अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ सद्गुरू श्रीगजानन महाराज यांच्या जीवनचरित्राचा कालखंड बत्तीस वर्षाचा आहे. २३ फेब्रुवारी, १८७८ रोजी ते प्रथमतः तारुण्यात दिगंबरावस्थेत शेगावी दिसले. उंच, तांबूस वर्ण आणि गुडघ्यापर्यंत पोहचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती. सर्व विषयांचे ज्ञान असलेल्या महाराजांना कोणी शिव अवतार तर कोणी रामदास स्वामींचा अवतार शेगावात प्रकटले असे समजत. महाराजांचा वेद आणि ऋचा यांचा ही दांडगा अभ्यास होता.
प्रथमादृष्ट्या ते उष्ट्या पत्रवालीतून अन्न वेचून खाताना दिसले. तसेच झुणका- भाकर, हिरव्या मिरच्या, मुळ्याचा शेंगा हे त्यांचे आवडते पदार्थ होते. एखाद्याच्या ओसरीवर मुक्काम करून घरात मिळणारा पदार्थ ते आवडीने ग्रहण करायचे.
दांभिकता आणि ढोंगीपणाचा त्यांना तिटकारा होता. त्यांच्या चमत्कारांचा अनुभव अनेक भक्तांनी घेतला आहे. ब्रह्मनिष्ठ गोविंद महाराज टाकळीकर यांचा द्वाड घोडा शांत करणे, विस्तवावाचून चिलीम जाळणे, कोरड्या विहिरीत पाणी उत्पन्न करणे, बापू काळ्याला श्रीविठ्ठल स्वरूपात दर्शन देणे, असे अनेक चमत्कार भक्तांनी अनुभवले आहेत.
गजानन महाराज योगी पुरूष होते. अशा महान संताने १९१० गुरुवार ऋषिपंचमीच्या दिवशी विठ्ठला नाम- गजर करत शेगावमध्ये समाधी घेतली. भक्तांप्रमाणे आजही महाराज प्रेमापोटी त्यांच्याशी संकटात धावून येतात. म्हणून आजही शेगावात त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होते. शेगावचे गजानन महाराजांचे मंदिर विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखे जाते.