तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नेणार ।
देशमुखाच्या आश्रितावर । तुमचा डोळा हमेशा ॥२४॥
 
कांहीं असो आज दिनीं । मी टप्पा न जाय घेवोनी ।
तुझ्या हुकुमालागुनी । बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥२५॥
 
ऐसें वदनीं बोलला । हावभावही तैसा केला ।
मूठ वळुनी हात नेला । त्यानें आपल्या मुखापुढें ॥२६॥
 
ती त्याची पाहूनि कृती । खंडू पाटील कोपला चित्तीं ।
भरीव वेळूची काठी होती । पाटलाच्या हातांत ॥२७॥
 
त्याच काठीचा केला प्रहार । महाराचिया हातावर ।
पाटील मूळचा जोरदार । त्यानें रागें केला प्रहार हा ॥२८॥
 
त्या प्रहारें करुनी । हात गेला मोडूनी ।
महार बेशुद्ध होवोनी । पडता झाला भूमीवर ॥२९॥
 
पाटील दुसर्‍या महाराला । गेले टप्पा द्यावयाला ।
तों इकडे वृत्तान्त कैसा झाला । तो आतां सांगतों ॥३०॥
 
तो महार त्याच्या आप्तांनीं । नेला उचलून देशमुखसदनीं ।
मोडला हात हें पाहूनि । देशमुख ते संतोषले ॥३१॥
 
वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणां कुरापत काढण्या भली ।
ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥३२॥
 
त्यांनीं त्या महारासी । तात्काळ नेलें कचेरीसी ।
समाजविलें अधिकार्‍यासी । खोटेंनाटें विबुध हो ॥३३॥
 
कोठेंही दोन पक्षांत । वांकडें आल्या यत्किंचित् ।
कांटयांचेच होतात । नायटे ते अवलोका ॥३४॥
 
फिर्याद त्या महाराची । पुस्तकांत नोंदली साची ।
आज्ञा झाली अधिकार्‍याची । पाटील पकडून आणावया ॥३५॥
 
शेगांवीं झाली पुकार । उद्यां आहे पडणार ।
पाटलाच्या पदीं थोर । बेडी करीं हातकडया ॥३६॥
 
खंडू पाटला समजलें । धाबें त्याचें दणाणलें ।
तोंडचें पाणी पळालें । झाला अति चिंतातुर ॥३७॥
 
ज्या शेगांवीं मी वाघापरी । वागत होतों आजवरी ।
तेथेंच कां हा श्रीहरी । प्रसंग आणिला बेंडीचा ॥३८॥
 
अब्रुदारास अपमान । वाटे मरणाहून मरण ।
बंधु गेले घाबरुन । कांहीं विचार सुचेना ॥३९॥
 
खंडू हताश होऊन बसला । तों एक विचार सुचला त्याला ।
श्रीगजानन महाराजाला । सांकडें हें घालावें ॥४०॥
 
त्या साधूचे वांचून । या संकटाचें निरसन ।
करणारा न कोणी आन । राहिला या वर्‍हाडीं ॥४१॥
 
लौकिकीं यत्‍न करण्याला । बंधु गेले अकोल्याला ।
खंडू पाटील नीट आला । समर्थांकडे रात्रीस ॥४२॥
 
येतांच केला नमस्कार । शिर ठेविलें पायांवर ।
महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥४३॥
 
सरकारी कामानिमित्त । मी एका महाराप्रत ।
तळ्यापाशीं ताडिलें सत्य । करांतील काठीनें ॥४४॥
 
त्याचा ऐसा परिणाम झाला । कांटयाचा नायटा केला ।
देशमुख मंडळींनीं भला । माझें अहित करण्यास ॥४५॥
 
त्यानिमित्त कैद मला । होण्याचा उद्यां प्रसंग आला ।
समर्था माझ्या इज्जतीला । तुजवीण कोण रक्षील ? ॥४६॥
 
उद्यां येतील राजदूत । मला येथूनि नेण्याप्रत ।
बेडी ठोकोनि पायांत । ऐसें आज ऐकिलें ॥४७॥
 
त्यापेक्षां गुरुवरा । गळा माझा येथेंचि चिरा ।
ही घ्या तलवार देतों करां । वेळ करुं नका हो ॥४८॥
 
अब्‍रुदाराकारण । बेइज्जत हेंच मरण ।
अपराध माझा त्यांतून । अति अल्प दयाळा ॥४९॥
 
त्या अपराधरुपी खडयाचा । हा डोंगर झाला साचा ।
अभिमान माझ्या अब्रूचा । धरा समर्था ये काळीं ॥५०॥
 
जयद्रथाच्या वेळेला । अग्निकाष्ठ भक्षिण्याला ।
होता अर्जुन तयार झाला । केवळ आपुल्या अब्रूस्तव ॥५१॥
 
तेथें भगवंतानें भली । अब्रू त्याची रक्षण केली ।
प्रभूनें वस्त्रें नेसविलीं । द्रौपदीला सभेंत ॥५२॥
 
तेवीं मम अब्रूही पांचाळी । देशमुख कौरवांनीं आणिली ।
नग्न करण्यासाठीं भली । तिचें करा हो रक्षण ॥५३॥
 
ऐसें वदून समर्थाला । पाटील रडूं लागला ।
आसवांचा तो चालला । पूर नेत्रांवाटें हो ! ॥५४॥
 
घरचीं माणसें चिंतातुर । आधींच झालीं होतीं फार ।
नाहीं त्यांच्या शोका पार । तो सांगावा कोठवरी ? ॥५५॥
 
इकडे समर्थांनीं भले । दोन्ही हातीं कवटाळिलें ।
खंडू पाटला हृदयीं धरिलें । त्याचें सांत्वन करावया ॥५६॥
 
अरे ! कामकर्त्या पुरुषाप्रत । ऐशीं संकटें येतात ।
वरच्यावरी जाण सत्य । त्याची चिंता वाहूं नको ॥५७॥
 
स्वार्थदृष्टि बळावतां । ऐसेंच होतें तत्त्वतां ।
खर्‍या नीतीची ती वार्ता । अणुमात्र त्या कळत नसे ॥५८॥
 
तुम्ही पाटील देशमुख दोघेजण । एका जातीचे असून ।
एकमेकांचें नुकसान । स्वार्थें करुं पाहतां ॥५९॥
 
मागें कौरवपांडवांत । स्वार्थेंच आला विपट सत्य ।
परि पांडवांचा पक्ष तेथ । न्यायें खरा होता कीं ॥६०॥
 
म्हणून पांडवांकारणें । साह्य केलें भगवंतानें ।
सत्यासाठीं मारणें । भाग पडलें कौरवांना ॥६१॥
 
जा भिऊं नकोस तिळभर । बेडी न तुशीं पडणार ।
किती जरी केला जरी केला जोर । देशमुखानें आपला ॥६२॥
 
तेंच पुढें खरें झालें । पाटील निर्दोषी म्हणून सुटले ।
जें कां संतमुखावाटें आलें । तें न खोटें होई कधीं ॥६३॥
 
पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार ।
कोणा नाहीं आवडणार । अमृत तें सेवावया ? ॥६४॥
 
पुढें खंडू पाटलानें । करुन विनंति प्रेमानें ।
नेलें रहायाकारणें । समर्थाला निजगृहीं ॥६५॥
 
असतां पाटील सदनांत । गजाननस्वामी समर्थ ।
ब्राह्मण आले अवचित । दहापांच तैलंगी ॥६६॥
 
तैलंगी विद्वान असती । कर्मठ वेदावरी प्रीती ।
परी धनाचा लोभ चित्तीं । राही ज्यांच्या विशेष ॥६७॥
 
तें कांहीं मिळेल म्हणून । समर्थाकडे आले जाण ।
तयीं होते पांघरुण । घेऊन समर्थ निजलेले ॥६८॥
 
त्यांना जागे करण्याप्रत । ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र ।
जटेचे ते स्वरासहित । अति उच्च स्वरानें ॥६९॥
 
मंत्र म्हणण्यांत चूक झाली । ती न त्यांनीं दुरुस्त केली ।
म्हणून आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥७०॥
 
आणि ऐसें वदले ब्राह्मणांला । तुम्ही कशासाठीं वैदिक झालां ।
हीनत्व वेदविद्येला । आणूं नका रे निरर्थक ॥७१॥
 
ही न विद्या पोटाची । मोक्षदात्री आहे साची ।
वा डोईस बांधल्या शालीची । किंमत कांहीं राखा हो ॥७२॥
 
मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा ।
उगीच भोळ्या भाविकांना । सोंग आणून नाडूं नका ॥७३॥
 
जी ऋचा ब्राह्मणांनीं । म्हणण्या सुरुं केली जाणी ।
तोच अध्याय समर्थांनीं । धडधड म्हणून दाखविला ॥७४॥
 
चूक न कोठें म्हणण्यांत । शब्दोच्चार स्पष्ट सत्य ।
वाटे वसिष्ठ मूर्तिमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥७५॥
 
तेलंगी तें ऐकून चकित झाले । अधोवदन बैसले ।
मुख वरी करण्या आपुलें । भय मनीं वाटलें त्यां ॥७६॥
 
