दिवाळी स्पेशल : मिल्क केक

शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (14:48 IST)
सणावाराच्यानिमित्ताने घरीच एखादी मिठाई करून बघण्याचा विचार मनात येतो. सध्याचा कोरोना काळ आणि मिठायांमध्ये होणारीभेसळ पाहता घरची मिठाईच बरी वाटते. तुम्हालाही सणासुदीला किंवा खास प्रसंगी मिठाई करायची असेल तर साधा, सोपा, झटपट होणारा मिल्क केक हा खूप चांगला पर्याय आहे. घरी केलेल्या मिल्क केकमुळे सणासुदीचा गोडवा अधिकच वाढेल.
 
साहित्य : दोन लीटर फुल क्रीम दूध, लिंबाचा रस दोन चमचे, दीडशे ग्रॅम साखर, एक मोठा चमचा तूप, वेलची पूड, बदाम, पिस्त्याचे काप.
 
कृती : सर्वात आधी आपल्याला दूध आटवायचं आहे. यासाठी भांड्यात किंवा कढईत दूध काढून गॅसवर ठेवा. दुधावर साय येऊ नये, यासाठी सतत हलवत राहा. छान रवाळ मिल्क केक बनवण्यासाठी दूध अर्धे होईपर्यंत आटवून घ्या. यानंतर दुधात लिंबाचा रस घालायचा आहे.
 
आधी चमचाभर लिंबाचा रस घालून थोडा वेळ ढवळत राहा. मग साधारण 5 ते 10 मिनिटांनी अजून एक चमचा लिंबाचा रस घालून दूध ढवळत राहा. काही वेळानंतर दूध रवाळ होऊ लागेल. याच टप्प्यावर दुधात साखर घालायची आहे. दुधात साखर वितळेपर्यंत ढवळत राहा. आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार साखरेचं प्रमाण कमीजास्त करू शकता. दूध घट्ट झाल्यावर त्यात एक छोटा चमचा तूप घालून मंच आचेवर शिजवून घ्या. वेलची पूडही घाला.यावेळीही दूध ढवळत राहा. मंद आचेवर शिजवल्यामुळे दुधाचा रंग बदलून ब्राउन होऊ लागेल. मिल्क केकही मस्तपैकी रवाळ होईल.
 
दुधातलं पाणी पूर्णपणे निघून गेल्यानंतर गॅस बंद करा. आता एक मोल्ड किंवा परात घ्या. त्याच्या मध्यभागी तसंच चारही बाजूंना तूप लावून घ्या. कढईतलं मिश्रण हळुवारपणे परात किंवा मोल्डमध्ये घाला. हे मिश्रण थंड करण्यासाठी सहा तास ठेवा. त्यावर बदाम-पिस्त्याचं काप पसरा. साधारण सहा तासांनी मिल्क केकच्या कडेने सुरी फिरवून घ्या. संपूर्ण मिल्क केक एका ताटात काढून घ्या. चौकोनी किंवा आयताकृती तुकडे करा. हा केक फ्रीजमध्ये आठवडाभर टिकतो.
प्राजक्ता जोरी

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती