श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय ५
मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (21:35 IST)
॥ श्रीगणेशाय नमः ॥
हे अज अजित अद्वया । सच्चिदानंदा करुणालया ।
दासगणू लागला पायां । आतां अभय असूं दे ॥१॥
मी हीन दीन पातकी नर । नाहीं कोणता अधिकार ।
सर्व बाजूंनीं लाचार । आहें मी देव देवा ॥२॥
परी अत्यंत हीनावरी । थोर सर्वदा कृपा करी ।
पाहा अंगीं लाविली खरी । विभूति श्रीशंकरानें ॥३॥
तो हीनांचा हीनपणा । थोरा न आणि कमीपणा ।
हें जाणोन नारायणा । गणू हा ठेवा संग्रहीं ॥४॥
सर्व लाड लेंकराचे । माता ती पुरवि साचे ।
आहे दासगणूचें । ओझें सर्व तुझ्या शिरीं ॥५॥
जैसें करशील तैसें करी । परी दया असूं दे अंतरीं ।
देवा तुझ्या बळावरी । दासगणूच्या सार्या उडया ॥६॥
गजानन असतां शेगांवीं । यात्रा येई नित्य नवी ।
ती कोठवरी वर्णावी ? । पार न लागे तियेचा ॥७॥
महिमा तो वाढला फार । म्हणून गजानन साधुवर ।
ती उपाधी करण्या दूर । भटकूं लागले काननीं ॥८॥
महिना महिना तिकडेच राहावें । वाटेल तेथेंच बैसावें ।
कोणाशीं न उमगूं द्यावें । चरित्र आपुलें येतुलेंही ॥९॥
श्रोते एका समयासी । महाराज पिंपळगांवासी ।
गेले तेथें गोष्ट कैसी । झाली ते अवधारा ॥१०॥
त्या पिंपळगांवच्या शिवारांत । होतें एक अरण्यांत ।
शंकराचें मंदिर सत्य । जुनें पुराणें हेमाडपंती ॥११॥
ऐशा त्या मंदिरीं । येते झाले साक्षात्कारी ।
बैसले शिवाच्या गाभारीं । लावोनिया पद्मासन ॥१२॥
गुराखी त्या गांवचे । आपापले कळप गुरांचे ।
घेऊनिया निघाले साचे । अस्तमानीं गांवाकडे ॥१३॥
मंदिरापुढें तत्त्वतां । एक लहान ओढा होता ।
तेथें पाणी पाजण्याकरितां । गुरें गुराखी पातले ॥१४॥
कोणी सहज मंदिरांत । गेले वंदण्या शिवाप्रत ।
तों तेथें पाहोन समर्थ । आश्चर्यचकित जाहले ॥१५॥
मुलें म्हणती या मंदिरीं । कोणी न पाहिला आजवरी ।
पुरुष बसलेला निर्धारी । अस्तमानाचे समयाला ॥१६॥
कांहीं गुराखी बाहेर आले । इतरां बोलावूं लागले ।
कांहीं तेथेंच बैसले । सत्पुरुषाचे समोर ॥१७॥
परी साधु बोलेना । डोळे मुळींच उघडीना ।
याचें कारण कळेना । त्या गुराखी अर्भकांसी ॥१८॥
कोणी म्हणती थकलेला । हा साधु दिसतो भला ।
शक्ति मुळीं नुरली त्याला । बोलावयाकारणें ॥१९॥
कोणी म्हणती उपवासी । असावा निश्चयेसी ।
थोडी भाकर तयासी । देऊं आपण खावया ॥२०॥
ऐसें म्हणून भाकर । धरली मुखासमोर ।
भाविक मुळचीं गुराखी पोरें । हलवूं लागलीं समर्थाला ॥२१॥
