आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव मोठया उत्साहात आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच नवरात्र हा देवीचा उत्सव भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यावर पितृ पंधरवड्यानंतर आतुरतेने नवरात्रीच्या उत्सवाची वाट बघतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्रोत्सवाला सुरुवात होते.या नवरात्राला शारदीय नवरात्र असे ही म्हणतात. नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. सार्वजनिक मंडळ देवीच्या मूर्तीची स्थापना करतात.
या नऊ दिवसात एक आगळा वेगळा उत्साह असतो. अखंड नऊ दिवस देवीआईची मनोभावे सेवा पूजा,आरती केली जाते. घटस्थापना करताना देवीसमोर घट स्थापना केला जातो.एका परडीमध्ये काळी माती ठेऊन या मातीमध्ये नऊ धान्य पेरतात.त्यावर पाण्याने भरलेला एक घट ठेवतात. या घटात आंब्याची किंवा नागलीची (विड्याची)पाने ठेवतात.त्यावर नारळ ठेवला जातो. देवीचे टाक ठेवतात.त्याच्यापुढे 5 फळे ठेवतात. या घाटाला झेंडूच्या फुलांची माळ घालतात.
अश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे म्हणतात.यालाच दसरा असे ही म्हणतात. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे.असत्यावर सत्याच्या विजयचा प्रतीक आहे दसरा. या दिवशी रामाने रावणाचे वध केले होते. या दिवशी रावण, मेघनाथ, कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन करतात. आपट्याची पाने आणतात आणि घरात तांदुळाचा बळी बनवून बळीचा वध करतात. या दिवशी शुभमुहूर्तावर नवीन कामे हाती घेतली जातात. यादिवशी पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा केली जाते. सरस्वतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो. आपट्याची पाने मित्र मंडळींना, गुरूंना, मोठ्या माणसांना देऊन त्यांचा आशीर्वाद घेतात. तसेच यादिवशी व्यापारी, कामगार आपल्या शस्त्रात्रांची पूजा करतात. अशाप्रकारे हा नवरात्रीचा सण भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.