सूर्य उदय झाल्यावर । त्याच्यापुढें कां होणार ।
दीपांचा तो जयजयकार । त्यांची किंमत अंधारीं ॥७७॥
 
विप्र म्हणती आपुल्या मनीं । हा पिसा कशाचा महाज्ञानी ।
चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥७८॥
 
हा विधाताच होय दुसरा । शंका येथें नुरली जरा ।
हा असावा ब्राह्मण खरा । जातीनें कीं निःसंशय ॥७९॥
 
परमहंस दीक्षा याची । वार्ता न उरली बंधनाची ।
कोणत्याही प्रकारची । हा जीवन्मुक्त सिद्धयोगी ॥८०॥
 
कांहीं पुण्य होतें पदरीं । म्हणून मूर्ति पाहिली खरी ।
हा वामदेव याला दुसरी । उपमा न ती द्यावया ॥८१॥
 
असो खंडू पाटलाकडून । त्या ब्राह्मणांलागून ।
देते झाले दयाघन । रुपया रुपया दक्षिणा ॥८२॥
 
ब्राह्मण संतुष्ट झाले । अन्य गांवां निघून गेले ।
महाराजही कंटाळले । उपाधीला गांवच्या ॥८३॥
 
श्रोते खर्‍या संताप्रत । उपाधी ना असे पटत ।
दांभिकाला मात्र । भूषण होतें तियेचें ॥८४॥
 
गांवाचिया उत्तरेला । एक मळा सान्निध्याला ।
या मळ्यांत भाजीपाला । होत होता बहुवस ॥८५॥
 
एक शिवाचें मंदिर । तेथें होतें साचार ।
लिंबतरुंची थंडगार । छाया होती ते ठायीं ॥८६॥
 
हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा ।
हा कृष्णाजी खंडुजीचा । सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥८७॥
 
त्या मळ्यांत महाराज आले । शिवालयासन्निध बसले ।
एका ओटयावरी भले । निंबतरुच्या छायेंत ॥८८॥
 
समर्थ म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तुझ्या मळ्यासी ।
कांहीं दिवस राहावयासी । या श्रीशंकरासन्निध ॥८९॥
 
हा भोलानाथ कर्पूरगौर । नीलकंठ पार्वतीवर ।
हा राजराजेश्वर । आहे अवघ्या देवांचा ॥९०॥
 
तो तुझ्या मळ्यांत रमला । म्हणून मींही विचार केला ।
येथें येण्याचा तो भला । दे साउली करुन ॥९१॥
 
तें वाक्य ऐकिलें । सहा पत्रे आणविले ।
ओटयावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तात्काळ ॥९२॥
 
समर्थांनीं वास केला । म्हणून मला क्षेत्र झाला ।
राजा जाय जया स्थला । मीच होते राजधानी ॥९३॥
 
महाराजांचे बरोबर । होता पाटील भास्कर ।
सेवा करण्या निरंतर । दुसरा तुकाराम कोकाटया ॥९४॥
 
खाण्यापिण्याची तरतूद सारी । निजांगें कृष्णाजी पाटील करी ।
समर्थ ते जेवल्यावरी । तो प्रसाद घेत असे ॥९५॥
 
असो गजानन असतां मळ्यांत । गोष्ट घडली अद्‌भुत ।
येते झाले फिरत फिरत । दहा वीस गोसावी ते ठायां ॥९६॥
 
समर्थांचा बोलबाला । त्यांनीं आधींच होता ऐकिला ।
म्हणूनि त्यांनीं तळ दिला । येऊनि या मळ्यामध्यें ॥९७॥
 
गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्थवासी ।
जातों रामेश्वरासी । भागीरथीला घेऊन ॥९८॥
 
गंगोत्री जम्नोत्री केदार । हिंगलाज गिरनार डाकुर ।
ऐशीं क्षेत्रें अपार । पाहिलीं पायीं फिरुनी ॥९९॥
 
ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आम्ही शिष्य आहों साचे ।
महाराजही आमुचे । आहेत सांप्रत बरोबर ॥१००॥
 
हे महासाधु ब्रह्मगिरी । ज्यांचा बंदा गुलाम हरी ।
ती मूर्ति आली घरीं । तुझ्या पूर्वभाग्यानें ॥१॥
 
शिरापुरीचें अयाचित । आम्हां द्यावें तुम्ही त्वरित ।
लागे जो ओढण्याप्रत । गांजा तोही पुरवावा ॥२॥
 
तीन दिवस येथें राहूं । चौथे दिवशीं येथून जाऊं ।
पाटील नका कष्टी होऊं । साधून घ्या ही पर्वणी ॥३॥
 
तुम्ही पोशिला मळ्यांत । वेडा पिसा नंगाधूत ।
मग आम्हां देण्या अयाचित । मागें पुढें कां पाहतां ? ॥४॥
 
गाढवासी पोशिती । गाईस लाथा मारिती ।
ते का म्हणावें सन्मती । पहा विचार करुन ॥५॥
 
आम्ही गोसावी वैराग्यभरित । जाणतों अवघा वेदान्त ।
मर्जी असल्या मळ्यांत । या पोथी ऐकावया ॥६॥
 
कृष्णाजी म्हणे त्यावरी । उद्यां घालीन शिरापुरी ।
आज आहेत भाकरी । त्याच जाव्या घेऊन ॥७॥
 
जितुका गांजा ओढाल । तितुका तेथेंच मिळेल ।
तेथें चालता बोलता कंठनीळ । बसला आहे पत्र्यामध्यें ॥८॥
 
दोन प्रहराची वेळा खरी । घेतल्या चूण भाकरी ।
मळ्यांत घेउनि विहिरीवरी । बसले गोसावी भोजना ॥९॥
 
समर्थांच्या समोरी । एका छपराभीतरीं ।
गोसाव्यांनीं लाविली खरी । आपआपलीं कडासनें ॥११०॥
 
त्यांचा जो होतो महंत । ब्रह्मगिरी नामें सत्य ।
तो भगवद्गीतेप्रत । वाचूं लागला अस्तमानीं ॥११॥
 
गोसावी श्रवणा बैसले । गांवांतूनही कांहीं आले ।
पोथी ऐकावया भले । त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥१२॥
 
"नैनं छिन्दन्ति" हा श्लोक । निरुपणाचा होता देख ।
ब्रह्मगिरी पक्का दांभिक । स्वानुभवाचा लेश नसे ॥१३॥
 
निरुपण त्याचें ऐकिलें । गांवकर्‍यास नाहीं पटलें ।
ते आपसांत बोलूं लागले । हा नुसता शब्दच्छल ॥१४॥
 
सारे पोथी ऐकिल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं ।
गजाननाच्या समोरी । संतदर्शन घ्यावया ॥१५॥
 
लोक म्हणती छपराला । निरुपणाचा भाग झाला ।
येथें पत्र्यास बैसला । स्वानुभवाचा पुरुष हा ॥१६॥
 
तेथें ऐकला इतिहास । येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष ।
या भाषणें गोसाव्यास । राग आला कांहींसा ॥१७॥
 
अवघे गोसावी गांजा प्याया । बसले होते घेऊनिया ।
त्या पत्र्याचिया ठायां । चालली चिलीम गांजाची ॥१८॥
 
पत्र्यांत पलंगाच्या वरी । बसली होती समर्थस्वारी ।
चिलीम भरुन वरच्यावरी । प्याया देई भास्कर ॥१९॥
 
त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पलंगीं पडली साची ।
ती पडतांना कोणाची । दृष्टि न गेली तिच्यावर ॥१२०॥
 
कांहीं वेळ गेल्यावर । निघूं लागला धूर ।
पलंग पेटला अखेर । एकदम चहूं बाजूंनीं ॥२१॥
 
तो प्रकार पाहतां । भास्कर बोले सद्‌गुरुनाथा ।
पलंग सोडा शीघ्र आतां । या खालीं उतरुन ॥२२॥
 
लाकडें हीं पलंगाचीं । आहेत कीं सागाचीं ।
तीं न आतां विझायाचीं । पाण्यावांचून दयाळा ॥२३॥
 
तयीं समर्थ बोलले वाचें । भास्करा अग्नि विझविण्याचें ।
कारण नाहीं तुला साचें । जल मुळींच आणूं नको ॥२४॥
 
अहो महाराज ब्रह्मगिरी । या बैसा पलंगावरी ।
तुम्हां आहे अवगत खरी । भगवद्गीता साकल्यें ॥२५॥
 
त्याच्या परीक्षेची वेळ । आणिली हरीनें तात्काळ ।
ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रत्यय दाखवा ॥२६॥
 
"नैनं छिन्दन्ति" श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर ।
आतां कां मानितां दर । या पलंगीं बसण्याचा ? ॥२७॥
 
जा जा भास्करा लौकरी । ब्रह्मगिरीला करीं धरी ।
आणून बसवी अत्यादरीं । या जळत्या पलंगास ॥२८॥
 