परी साधु हालेना । मुखीं शब्द बोलेना ।
म्हणून सार्या गुराख्यांना । नवल वाटलें विशेष ॥२२॥
गुराखी आपसांत बोलती । याची मुळीं ना कळे स्थिती ।
जरी मेला म्हणावा निश्चिती । तरी आहे बसलेला ॥२३॥
अंग ना झालें थंडगार । ऊन आहे साचार ।
यावरुन हा जिवंत नर । आहे आहे शंका नको ॥२४॥
कोणी म्हणे असेल भूत । मायावी रुप दावित ।
कोणी म्हणे हें तर सत्य । शिवापुढें ना भूत येई ॥२५॥
कोणी म्हणती स्वर्गीचा । देव हा असावा साचा ।
लाभ त्याच्या दर्शनाचा । झाला आपणां हेंच भाग्य ॥२६॥
याचें आतां पूजन । करुं अवघे आपण ।
जा स्नानालागून । पाणी आणा ओढयाचें ॥२७॥
पोरें गेलीं ओढयावरी । गेळ्यामध्यें आणिलें वारी ।
परमभावें पायांवरी । घालिते झाले समर्थांच्या ॥२८॥
कोणी वन्यपुष्पें आणिलीं । माळ त्यांची तयार केली ।
कंठामध्यें घातिली । गुराख्यांनीं साधूच्या ॥२९॥
कोणी कांदाभाकर । नैवेद्यार्थ साचार ।
दिली ठेवून समोर । एका वडाच्या पानावरी ॥३०॥
गुराख्यांनीं केलें नमन । आदरें भाव धरुन ।
कांहीं वेळ केलें भजन । पुढें बसून समर्थांच्या ॥३१॥
ऐसा आनंद चालला । तों गुराखी एक बोलला ।
अरे वेळ बहु झाला। चला आतां गांवाकडे ॥३२॥
दिवस गेला मावळून । कां न आलीं रानांतून ।
मुलें गुरांना घेऊन । ऐसें लोक म्हणतील कीं ॥३३॥
कदाचित् आपणांसी । पाहण्या येतील काननासी ।
तान्ही वांसरें घरांसी । लागलीं असतील हुंबरावया ॥३४॥
या साधूची हकीकत । आपण सांगूं गांवांत ।
शहाण्या वडील माणसांप्रत । म्हणजे येईल कळून कीं ॥३५॥
तें अवघ्यांसी मानवलें । गुराखी सर्व निघून गेले ।
गांवामाजीं कळविलें । मंदिराचें अवघे वृत्त ॥३६॥
पुढें श्रोते प्रातःकाळीं । आली गांवची मंडळी ।
समर्थांसी पाहाण्या भली । गुराख्यांच्या बरोबर ॥३७॥
जैसा काल होता बसला । तैसाच आतां पाहिला ।
भाकरीसी ना स्पर्श केला । ती जशीच्या तशीच आहे कीं ॥३८॥
म्हणूं लागले गांवकरी । हा योगी पुरुष कोणी तरी ।
आहे बैसला मंदिरीं । सांप्रत या शंकराच्या ॥३९॥
कोणी ऐसें बोलले । शिव पिंडीच्या बाहेर आले ।
आपणां दर्शन द्याया भले । चला नेऊं या गांवांत ॥४०॥
हा समाधी उतरील । तेव्हां कांहीं बोलेल ।
ती उतरण्या आहे वेळ । त्याला त्रास देऊं नका ॥४१॥
बंगाल देशीं जालंदर । बारा वर्षें झाले स्थिर ।
समाधीच्या जोरावर । गर्तेमाजीं ख्यात हें ॥४२॥
ऐसी भवति न भवति झाली । एक पालखी आणविली ।
त्यांत उचलून ठेविली । समर्थांची मूर्ति पाहा ॥४३॥
ग्रामांतील नारीनर । अवघे होते बरोबर ।
पुढें वाजंत्र्यांचा गजर । होत होता विबुध हो ! ॥४४॥
मधून मधून तुळशीफुलें । पौर टाकीत होते भले ।
समर्थाचें अंग झालें । गुलालानें लाली लाल ॥४५॥
घंटाघडयाळें वाजती । लोक अवघे भजन करिती ।
जय जय योगिराज मूर्ति । ऐसें उंच स्वरानें ॥४६॥
मिरवणूक आली गांवांत । मारुतीच्या मंदिरांत ।
बसविले आणून सद्गुरुनाथ । एका भव्य पाटावरी ॥४७॥
तोही दिवस तैसाच गेला । मग लोकांनीं विचार केला ।
आपण करुं स्तवनाला । उपाशी बसून याच्यापुढें ॥४८॥
ऐसा जो तो विचार करिती । तों आले देहावरती ।
गजानन श्रीसद्गुरुमूर्ति । मुगुटमणी योग्यांचे ॥४९॥
मग काय विचारतां । आनंद झाला समस्तां ।
प्रत्येक स्त्रीपुरुष ठेवी माथा । स्वामीचिया चरणांवरी ॥५०॥
नैवेद्याची धूम झाली । ज्यानें त्यानें आणिलीं ।
पात्रें तीं वाढून भलीं । मारुतीच्या मंदिरांत ॥५१॥
त्या अवघ्यांचा स्वीकार । समर्थें केला थोडाफार ।
हाळोपाळींत साचार । ही वार्ता श्रुत झाली ॥५२॥
पुढें दुसर्या मंगळवारीं । पिंपळगांवचे गांवकरी ।
आले बाजारा निर्धारीं । शेगांवाकारणें ॥५३॥
ते शेगांवच्या लोकांसी । सहज बोलले प्रेमेसी ।
आमच्याही गांवासी । आला एक अवलिया ॥५४॥
अवलिया थोर अधिकारी । प्रत्यक्ष आहे श्रीहरी ।
धन्य पिंपळगांव नगरी । पाय लागले साधूचे ॥५५॥
आम्ही तया योगीवरा । कोठें न जाऊं देऊं खरा ।
निधि चालत आला घरा । त्यातें कोण दवडी हो ? ॥५६॥
शेगांवचे बाजारांत । जिकडे तिकडे हीच मात ।
बंकटलाला झालें श्रुत । वर्तमान तें अवलियाचें ॥५७॥
बंकटलाल पत्नीसहित । गेला पिंपळगांवांत ।
समर्थासी जोडोन हात । विनवूं लागला नानापरी ॥५८॥
आतां येतो म्हणून । निघून गेलात आपण ।
त्यास झाले पंधरा दिन । याचा विचार करा हो ॥५९॥
गुरुराया तुम्हांवीण । भणभणीत दिसे सदन ।
शेगांवचे अवघे जन । चिंतातुर झाले हो ॥६०॥
गाडी आणिली आपणांसाठीं । चला शेगांवीं ज्ञानजेठी ।
मायलेका होणें तुटी । हें कांहीं बरें नसे ॥६१॥
कित्येक दयाळा आपुले भक्त । राहिले असती उपोषित ।
त्या शेगांव शहरांत । नित्य दर्शन घेणारे ॥६२॥
तुम्ही न आल्या शेगांवीं । मी ही तनु त्यागीन वरवी ।
आमुची सांगा पुरवावी । आळ कोणी गुरुवर्या ? ॥६३॥
बंकटलाल ऐसें वदले । महाराज गाडीवरी बसले ।
शेगांवासी निघाले । पिंपळगांवा सोडून ॥६४॥
जैसा मागें गोकुळाला । न्याया कृष्णा अक्रूर आला ।
तैसा बंकटलाल भासला । अक्रूर पिंपळगांवातें ॥६५॥
पिंपळगांवच्या लोकांप्रती । बंकटलाल समजाविती ।
नका होऊं दुःखित चित्तीं । जाती न कोठें लांब साधु ॥६६॥
वाटेल तेव्हां दर्शना यावें । हेतु आपुले पुरवावे ।
जेथल्या तेथें असूं द्यावें । या अमोल मूर्तीला ॥६७॥
बहुतेक पिंपळगांवाचा । बंकटलाल साहुकार साचा ।
मनोभंग साहूचा । करण्या कुळांची छाती नसे ॥६८॥
चुरमुर्याचे लाडू खात । पिंपळगांव बसलें स्वस्थ ।
महाराज बसून गाडींत । जाऊं लागले शेगांवा ॥६९॥
पथीं जातां गुरुमूर्ति । बोलली बंकटलालाप्रती ।
ही का साहूची होय रीति । माल दुसर्याचा बळें न्यावा ! ॥७०॥
मशी यावया तुझ्या घरीं । भय वाटतें अंतरीं ।
तुझ्या घरचि नाहीं बरी । रीत हें मी पाहतों ॥७१॥
लक्ष्मी जी लोकमाता । महाविष्णूची होय कांता ।
जिची असे अगाध सत्ता । तिलाही त्वां कोंडिलें ॥७२॥
तेथें माझा पाड कोण ? । म्हणून गेलों पळोन ।
जगदंबेचे पाहून । हाल माझें चित्त भ्यालें ॥७३॥
ऐसें ऐकतां हंसूं आलें । बंकटलालाप्रती भलें ।
विनयानें भाषण केलें । तें ऐका सावचित्तें ॥७४॥
बंकट बोले गुरुनाथा । माझ्या कुलपा न भ्याली माता ।
आपुला वास तेथें होता । म्हणून झाली स्थीर ती ॥७५॥
जेथें बाळ तेथें आई । तेथें दुज्याचा पाड काई ? ।
आपुल्या पायापुढें नाहीं । मला धनाची किंमत ॥७६॥
तेंच माझें धन थोर । म्हणून आलों इथवर ।
माझें न उरलें आतां घर । तें सर्वस्वीं आपुलें ॥७७॥
घरमालकाकारण । शिपाई आडवी कोठून ? ।
जैसें तुमचें इच्छील मन । तैसेंच तुम्ही वागावें ॥७८॥
इतकीच माझी विनंती । शेगांवीं असो वस्ती ।
धेनू काननातें जाती । परी येती घरीं पुन्हां ॥७९॥
तसेंच तुम्हीं करावें । अवघ्या जगां उद्धरावें ।
परी आम्हां न विसरावें । शेगांवीं यावें वरचेवर ॥८०॥
ऐसी समजूत घालून । शेगांवीं आणले गजानन ।
तेथें कांहीं दिवस राहून । निघून गेले पुनरपि ॥८१॥
ती ऐकावी तुम्ही कथा । सांगतों मी इथें आतां।
अडगांव नामें ग्राम होता । एक तया वर्हाड प्रांतीं ॥८२॥
त्या ग्रामाकारण । जाया निघाले दयाघन ।
प्रातःकाळीं चुकवून । नजर शेगांवकरांची ॥८३॥
महाराजांची चालगती । वायुचिया समान होती ।
अंजनी-तनय मारुती । आला काय वाटे पुन्हां ॥८४॥
मास होता वैशाख । सोळा कलांनीं तपे अर्क ।
क्वचित् कोठें न राहिलें उदक । ऐसा प्रखर उन्हाळा ॥८५॥
माध्यान्हीच्या समयाला । अकोली गांवापासी आला ।
हा योगयोगेश्वर साधु भला । गजानन महाराज ॥८६॥
तों काय घडलें वर्तमान । समर्थांसी लागली तहान ।
करिती चौफेर अवलोकन । तों उदक कोठें दिसेना ॥८७॥
अंगावाटे चालल्या धारा । घामाच्या त्या एकसरा ।
अधरोष्ठ तो सुकला खरा । उदकाविण समर्थांचा ॥८८॥
ऐशा दुपारच्या अवसरीं । भास्कर नामें शेतकरी ।
घालीत होता पाळी खरी । आपुल्या त्या शेताला ॥८९॥
शेतकर्याची पाहतां स्थिति । हें अवघ्यांत मुख्य असती ।
कृषीवल हा निश्चिती । अन्नदाता जगाचा ॥९०॥
अंगीं ऐसें मोठेंपण । परी सोशी यातना दारुण ।
बिचार्यांना ऊन ताहान । सोसणें भाग असे कीं ॥९१॥
त्या अकोलीच्या शिवारांत । जलाचें दुर्भिक्ष्य अत्यंत ।
एक वेळा मिळेल घृत । परि अभाव पाण्याचा ॥९२॥
आपणांतें प्यावयासी । भास्करानें शेतासी ।
आणिलें खापराच्या घागरीसी । उदक होतें गांवांतून ॥९३॥
पाठीसी ती भाकर । डोईं जलाची घागर ।
ऐसा होता प्रकार । शेतामाजीं येण्याचा ॥९४॥
ती घागर झुडुपाखालीं । होती भास्करें ठेविली ।
त्या ठिकाणीं स्वारी आली । भास्करा जल मागावया ॥९५॥
समर्थ म्हणती भास्कराला । तहान लागली मला ।
पाणी दे बा प्यावयाला । नाहीं ऐसें म्हणूं नको ॥९६॥
पुण्य पाणी पाजण्याचें । आहे बापा थोर साचें ।
पाण्यावांचून प्राणाचें । रक्षण होणें अशक्य ॥९७॥
धनिक पाणपोया घालिती । हमरस्त्याच्या पथावरती ।
याचें कारण शोध चित्तीं । म्हणजे येईल कळोन ॥९८॥
भास्कर बोले त्यावर । तूं नंगा धूत दिगंबर ।
तुला दांडग्या पाजितां नीर । पुण्यलाभ कशाचा ? ॥९९॥
अनाथ-पंगू-दुबळ्यांसाठीं । त्या पुण्याच्या शोभती गोष्टी ।
वा जो समाजहितासाठीं । झटे त्यासी साह्य करा ॥१००॥
ऐसें शास्त्राचें आहे वचन । तुझ्यासारख्या मैंदाकारण ।
आम्ही पाजितां जीवन । तें उलटें पाप होय ॥१॥
भूतदयेच्या तत्त्वें भला । सर्प कोणी कां पोसला ? ।
वा जागा चोरटयाला । देती सदनीं काय कोणी ? ॥२॥
तूं भीक मागून घरोघर । केलेंस पुष्ट शरीर ।
भारभूत साचार । झालास आपुल्या कृतीनें ॥३॥
मीं माझ्यासाठीं घागर । आणिली सकाळीं डोक्यावर ।
त्या आयत्या पिठावर । रेघोटया तूं ओढूं नको ॥४॥
तुला ना देणार पाणी । नको करुं रे विनवणी ।
जा जा करी येथोनी । काळें आपलें चांडाळा ॥५॥
तुझ्यासारिखे निरुद्योगी । जन्मले आमच्यांत जागजागीं ।
म्हणून झालों अभागी । आम्ही चहूं खंडांत ॥६॥
हें भास्कराचें भाषण । समर्थांनीं ऐकून ।
थोडें करुनी हास्यवदन । निघोन गेले तेथोनिया ॥७॥
थोडया दूर अंतरावर । एक होती साच विहीर ।
तिकडे धांव अखेर । घेतली स्वामीरायांनीं ॥८॥
स्वामी तिकडे जाऊं लागतां । भास्कर झाला बोलतां ।
उच्च स्वरें वेडया वृथा । तिकडे कशाला जातोस ? ॥९॥
ती कोरडी ठणठणीत । आहे विहीर जाण सत्य ।
पाणी या एक कोसांत । नाहीं कोठें जाण पिशा ॥११०॥
समर्थ बोलले त्यावरी । ही सत्य तुझी वैखरी ।
विहिरींत पाणी नाहीं जरी । परी करितों प्रयत्न ॥११॥
तुझ्यासारखे बुद्धिमान । जलनिं होती हैराण ।
तें मी नयनीं पाहून । स्वस्थ ऐसा बसलों जरी ॥१२॥
तरी समाजहितासाठीं । काय मी केली सांग गोष्टी ।
साह्य होतो जगजेठी । हेतु शुद्ध असल्यावर ॥१३॥
समर्थ आले विहिरीपाशीं । तों थेंब नाहीं तियेशीं ।
हताश होऊन वृक्षापाशीं । बसले एका दगडावर ॥१४॥
डोळे मिटून केलें ध्यान । चित्तीं सांठविला नारायण ।
जो सच्चिदानंद दयाघन । दीनोद्धार जगद्गुरु ॥१५॥
समर्थ म्हणती देवदेवा । हे वामना वासुदेवा ।
प्रद्युम्ना राघवा । हे विठ्ठला नरहरी ! ॥१६॥
देवा ही आकोली । पाण्यावांचून त्रस्त झाली ।
वोलही ना राहिली । कोठेंच देवा विहिरींतून ॥१७॥
मानवी यत्न अवघे हरिले । म्हणून तुजला प्रार्थिलें ।
पाव आतां जगन्माउले । पानी दे या विहिरीला ॥१८॥
तुझी करणी अघटीत । जें न घडें तें घडविसी सत्य ।
मांजरें जळत्या आव्यांत । पांडुरंगा ! तूं रक्षिलीं ॥१९॥
प्रल्हाद भक्त करण्या खरा । स्तंभीं प्रगटलास जगदोद्धारा ।
बारा गांव वैश्वानरा । भक्षिलें त्वां गोकुळांत ॥१२०॥
कर नखाग्रीं धरिला गिरी । तूंच कीं रे मुरारी ।
तुझ्या कृपेची न ये सरी । जगत्रयीं कवणास ॥२१॥
दामाजीपंत ठाणेदार । त्याच्यासाठीं झालास महार ।
चोख्यासाठीं ओढीलीं ढोरं । पांखरें रक्षिलीं माळ्याचीं ॥२२॥
उपमन्यूसाठीं भला । क्षीरसमुद्र तुवां दिला ।
तहान नामदेवाला । मारवाडांत लागली जैं ॥२३॥
तैं तुम्ही कौतुक केलें । निर्जलता प्रांतीं भलें ।
नाम्यासाठीं भरविलें । जल हें आण ध्यानांत ॥२४॥
ऐसें विनवितां ईश्वरा । विहिरीलागीं फुटला झरा ।
उफाळ्याचा साजिरा । विहीर भरली क्षणामध्यें ॥२५॥
साह्य झाल्या जगन्नाथ । काय एक ना तें होत ।
ईश्वरी सत्ता अगाध सत्य । जें ना घडे तेंच घडवी ॥२६॥
तेथ पाणी समर्थ प्याले । तें भास्करानें पाहिलें ।
चित्त त्याचें घोटाळलें । कांहीं नच चाले तर्क त्याचा ॥२७॥
वर्षें झालीं द्वादश । जल नाहीं या विहिरीस ।
तिलाच एका घटकेस । यानें जलमय केली कीं ॥२८॥
यावरुन हा कोणीतरी । खचित आहे साक्षात्कारी ।
बळेंच फिरतो पिशापरी । हें आतां समजलें ॥२९॥
शेतीचें काम सोडून । भास्कर आला धांवून ।
धरितां झाला दृढ चरण । मुखें स्तोत्र आरंभिलें ॥१३०॥
हे नरदेहधारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा ।
लेंकरासी कृपा करा । अर्भक मी तुमचें असें ॥३१॥
तुम्हांतें ना जाणून । मी बोललों टाकून ।
आतां पस्तावा झाला पूर्ण । क्षमा त्याची करा हो ॥३२॥
टाकून बोलतां गौळणी । रागावला ना चक्रपाणी ।
दयाळा बाह्य वेषांनीं । तुझ्या मजला ठकविलें ॥३३॥
त्याचें तूंच निरसन । केलें चमत्कार दाखवून ।
भगवंताचें देवपण । कृतीनेंच कळलें कीं ॥३४॥
तैसा तुझा अधिकार । केवढा तरी आहे थोर ।
तें कळलें साचार । या जलाच्या कृतीनें ॥३५॥
कांहीं असो सद्गुरुनाथा । मी न सोडी तुम्हां आतां ।
लेंकरानें भेटतां । माये कोठें न रहावें कीं ॥३६॥
खोटी ही प्रपंच माया । आले आज कळोनिया ।
आतां परते न लोटा या । दीना अर्भकाकारणें ॥३७॥
भास्करासी समर्थ म्हणती । ऐसा न होई दुःखित चित्तीं ।
आतां घागर डोक्यावरती । गांवांतून आणूं नको ॥३८॥
तुझ्यासाठीं हें जीवन । विहिरींत केलें निर्माण ।
आतां कशाची नुरली वाण । मग का प्रपंच टाकिशी ? ॥३९॥
पाणी आलें तुझ्याकरितां । बगीचा तो लाव आतां ।
भास्कर म्हणे गुरुनाथा । हें आमीष दावूं नका ॥१४०॥
माझा निश्चय हीच विहीर । कोरडी ठणठणीत साचार ।
होती दयाळा आजवर । थेंब नव्हता पाण्याचा ॥४१॥
ती विहीर फोडण्याला । तुम्हीच हा प्रयत्न केला ।
साक्षात्काराचा लाविला । सुरुंग खडक फोडावया ॥४२॥
तेणें हा फुटला खडक । भावाचें लागलें उदक ।
आतां मला निःशंक । भक्तिपंथाचा लावीन मी ॥४३॥
वृत्तीच्या मेदिनी ठायीं । फळझाडें तीं लावीन पाही ।
सन्नीतीची माझे आई । तुझ्या कृपेंकरुन ॥४४॥
सत्कर्माचीं फुलझाडें । लावीन मी जिकडे तिकडे ।
हे क्षणैक बैलवाडे । यांचा संबंध आतां नको ॥४५॥
पहा श्रोते संतसंगति । क्षणैक घडतां भास्कराप्रती ।
केवढी झाली उपरति । याचा विचार करा हो ॥४६॥
खर्या संताचें दर्शन । आगळें सर्व साधनांहून ।
तुकारामें केलें वर्णन । "संतचरणरजा" चे अभंगीं ॥४७॥
तो अभंग पहावा । चित्तीं विचार करावा ।
आणि त्याचा अनुभव घ्यावा । निजहिताकारणें ॥४८॥
पाणी लागलें विहिरीस । ही वार्ता आसपास ।
पसरतां जन दर्शनास । धांवूं लागले स्वामीच्या ॥४९॥
मधूचा लागतां सुगावा । जैशा मक्षिका घेती धांवा ।
वा साखरेचा पाहून रवा । मुंग्या येती धांवून ॥१५०॥
तैसे श्रोते तेथ आले । लोक अपार मिळाले ।
विहिरीचें पाणी पाहिलें । पिऊन त्यांनीं तेधवां ॥५१॥
उदक निर्मळ शीत मधुर । गोड अमृताहून फार ।
करुं लागले जयजयकार । गजाननाचा लोक सारे ॥५२॥
असो पुढें भास्करासहित । अडगांवासी न जातां परत ।
महाराज आले शेगांवांत । श्रीगजानन सिद्धयोगी ॥५३॥
स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ ।
होवो जगासी आदर्शभूत । संतमहिमा जाणावया ॥१५४॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