ऐशी आज्ञा होतां क्षणीं । भास्कर गेला धांवोनी ।
ब्रह्मगिरीचा सव्य पाणी । धरिला त्यानें निजकरें ॥२९॥
 
भास्कराचें शरीर । धिप्पाड सशक्‍त पिळदार ।
तो गोसावि त्याच्या समोर । शोभूं लागला घुंगुरडें ॥१३०॥
 
पलंग पेटला चौफेर । ज्वाळा निघूं लागल्या थोर ।
परी महाराज आसनीं स्थिर । हलले मुळीं न इतकेंही ॥३१॥
 
श्री प्रल्हाद कयाधूसुत । उभा केला अग्नींत ।
हें लिहिलें पुराणांत । श्रीव्यासांनीं भागवतीं ॥३२॥
 
त्या लिहिल्या गोष्टीचें । प्रत्यंतर दाविलें साचें ।
मळ्यामाजीं कृष्णाजीचें । श्रीगजानन साधूंनीं ॥३३॥
 
ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं ।
महाराजांच्या अधिकाराशीं । मीं नाहीं जाणितलें ॥३४॥
 
तें न मानी भास्कर । ओढीत आणिला फरफर ।
उभा केला समोर । आपल्या सद्‌गुरुरायाच्या ॥३५॥
 
’नैनं दहति पावक ।’ हें खरें करुन दावा वाक्य ।
ऐसें बोलतां महाराज देख । गोसावी परम घाबरला ॥३६॥
 
गोसावी म्हणे भीत भीत । मी पोटभर्‍या आहे संत ।
शिरापुरी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥३७॥
 
माझ्या अपराधाची क्षमा । साच करी शांतिधामा ।
केला खटाटोप रिकामा । गीताशास्त्र शिकण्याचा ॥३८॥
 
तुला पिसा मी म्हणालों । आतां पस्तावा पावलों ।
मी दांतीं तृण धरुन आलों । शरण तुला अभय दे ॥३९॥
 
शेगांवच्या जनांनीं । केली समर्थां विनवणी ।
आपणा अग्नीपासूनी । भय नाहीं हें खरें ॥१४०॥
 
तरी महाराज आमच्याकरितां । खालीं यावें लवकर आतां ।
अशा स्थितींत पाहतां । तुम्हां आम्हां धडकी भरे ॥४१॥
 
म्हणून आमच्यासाठीं । उतरा खालीं ज्ञानजेठी ॥
गोसावी झाला हिंपुटी । तो न कांहीं बोलला ॥४२॥
 
लोक विनंतीस द्याया मान । खालीं उतरले गजानन ।
तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें त्या ॥४३॥
 
अवघाच होता जळला । जो भाग शेष उरला ।
तो लोकांनीं विझविला । साक्ष दावण्या इतरांसी ॥४४॥
 
ब्रह्मगिरी पायीं लागला । निरभिमान अवघा झाला ।
स्पर्श होता गंगाजला । मल कोठूनी राही तेथ ? ॥४५॥
 
मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मगिरीस बोध केला ।
आजपासून चेष्टेला । तूं या सोडून देईं रे ॥४६॥
 
ज्यांनीं राख लावावी । त्यांनीं उपाधी दूर ठेवावी ।
अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ॥४७॥
 
नुसतें शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात ।
तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ॥४८॥
 
गोसावी मच्छिंद्र जालंदर । गोरख गहिनी साचार ।
ज्ञानेश्वराचा अधिकार । किती म्हणून सांगावा ॥४९॥
 
स्वानुभवाचे झाले यती । श्रीशंकराचार्य निश्चितीं ।
प्रपंचीं राहून ब्रह्मस्थिति । अनुभविली एकनाथांनीं ॥१५०॥
 
स्वामी समर्थ ब्रह्मचारी । हेही ब्रह्मसाक्षात्कारी ।
होऊन गेले भूमीवरी । यांचीं चरित्रें आणी मना ॥५१॥
 
उगीच खाया शिरापुरी । भटकूं नको भूमीवरी ।
सार न तयामाझारीं । येतुलेंही गवसणार ॥५२॥
 
ऐसा बोध ऐकिला । ब्रह्मगिरी विरक्त झाला ।
प्रातःकाळींच उठोन गेला । कोणा न भेटतां शिष्यांसह ॥५३॥
 
ही गोष्ट दुसर्‍या दिवशीं । कळली अवघ्या गांवासी ।
जो तो आला पाहावयासी । मळ्यांत जळलेल्या पलंगातें ॥५४॥
 
हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ ।
तारो भाविकां भवाब्धींत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५५॥
 
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
 
॥इति अष्टमो‍ऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजाननविजयग्रंथअध्याय९

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती