सोमवार, 9 डिसेंबर 2024 (06:00 IST)
१. दत्त दत्त म्हणे वाचें । काळ पाय बंदी त्याचे ॥१॥
दत्तचरणीं ठेवी वृत्ति । होय वृत्तीची निवृत्ति ॥२॥
दत्तरूप पाहे डोळां । वंद्य होय कळिकाळा ॥३॥
एकाजनार्दनीं दत्त । ह्रदयीं वसे सदोदित ॥४॥
२. धन्य धन्य तेचि नर । दत्तनामीं जे तत्पर ॥१॥
त्यांचें होतां दरुशन । पतित होताती पावन ॥२॥
तयालागीं शरण जावें । काया वाचा आणि जीवें ॥३॥
शरण एकाजनार्दनीं । त्याचें पाय आठवी मनीं ॥४॥
३. उदार दयाळ गुरुदत्त । पुरवी हेत भक्तांचा ॥१॥
त्याचे चरणीं लीन व्हावें शुद्धभावें करूनी ॥२॥
मुखीं स्मरा गुरुदत्ता । नाहीं दाता दुसरा ॥३॥
पायीं करा तीर्थयात्रा । गुरुसमर्था भजावें ॥४॥
म्हणे एकाजनार्दनीं । जनीं वनीं दत्त हा ॥५॥
४. कलियुगिं तारक । स्वामी दत्तराज एक ॥१॥
त्याचें नाम नित्य गावें । भवसिंधूसि तरावें ॥२॥
दत्तमूर्ती ह्रदयीं ध्यातां । पावें मोक्ष सायुज्यता ॥३॥
दत्त वसे जया मनीं । तया दत्त जनीं वनीं ॥४॥
एकाजनार्दनीं दत्त । सबाह्य स्वानंदभरित ॥५॥
५. लागूनियां पायां जना विनवीत । मुखीं बोला दत्त वारंवार ॥१॥
तेणें तुम्हां सुख होईल अपार । दत्त दयासागर आठवावा ॥२॥
स्त्रिया पुत्र संसारा गुंतसि पामरा । तेणें तूं अघोरा पावशील ॥३॥
एकाजनार्दनी चिंती दत्तपायां । दत्तरूप काया झाली त्याची ॥४॥
६. माझी दत्त ती माऊली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥
कुर्वाळुनि लावी स्तना । नोहें निष्ठु क्रोध नाहीं मनीं ॥२॥
भक्तासी न विसंबे । सदा वाट पाहे बिंबे ॥३॥
एकाजनार्दनीं निश्चित । दत्तनामें पावन पतित ॥४॥
७. दत्तात्रय नाम ज्याचे नित्य मुखीं । तया समसुखी नाहीं दुजा ॥१॥
भावें दत्त दत्त म्हणतसे वाचें । कळिकाळ त्याचें पाय वंदी ॥२॥
दत्ताचें पैं रूप ज्याचें वसे नेत्रीं । आहिक्य परत्रीं तोचि सुखीं ॥३॥
८. केलें आवाहन । जेथे नाहीं विसर्जन ॥१॥
भरला ओतप्रोत । स्वामी माझा देव दत्त ॥२॥
गातं येत नाहीं । पूर्ण सुलीनता पाही ॥३॥
एकाजनार्दनीं खूण । विश्वीं भरला परिपूर्ण ॥४॥
९. सहज सुखासनीं अनसूयानंदन । पाहतां हें ध्यान वृत्ति निवे ॥१॥
बालोन्मत्त पिशाच्च त्रिविध अवस्था धरी । आपण निराकारी सोहंभावें ॥२॥
कारण प्रकृति न घेचि माया । चिदानंद सत्ता विलसतसे ॥३॥
एकाजनार्दनी ह्रदयीं आसन । अखंडीत ध्यान निजतत्त्वीं ॥४॥
१०. गुरु दत्तराया देईं आलिंगन । तयासी वदंन करितों सर्व ॥१॥
दत्तरायाची जे करितात यात्रा । त्यांचेनी पवित्र होती तीर्थे ॥२॥
ज्याचे चित्तीं वसे गुरुदत्त ध्यान । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥३॥
दत्तालागीं अर्पीं तन मन धन । परब्रह्म पूर्ण तोचि झाला ॥४॥
दत्तचरणतीर्थ जो का नित्य सेवी । उगवितो गोवी प्रपंचाची ॥५॥
दत्तावरूनियां कुरवंडी काया । तयाचिया पायां मोक्ष लागे ॥६॥
एकाजनार्दनीं मुखीं दत्त नाम । हरे भवश्रम क्षणामाजीं ॥७॥
११. दत्त सबाह्य अंतरीं । दत्तात्रय चराचरीं ॥१॥
दत्तात्रय माझें मन । हरोनि नेलें मीतूंपण ॥२॥
मुळीं सिंहाद्रीपर्वतीं । दत्तात्रयें केली वस्ती ॥३॥
भक्तांमनीं केला वास । एकाजनार्दनीं विश्वास ॥४॥
१२. नाम निजभावें समर्थ । जेथें नाम तेथें दत्ता ॥१॥
वाचें म्हणतां देवदत्त । दत्त करी गुणातीत ॥२॥
दत्तनामाचा सोहळा । धाक पडे कळिकाला ॥३॥
दत्तनामाचा निजछंद । नामीं प्रगटे परमानंद ॥४॥
एकाजनार्दनीं दत्त । सबाह्य स्वानंदें भरीत ॥५॥
१३. नाम मंगळ मंगळ । झालें जन्माचें सफळ ॥१॥
दत्त जीवीचें जीवन । दत्त करणां कारण ॥२॥
अनसूयात्मजा पाहीं । देहभाव उरला नाहीं ॥३॥
एकाजनार्दर्नी दर्शन । चित्त झालें समाधान ॥४॥
१४. नंदन जो अनसूयेचा । तो तूं कैवारी आमुचा ॥१॥
आमुचा तूं म्हणो जरी । भेट कां न देसी हरि ॥२॥
हरी माझी अंतर्व्यथा । पद दावी तुझे नाथा ॥३॥
नाथा आलों काकुळती । कळकळसी न का चित्तीं ॥४॥
का चित्तीं न ये दया । वासुदेवाची गुरुराया ॥५॥
१५. दत्ता कार्तवीर्य अर्जुन ये वेळां । आला कीं यदूला पाहिला कीं ॥१॥
कीं अलर्कभक्त कीं ये नित्ययुक्त । प्रल्हाद जो मुक्त सक्त पदीं ॥२॥
पदीं पायुराजा पडे की बा तुझा । विष्णुदत्त द्विजा भेटसी कीं ॥३॥
किंवा भार्गवराम पातला सुधाम । सोमकांत नाम राजा ये कीं ॥४॥
कीं अवघा पुसे कोठें जातां असें । दु:शकुन ऐसें मानसी कीं ॥५॥
की दुर्दैव माझें आड पुढें आलें । म्हणोनी न केले आगमन ॥६॥
पुरे हा संशय न होय निश्चय । वासुदेव पाय चिंती तुझे ॥७॥
१६. दत्ता धोपेश्वरीं करिसी की अंगीं । भस्मलेप वेगीं कां न येसी ॥१॥
न येसी भिक्षेसी गुंतूनियां दत्ता । कोल्हापुरीं आतां ताता कीं तूं ॥२॥
कीं तू पंढरीसी सुगंधी हुंगसी । पांचाळीं भुक्तीसी बससी कीं ॥३॥
बससी पश्चिमसागरीं निकाम । वासुदेवें नाम घेता दत्ता ॥४॥
१७. धरीं अवतार विश्व तारावया । अत्रीची अनसूया गरोदरा ॥१॥
ऋतु काळ हेमंत नक्षत्र रोहिणीं । शुक्ल पक्ष दिनीं पूर्ण तिथी ॥२॥
तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सव काळ ॥३॥
एकाजनार्दनीं पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारलें ॥४॥
१८. दत्त वसे औदुंबरीं । त्रिशूल डमरू जटाधारी ॥१॥
कामधेनु आणि श्वान । उभे शोभती समान ॥२॥
गोदातीरीं नित्य वस्ती । अंगी चर्चिली विभूति ॥३॥
काखेमाजीं शोभे झोळी । अर्ध चंद्र वसे भाळीं ॥४॥
एकाजनार्दनीं दत्त । रात्रंदिन आठवित ॥५॥
१९. दत्त माझा दीनानाथ । भक्त लागीं उभा सतत ॥१॥
त्रिशूल घेऊनियां करीं । उभा असे भक्तद्वारीं ॥२॥
भाळीं चर्चिली विभूति । रुद्राक्षाची माळ कंठीं ॥३॥
जवळी असे कामधेनु । तिचा महिमा काय वानूं ॥४॥
एकाजनार्दर्नी दत्त । रूप रहिलें ह्रदयांत ॥५॥
२०. हातीं कमंडलु दंड । दत्तमूर्ति ती अखंड ॥१॥
ध्यान लागों माझें मना । विनवितो गुरुराणा ॥२॥
अंगी चर्चिली विभूति । ह्रदयीं वसे क्षमा शांति ॥३॥
तोचि चित्तांत आठव । गुरुराज दत्त देव ॥४॥
एकाजनार्दनी दत्त । तद्रूप हें झालें चित्त ॥५॥
२१. दत्त माझा पिता दत्त माझी माता । बहिणी बंधु चुलता दत्त माझा ॥१॥
दत्त माझा गुरु दत्त माझा तारूं । मजशीं आधारु दत्तराज ॥२॥
दत्त माझें मन दत्त माझे जन । सोइरा सज्जन दत्त माझा ॥३॥
एकाजनार्दनीं दत्त हा विसावा । न विचारीत गांवा जावें त्याच्या ॥४॥
२२. ऐसी जगाची माउली । दत्तनामें यापुनी ठेली ॥१॥
जावें जिकडे तिकडे दत्त । ऐसी जया मति होत ॥२॥
तया सांकडेंचि नाहीं । दत्त उभा सर्वांठायीं ॥३॥
घाट आघात निवारी । भक्ता वाहे धरीं करीं ॥४॥
ऐशी कृपाळू माऊली । एकाजनार्दनीं देखियली ॥५॥
२३. आमुचें कुळीचें दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥
तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥
हेंचि आमुचे व्रततप । मुखीं दत्तनाम जप ॥३॥
तयावीण हे सुटिका । नाहीं नाहीं आम्हां देखा ॥४॥
एका शरण जनार्दनीं । दत्त वसे तनमनीं ॥५॥
२४. काय तरि बाई । अनसूये । तुझी चतुराई ॥धृ०॥
ब्रह्मा, विष्णु, शिव-शंकर । ज्यांचे सर्व देव सर्व किंकर । जाहलीं आई, तुझीं लेंकरं । उपकारा हीं ॥ अनसूये ॥१॥
त्रिभुवनीं पतिव्रता मिरविती । लक्ष्मी, सावित्री, पार्वती । करिती येऊनिया पर्वतीं । पदर-पसराई ॥ अनसूये ॥२॥
तुझ्यापुढे तिन्ही देव राबती । तिघेहि आज्ञेमधें वागती । तिघीजणी पति-दान मागती । देवदाराही अनसूये ॥३॥
दिधले जिचे तिचे तिला भर्तार । झाला दत्तात्रय अवतार । कृपाघन, जगद्गुरु, दातार तुझ्या या पायीं अनसूये ॥४॥
तीर्थे, देव, ऋषी, मालिका । ऋद्धि, सिद्धि, महालालिका । राहिली तुझ्या निकट रेणुका । एकवीरा ही । अनसूये ॥५॥
विष्णुदास म्हणे संकट निवारीं । धरिले पाय बळकट । दिनरजनीं माझी कटकट । नको दारा ही । अनसूये ॥६॥
२५. दयाळा, आलक, दत्ता, अवधूता । डमरू-कमंडलु-दंडपाणी, दिगंबरा, अमरा, श्रीधरा । शंकरा, जगत्प्राणनिर्माणकर्ता ॥ आलक द्त्ता० ॥धृ०॥
ब्रह्मा, विष्णु, शंकर, गुरुवर्या, आर्या, पवित्रा, विचित्रचरित्रा । पंकजनेत्रा, कोमलगात्रा अत्रि-मुनीअनसुयासुपुत्रा । मुगुट, कुंडल, माधवेंद्रा, त्रिपुंड्रगंधा, भालचंद्रा । रुंडब्रह्मांड-खंडमाळाअलंकृता, योगमुक्ता । आलक दत्ता० ॥१॥
दाता त्राता, तूं जनिता, निर्दोषा, त्रिशीर्षा । पुरुषावेषा, सुरेशा, अमलाभंगा, कलिमलभंगा । ब्रह्मप्रकाशितलिंगा, नि:संगा, नमो सद्गुरु नारायणा । नमो भक्तपरायणा ! नमो विष्णुदासनाथा, ! सुशोभित निगमपंथा ! आलक दत्ता, अवधूता । दयाळा ॥२॥
२६. तूं तो समर्थ दत्त दाता । नाम सोडिलें कां आतां ॥१॥
जगन्माते. लेंकुरवाळे । काय निघालें दिवाळें ॥२॥
कृपासिंधु झाला रिता । कोण्य़ा अगस्तीकरितां ॥३॥
सुकीर्तीची सांठवण । काय नाहीं आठवण ॥४॥
भागीरथी कां वाटली । कामधेनु कां आटली ॥५॥
चंद्र थंडीनें पोळला । कल्पवृक्ष कां वाळला ॥६॥
विष्णुदास म्हणे कनका । ढंग लाऊं नका नका ॥७॥
२७. गुरु, दत्तात्रय, अवधुता । ऐक अनसूयेच्या सुता ॥१॥
वाचें म्हणतों दत्तात्रय । भोगितों मी तापत्रय ॥२॥
प्रसादाची करितों अशा । विषयीं होईना निराशा ॥३॥
तुझा म्हणवितों शिष्य । नरकीं खर्चितों आयुष्य ॥४॥
तुझा म्हणवितों दास । सदा राहतों उदास ॥५॥
तुझा म्हणवितों किंकर । तुला लावितों करकर ॥६॥
तुझा म्हणवितों अंकित । बसतो अफु, गांजा, फुंकित ॥७॥
तुझा म्हणवितों आश्रित । नाहीं आत्मज्ञान श्रुत ॥८॥
तुझा जन्माचा सांगाती । जातों काय अधोगती ॥९॥
विष्णुदासाच्या ह्रदयस्था । याची बसवावी व्यवस्था ॥१०॥
२८. ध्याईं मनी तूं दत्तगुरु ॥धृ०॥
काषायांबर चरणीं पादुका, जटाजूट शिरीं ऋषिकुमरू ॥ध्याई०॥१॥
माला कमंडलू शूल डमरू करीं, शंख चक्र शोभे अमरु ॥ध्याई०॥२॥
पतितपावन तो नारायण, श्वान सुरभिसम कल्पतरु ॥ध्याई०॥३॥
स्मर्तृगामी कलितार दयाघन, भस्म विभूषण रङ्ग वरू ॥ध्याई०॥४॥
२९. नमूं नमूं बा यतिवर्या । दत्तात्रेया दिगंबरा । सोडुनी भवसुखाची आशा । शरण तुजला आलों मी ॥धृ०॥
न करी स्नान संध्या । नाहीं केलें तव पूजन ॥ स्तोत्र पाठ पारायण । नाहीं केलें कदाचन ॥१॥
न कळे काव्य आणि गान । नाहीं नाहीं व्युत्पत्तीचें ज्ञान ॥ भाव एक शुद्ध पूर्ण । रितें आन सर्वही ॥२॥
तूंचि माय बाप सखा । बंधू भगिनी आणि भ्राता ॥ इष्ट मित्र तूंचि त्राता । भक्तांचा पालकू ॥३॥
वेडें वांकुडें शेंबडे । बाळ ओंगळ धाकुटें ॥ नाहीं ऐकिलें देखिलें । मायबापें अव्हेरिलें ॥४॥
देव भावाचा भुकेला । ऐकुनी पांडुरंग-धांवा ॥ सच्चिद् आनंदाचा गाभा । उभा ठेला अंतरीं ॥५॥
३०. दत्ता येईं रे । जिवलगा । प्राणविसाव्या माझ्या ॥धृ०॥
तुज विण चैन नसे, चैन नसे काम न काही सुचे ॥ तारक कोण असे, नव दीसे, आन न कोणी भासे ॥ अनाथनाथ असा, अवधूता, तूचि एक भगवंता ॥ येईं येईं बा गुरुराया संतांच्या माहेरा ॥दत्ता०॥१॥
बुडतों भवडोहीं पैलथडी सत्वर नेईं कुडी ॥ लाटा उसळतीं विषयांच्या, कामक्रोधमोहाच्या ॥ ममतामगरीनें. मज धरिलें, कांही न माझें चाले ॥ पहासी कां न असा, बा सदया, संहर दुस्तर माया ॥दत्ता०॥२॥
जन्मुनी नरदेहीं, म्यां कांही, सुकृत केलें नाहीं ॥ प्रचंड उभारिले, पापाचे, डोंगर दुष्कृत्याचे ॥ धांवे झडकरी, असुरारि, कृपावज्र करीं घेई ॥ कर्माकर्मातें, ने विलया, देई अभय दासा या ॥दत्ता०॥३॥
गुरुजना साधूंची, देवाची, निंदा केली साची ॥ ऋषिमुनि निंदियले, वंदियले, म्लेंच्छग्रंथ ते सारे । अमृत सोडुनियां, स्वगृहीचें, परगृहमदिरा झोंके ॥ झालों क्षीण अतां ही काया, धांव धांव यतिराया ॥दत्ता०॥४॥
माता झुगारितां, लवलाही, तान्हें कोठें जाई ॥ तूंचि सांग बरें, कोणी कडे, तुजविण जाण घडे ॥ कोठें ठाव नसे, त्रिभुवनीं, तुज विण रानींवनीं ॥ लागें दीन असा तव पायां, दे रंगा पदछाया ॥दत्ता०॥५॥
३१. धांव धांव दत्ता किती बाहूं आतां । चैन नसे चित्ता येईं वेगीं ॥१॥
येई वेगीं दत्ता तूंचि माता पिता । आन नसे त्राता कोणी जगीं ॥२॥
जगीं माय बाप तूंचि सखा कृप । स्वस्वरूपीं थाप बाळ तुझें ॥३॥
बाळ तुझें माई अंकावरीं घेईं । बोधस्तन देईं मुखीं माझ्या ॥४॥
मुखीं माझ्या शोष पडतो विशेष । प्रेमरस धीश पाजीं रङ्गा ॥५॥
३२. धेनु जेवीं वत्सा धांव दत्ता तैसा । तुजविण कैसा राहूं जगीं ॥१॥
कोठें जाऊं आतां कोण करी शांता । तुजविण त्राता आन नसे ॥२॥
येईं येईं दत्ता पतितोद्धर्ता । भवभयहर्ता तूंचि माझा ॥३॥
नको पाहूं अंत सदया अनंत । उद्धरीं हा जंत रङ्ग तोका ॥४॥
३३. चला चला हो माहुरीं । भक्तजनांचे माहेरीं ॥१॥
माता रेणुकेचें स्थान । तेथे वसे दत्त जाण ॥२॥
करी भक्तांचा सांभाळ । द्वैत येऊं नेदी काळ ॥३॥
रंग म्हणे काळ गेला । हाता फिरोनी न आला ॥४॥
३४. चला चला रेवातटीं । अनसूया ती गोमटी ॥१॥
असे आश्रम पावन । होत नेत्र-संतर्पण ॥२॥
जरा मृत्यु दूर जाती । मोक्ष लागे बळें पाठीं ॥३॥
रंग माया भ्रम नासे । पूर्ण ब्रह्म दत्त दिसे ॥४॥
३५. ऐसें कैसें केलें देवा । घडली नाहीं कांहीं सेवा ॥१॥
नाहीं देहाची ह्या चाड । जावो अथवा राहो द्वाड ॥२॥
परी पडो न विसर । हेंचि मागों दिगंबर ॥३॥
चरण विसंबो ना क्षण । रंग राहो निर्मळ मन ॥४॥
३६. देखियला. हो, आम्हीं पाहियला हो । पूर्णनंदकंद विवुधवंद्य गुरु हो ॥ आम्हीं पाहियला हो ॥धृ०॥
सदयह्रदय अत्रितनय । कलिकृत बहु पाहुनि अनय ॥ सुजनअवनिं अवनिं सदय । यतिरूपें प्रगटला हो ॥आम्हीं०॥१॥
कोटिमदनविहित वदन । मंदहसित कुंदरदन ॥ अमल-कमलदल-सुनयन । लसित सतत माळ गाळां हो ॥आम्हीं०॥२॥
भस्मभूषित सकळ अंग । दुकुल अरुणसम सुरंग ॥ पदनत-अघ करुनि भंग । अर्पि सुखद आत्मकला हो ॥आम्हीं०॥३॥
श्रीनृसिंह सरस्वती । स्तवनिं चकित वेदमति ॥ गंगाधरतनया प्रीतिं । ह्रत्कमलीं पूजियला हो ॥आम्हीं०॥४॥
३७. श्रीगुरु औदुंबरीं । पाहिले, नरहरि औदुंबरीं ॥धृ०॥
दंड-कमंडुली करीं विराजित । पाहिले, नरहरि०॥१॥
धर्मरक्षण करावयास्तव । मानववपु आदरी ॥ पाहिले, नरहरि०॥२॥
गंगाधरात्मज तत्पदकमलीं । लागला भ्रमरापरी ॥ पाहिले, नरहरि०॥३॥
३८. शोभे मुकुटु शिरीं या रे । सुरनरवर दिप्पळे या । दलितनेत्रमुखाब्जिं साजती अधर सुरगित निरूपमवरि । दंतकिरण राजतिया । अखिल दीप्ति भवतम पळिनेलें । मुनि वेधले; इतरें न रमती, येकैक देव त्रिदेव सोडूनि; । येकैके देव स्वसुख सांडुनि; येकैके देव जीवदान देउनि; । सकळ देव सेविति या; आनंदरूप श्रीदत्तु बा रे ॥(दासोपंत)
३९. बहुतां दिवसां हा दिनु ऐसा देखिला नयनीं रे । दत्ता ! तुझें स्वरूप अगम्य प्रकट जालें त्रिभुवनीं ॥१॥धृ.॥
नवल ! नवल ! रे ! तापस हो ! अत्रीचें तप कैसें? येसणें निधान साधिलें परब्रह्म अनायासें ॥छ॥
देवांचा दे ॐ देहीं सर्वां योगिया आधारु रे । अवधूतु आत्माराम प्रगटु जाला दिगंबरू ॥२॥(दासोपंत)
४०. किरणीं जळकल्लोळ गमतां मृगें लांचवलीं रे । सेखीं वा ॐ; ते कैसी? दुराशा कवळली रे ? ॥धृ०॥
नवल ! नवल ! रे ! सुजाण हो; संसारिक हें तैसें, जन हे जनासी नोळखे; वृथा ममतेचें पीसें ॥१॥
गुरुवचनावरि सावधु हो ! पां ! साच तेचीं विचारीं रे ! जन साच तें । दिंगबरें तूटें भ्रमु; न धरीं शरीरीं ॥२॥(दासोपंत)
४१. क्षितितळगत जल चंचळ ढळता सागरीं वीसांवे रे । नाहीं तया पुनरावृत्ति; कार्यकारणीं सामावे ॥१॥
नवल ! नवल ! रे सुजाण हो ! जिवासि जालें तैसें अवधूतें येकेंवीण लेया कोठेंचि न दीसे ॥छ॥
नाना योनीं भ्रमतां श्रमले साधनें आयासें रे ! दिगंबरीं जाले लीन, ते निवाले ब्रह्मरसें ॥२॥(दासोपंत)
४२.सावळा सुंदरु वो ! देखिला आदिगुरु । मन माझे उतावीळ, कैसें मी करूं । तें मीं केवि सावरूं? ॥१॥
जाईन सवें वो ! चित्त गुंतलें, माये ! ॥छ॥
मन निमालें वो ! बोध नवी तुळलें । दिगंबरें येणें माझें मी पण गोविलें ॥२॥(दासोपंत)
४३. वाट पाहीन वो । ध्यान धरीन माये ! अवधूतेंवीन मन निश्चळ न राहे ॥१॥
वेळ जालो वो ! दत्तु न ये गे ! बाइये ! ॥छ॥
आश लागली वो ! बुद्धि गुंपोनि ठेली । दिगंबरेणीण सैये । निराशा जाली ॥२॥(दासोपंत)
४४. षडभूजमूर्ति सावळी सुंदर । रूपमनोहर देखियली ॥१॥
शंख चक्र हातीं त्रिशूळ डमरू । कासें पीतांबरु कासीयेला ॥२॥
माळा कमंडलू भोभति दों हातीं । गळां वैजयंती रुळतसे ॥३॥
निरंजन म्हणे सद्गुरु निधान । हेंचि माझें धन । सर्वांपरी ॥४॥
४५. दत्तात्रया स्वामि सर्वांचा हो दाता । नाहीं ठाव रीता तया वीण ॥१॥
भागीरथी माजी सारूनिया स्नान । करि भिक्षाटन कोल्हापुरीं ॥२॥
पांचाळेश्वरासी भोजनासि जावें । आसन करावें शेषाचळीं ॥३॥
माहुरपर्वंती करूनिया निद्रा । गिरनारीं मुद्रा सारीसते ॥४॥
निरंजनिं वनिं अक्षईं रहातो । धावूनिया येतो आठवितां ॥५॥
४६. येई वो श्रीगुरु स्वामि दत्तात्रया । दयाळा सखया दीनबंधू ॥१॥
अनाथाचा नाथ कृपेचा सागर । बहू तूं उदार सर्वागुणें ॥२॥
भक्तकाजासाठीं धाऊनियां येसी । हेंचि वागवीसी ब्रीद सदा ॥३॥
निरंजन म्हणे धाउनिया यावें । ग्रंथ उठवावे जळाले ते ॥४॥
४७. लवकर देईं भेटी । दिगंबर स्वामी या ॥धृ॥
सावळी सुंदर तनु । उगवले कोटी भानु । लावण्याता किती वानु । शक्ती नाहीं गावया ॥१॥दिंग०॥
कासियला पितांबर । माथां मुगुट सुंदर । गळां मुक्त चामीकर । गुंफियेल्या जाळिया ॥२॥दिंग०॥
षड्भुजा सकुमार । षडायुधें सुंदर । आंगीं कस्तुरी केशर । लावुनिया उटीया ॥३॥दिंग०॥
स्वामि त्रैलोक्यविहारी । देखियेला गिरनारीं । निरंजनें डोळेभरी । जीवनन्मुक्त व्हावया ॥४॥दिंग०॥
४८. दत्तात्रेया जय गुरुराया तुझिया पायां नमुं यतिवर्या ॥धृ.॥
दृढ धरिलें म्यां तुझिया पायां तूंची सखया वारिं अपाया । ना तरि वायां हे नरकाया जाईल सदया सद्गुरुराया ॥१॥
देव दुरत्यया हे तव माया दे जनि विलया सतत महाभया । आगमगेया जय अनसूया तनया तारीं वारिं अपाया ॥२॥
नेणें मायातरणोपाया यास्तव धरिलें म्यां तव पाया । जय वासुदेवा तारिं वेदगेया तूंच कृपाळ सद्गुरुराया ॥३॥
दत्तात्रेया जय गुरुराया तुझिया पायां नमु यतिवर्या ॥
४९. जय करुणाकर जगदुद्धारा । अजि का रुससी परमोद्धारा ॥धृ.॥
तूं मायबाप धरितां कोपा । कोपा माझ्या तापा शमवी बापा । जय करुणाकर० ॥१॥
बालवाक्यापरी स्तव अवधारी । वारी मम चिंता तूंचि भवारी । जय करुणाकर० ॥२॥
तुज शरणागत तेचि कृतार्थ । व्यर्थ की हें मत वेदसंमत । जय करुणाकर० ॥३॥
जो मम भक्त मत्पदीं सक्त । दोषवियुक्त तो सुखयुक्त ॥ जय करुणाकर० ॥४॥
नाश न होई मम भक्ताचा । न करी मिथ्या हे तव वाचा ॥ जय करुणाकर० ॥५॥
५०. मंगलधामा अचिंत्यमहिमा भक्तां भजनी दे प्रेमा । नामा वदउनी कामा पुरवुनी नेतो अक्षयसुखधामा ॥धृ०॥
भजनीं जाउनी संतां वंदुनी दत्तस्वरूपा आठवुनी । चित्तीं चिंतुनी दृष्टी पाहुनी वदावें दत्तनाम वदनीं ॥१॥
तामस भोजन करिती जे जन आळस निद्रा ये नामा । उच्च स्वरांनीं टाळ्या पिटुनी घेतां न मिळे वाव तमा । मंगलधामा० ॥२॥
भजन समाप्ति होतां प्रणती करूनि स्मरावें आत्मारामा । मधुनि ऊठतां गोष्टी करितां जाति अधोगती दुर्जन्मा । मंगलधामा० ॥३॥
चिन्मय जाणुनि तन्मय होवुनि भजतां दत्तचि दे शर्मा । नर्मा सोडा कर्मा उलंडा तोडा भजनें भवमर्मा ॥ मंगलधामा० ॥४॥
५१. गळा टाळा फूटतां वाहतां रे । कां न ऐकसी सांग नरहरे । कुठें तुझा सर्वज्ञपणा गेला । मला नेणसि काय म्हणूं तुला ॥१॥
न पाहसी मजला जरी दत्ता । सर्वसाक्षित्त्व राहील कसे आतां । मद्विलापा नायकसी जरी । कसी राहे व्यापकता त्वदंतरीं ॥२॥
न येसी ऐकुनि मद्विलापा । कृपालुत्व जाईल तुझें बापा । संकटीं मी घायाळ असें देवा । धावें पावें बा कृपालो सदैवा ॥३॥
५२. कलियुगिं साधन हेंचि एक । मनुजा तूं बा ऐक ॥धृ.॥
सुखकर श्रीदत्ताचें नाम । हेंचि कल्याणाचें धाम । कलिमलहर हें निकाम । जेणें निष्काम हो लोक ॥१॥
मखमुख आवश्यक जें कर्म । नाम घेतां तें दे शर्म । हाचि मुनिसंमत सद्धर्म । मनुजा वर्म हें चोख ॥२॥
धाक ये यच्छ्रवणें काळ । ग्राहसुर होती न प्रतिकूळ । वासु म्हणे मोक्षहि अनुकूळ । उद्धरे कूळ घ्या भाक ॥३॥
५३. या युगीं उगीच लोक कष्टती पहा । दत्तभजन चित्तशोधन नेणती अहा. ॥धृ.॥
होत सांग यागयोग परि न भेट दे । तोचि दत्त दत्त वदतां दावितो पदें । म्हणुनि इतर त्यजुनि सुकर भजनीं स्थिर रहा ॥या युगीं०॥१॥
येत जेथ दत्त तेथ देव धावती । सर्व तीर्थ गंगा तेथ अचल राहती । म्हणुनि चांग भजन याग पापताप हा ॥या युगीं॥२॥
दत्त स्मरुनि चित्त लाउनि भजन हो करा । वित्तविषयमत्तसंग नित्य परिहरा । मग भजनीं जग विसरूनि दत्तमय पहा ॥या युर्गी०॥३॥
५४. कां भटकत फिरतां तुम्हिं सदैव । प्रिय मानुनि विषयवैभव धुंडितां किं तें सदैव ॥१॥
स्वर्गिं नरकिं तें वैभव दैव दे सदैव । मायामय तें वैभव दे कष्टाचि सर्व दैव ॥२॥
होतां प्रतिकूल दैव ! नष्ट होय सर्व । यम मारी नेउनि पुरीं । शिक्षा करी नानापरी । कोण तयातें निवारी । तारी कोण तदैव ॥३॥
दैवत जें दैवतांचे । तारक जें तारकांचे ॥ दत्त दत्त मम वाचें । वद मया सदैव ॥४॥
हो कृतार्थ वासुदेव । चिंतुनियां तेंचि दैव । तुच्छ करुनि तें वैभव भाव धरि सदैव ॥५॥
५५. एकचि नाम मंगलधाम । घेतां होतिल पूर्ण काम । परि ये आळस यास्तव नाम । बोला लीलायुक्त ॥१॥
भाकर भान भूक हरीन । परि खोळंबतो हात । बहुविध मिळतां शांत । होतो जैसा मुक्त ॥२॥
दत्तलीलानामान्वित । करितां भजन प्रेमभरित । युक्त होतो दत्तभक्त । विस्मृतविग्रह शांत ॥३॥
५६. मी धरिं धरिं पादा सुखवरदा ह्रतखेदा अक्षयवरदा ॥धृ.॥
श्रीसद्गुरुवर नरतनुधर जय जय यतिवर अत्रिकुमर सुमनोहर गाणगापुरकृतविहार भो वरदा ॥१॥
भो उद्धृतजन करुणासदन दमितदमन सुमुखनलिन हीररदन कमल नयन प्रियभजन वरदा ॥२॥
संसिद्धिकरा अमरवरा धोरतरा भवसागरापासुनि नरा उद्धरि हरा जोडोनि करा नमूं सुरवरदा ॥३॥
मां पाहि ईश्वर करुणाकर जोडुनि कर विनवीं सादर शिरीं वरकर धरिं सादर दर परिहरिं तूं गतिदा ॥४॥
मी पापी जरी धर्म न करिं वासुदेवावरि न दर करीं तूं सदा ॥५॥
५७. भगवान् अनसूयेचा पुत्र त्रिभुवनीं गातचरित्र । भगवान् अनसूयेचा पुत्र ॥धृ.॥
दत्तत्रेय श्रुतिगणगेय त्रिदशवरीय स्तुतगुणनिचय ॥ योगिध्येय स्वच्छतराशय स्वयें निराश्रय स्वीयजनाश्रय समर्पिताभय दर्शितविनय नयविदात्त विश्वसूत्र जो वसे सर्वदा स्वतंत्र ॥१॥
रमणी चिमणी जयाचि तरुणी मूर्ति सद्गुणी भरलि गुवर्णां वाटे तरणी जेथ लपे झणि ज्याचे चरणीं श्री घे धरणी तो हा नरमणि अवतरे धरणी गृहिणी अत्रिची पवित्र तीचा होय जो सुपुत्र ॥२॥
भाविकवरदा परमानंदा पाहिं मुकुंदा परमानंदा जय गोविंदा वारूनि खेदा पुरवुनि छंदा हरिं या विपदा परमानंदा दाविं निजपदा वरदा वासुदेवमित्र अससी तूं अत्रिपुत्र ॥भगवान् अनसूयेचा०॥३॥
५८. दत्ता चरण सेवा तुझी । देईं आस नाही दुजी ॥धृ.॥
तव कृपें मी धन्य झालों ॥ भव भ्रांति तुटली ॥ परम पदीं परब्रह्ममूर्तीं ॥ आंगें भेटली ॥१॥
अनउदयास्त बोधरवी हा ॥ ह्रदयी प्रगटला ॥ स्थिरचर व्यापुनी अनंतरूपें ॥ अखंड भेटला ॥२॥
भावाचा भुकेला । सुलभ दीन दासाला । गुप्त रूपें जनीं नांदुनी भेटे ॥ अनन्य भक्ताला ॥३॥
५९. दत्ता विसरू कसा तुला ॥ तव पदीं अर्पिन प्राणाला ॥धृ.॥
उपकृति अपार फेडूं न शके ॥ भावें पद नमितों । चहुं देहांची आस सांडुनी निरंजनी रमतों ॥१॥
नेति नेति म्हणुनि लाजला ॥ वेद झाला मुका ॥ तव वर्णनीं गर्व धरुनि ॥ प्रण पडला फिका ॥२॥
भक्तवत्सल बालमुकुंदपदीं । दीन दत्त तरला ॥ सत्य सांगतो तत्पदीं मुक्ति ॥ अनुभव हा ठरला ॥३॥(पंतमहाराज)
६०. सगुण मूर्ति मनोहर ॥ स्वामी माझा दिगंबर ॥ मुखें नारायण उच्चार ॥ दत्तात्रय माझा ॥१॥
कंठीं रुद्राक्षांची माळा ॥ हातीं शोभतो त्रिशूळ ॥ ज्याला कांपे महाकाळ ॥ दत्तात्रय माझा ॥२॥
भववी छटी अंगावरीं ॥ सदा यती दंड धारी । दीन भक्तांचा कैवारी ॥दत्ता०॥३॥
पायीं पादुका सुंदर ॥ शंख चक्र गदाधर ॥ भस्मोद्धुलीत शरीर ॥दत्ता०॥४॥
निरंजन अवधूत ॥ संगें श्वान भुंकत ॥ कामधेनु सवें येत ॥दत्ता०॥५॥
नित्य करी गंगास्नान ॥ करविर क्षेत्रीं भिक्षा जाण ॥ कृष्णतिरीं अनुष्ठान ॥दत्ता०॥६॥
ऐसा संन्यासी निर्गुण ॥ बोधें हरी जन्ममरण ॥ दासा दावी निजखूण ॥दत्ता०॥७॥
त्रैमूर्तींचा अवतार । दयाळू हा गुरुवर ॥ करी दीनांचा उद्धार ॥दत्ता०॥८॥
सत्यज्ञान अनंत ॥ शिवयोगी बालावधूत ॥ दत्त भजनीं नाचत ॥दत्ता०॥९॥(पंतमहाराज)
६१. सर्वकाळ डोळां दिसो तुझी मूर्ति ॥ योगीयाच्या पती दत्तराया ॥धृ.॥
सांवळें गोंडस रूप सुकुमार ॥ दाऊनी समोर प्रेम देई ॥१॥
निर्गुण वैभव ब्रह्मादिकां नकळे ॥ मी तरी दुबळें बाळ तुझें ॥२॥
आवडीनें पायां घालीन मीठी ॥ तेथूनीयां नुठी कांही केल्या ॥३॥
न मागे आणीक नाहीं दुजी आस ॥ दत्तापायीं वास देईं सदा ॥४॥(पंतमहाराज)
६२. दिगंबर मूर्ति उभी कृष्णातीरीं ॥ यतिरूपधारी होऊनियां ॥धृ.॥
दंडकमंड्लू शोभताती करीं ॥ साजे अंगावरी भस्मऊटी ॥१॥
दिव्य चरणकमळीं पादुका शोभती ॥ वेदसवें असती श्वानरूपें ॥२॥
गळा अक्षमाळ भगवें अंबर ॥ वृक्ष औदुंबर कामधेनू ॥३॥
आवडिचें ध्यान हाचि ब्रह्यानंद ॥ दत्त बाळा भेद नाहीं कांही ॥४॥(पंतमहाराज)
६३. दत्त दिगंबर अत्रिनंदना ॥ त्रिभुवन संचारीं ॥ भक्तवत्सला भक्ति देउनी ॥ भजनीं प्रेम भरी ॥धृ.॥
मंदमति मी परि भजनाची ॥ ह्रदयीं आस भारी ॥ बुद्धिचालका अंतर्यामी ॥ वदवी तुझी थोरी ॥१॥
चरणपल्लवीं ठेवि दयाळा वास करी अंतरीं ॥ निजानंदवैभव दाउनी ॥ चुकवी भवफेरी ॥२॥
दीन हीन पामर श्वान मी ॥ लोळतों तव द्वारीं ॥ निशिदिनीं दत्तनाम भुंकतों । प्रेम देईं नरहरी ॥३॥(पंतमहाराज)
६४. भजनप्रेम देईं बालावधूता ॥धृ.॥
जान समाधि कल्पित सर्व ॥ न लगे योगचिंता ॥१॥
जीवनन्मुक्ति विदेह स्थिति ॥ जीवस्वप्नवार्ता ॥२॥
चरणसुखामृत पाजुनी नित्य ॥ घेईं पदरीं दत्ता ॥३॥(पंतमहाराज)
६५. दत्तावधूता किती तूं श्रमसी । भक्तांसाठी निशिदिनीं झुरसी ॥धृ.॥
धांवा न करितां धांवुनि येसी । वर न मागतां अभय देसी ॥१॥
आपुला म्हणवून पदीं ठेविसी ॥ योगक्षेमाची चिंता वाहसी ॥२॥
भक्त म्हणतां मुक्त करिसी । दत्ता बुडविलें निज प्रेमरसीं ॥३॥(पंतमहाराज)
६६. क्षणोक्षणीं विसरतों तुला । परी राखिसी निशिदिनीं मजला ॥धृ॥
सेवा स्मरण कांही न करितां । योगक्षेम वाह्तोसी भला ॥१॥
अभय देउनी सुखवीसी सतत । मूढ दास निश्चिंत केला ॥२॥
बालावधूत दत्त प्रभू तूं । प्रेमानंद विश्वीं दाविला ॥३॥(पंतमहाराज)
६७. धरियेले गे माय श्रीगुरुचे पाय । मीपण जेथें समूळ गेलें तूं पण कैचें काय ॥धृ.॥
कार्यकारण भाव हेही झाला वाव । त्रिपद महावाक्य याचा करितां अनुभव ॥१॥
शबलद्वय गेलें शुद्धपण आलें । असिपद तेंही येथें समूळ मिथ्या झालें ॥२॥
सर्वात्मक एक सद्गुरुमाय देख ॥ माणिक म्हणे गुरुशिष्य याचा नसे थाक ॥३॥
६८. धांव सखे गुरु दत्त माऊली ॥धृ.॥
हंबरोनि तुज पाडस बाहे । येउनि पाजवी पान्हा गाऊली ॥१॥
विविध तापें तापतसे उन्हाळा । येऊनी धरि तूं कृपेची साउली ॥२॥
माणिक म्हणे प्रभू येई तूं लवकरी । लागलेंसे मन तुझिया पाउलीं ॥३॥
६९. द्त्तासी गाईन दत्तासी पाहिन । वाहिलें हें मन रे दत्तापायीं ॥धृ.॥
दत्त स्वयंरूप दत्त माय बाप । माझे त्रिविध ताप रे दत्त वारी ॥१॥
दत्त ज्ञानज्योती दत्त गुरुमूर्ति । दत्त हरी भ्रांती रे माणिकाची ॥२॥
७०. दत्ता ब्रह्मचारी रे बह्मचारी । त्रिभुवनांत तुझी फेरी ॥दत्ता०॥
शेंषाचलीं आसन । माहुरगडांत निद्रास्थान ॥१॥
काशीत स्नान करी । चंदन लावी पंढरपुरी ॥२॥
कोल्हापुरीं फिरे झोळी । भोजन करीत पुरि पांचाळी ॥३॥
तुळजापुरीं धुई हस्त । मेरूशिखरीं समाधिस्त ॥४॥
माणिक सद्गुरुनाथा ॥ जगद्व्यापक अत्रीसुता ॥५॥(माणिकप्रभू)
७१. करुणाकर दिनवत्सला द्त्ता । सत्वर धांवुनि येईं रे ॥धृ.॥
तुझें निजरूप पहावें म्हणून मन । अवलोकित दिशा दाही रे ॥१॥
भवसिंधूसी पार कराया । तुजविण आणिक नाही रे ॥२॥
दास माणिकाची हेचि विनंतीं ॥ ठेवीं मज निज पायीं रे ॥३।(माणिकप्रभू)
७२. येई येई दत्तगुरु ॥ नको करूं रे अव्हेरु ॥ तुम्ही शुद्धसत्त्वरूप ॥ मज भेटावें उमप ॥ काय करूं देवराया ॥ तुझ्याविण जन्म वायां ॥ मिठाळोनी चरणजोडा ॥ वरी लोळेन गडबडां ॥ आता करा अंगीकार । नका शिणवूं किंकर ॥ तुझ्या दारींचा भिकारी ॥ नको लावूं दारोदारीं ॥(उदासी)
७३. परब्रह्म दोन्ही पाय ॥ गावे आयासाशिवा ॥ दोन्ही पाय देई मज ॥ माझी भागली गरज ॥ तुझ्या पायांची शपथ ॥ जरि मी मागेन बहुत ॥ नाहीं मागणें हें भारी ॥ कल्पतरूचें भांडारीं ॥१०॥
कल्पतरु कामधेनु ॥ पायीं घाला माझी तनु ॥ नाहीं मागत मी मोक्ष ॥ यासी पाय तुझे साक्ष ॥ नको पाठवूं रे मोक्षा ॥ पुरवीं पायांची अपेक्षा ।(उदासी)
७४. अत्रिबाळा ब्रह्मचारी माथा तुझ्या पायांवरी ॥ जिवलगा दत्तात्रेया पातळ कां केली माया ॥ गुरुराया या सत्त्वर ॥ घ्याया रंकाचा कैवार ॥ दत्त जिव्हाळ्या राजसा ॥ धांवें पावें या वायसा ॥(उदासी)
७५. कां रे द्त्ता मित्रा, ऐसी सांड केली । कासया धरिली, आढी देवा ॥ पायांसी भेटतां काय तुमचें वेंचे । करा त्या पायांचे, दास आम्हां ॥ आपुल्या दासाची, पाहुनि तळमळ । मागें नाना वेळ धांवलास ॥ मी हा हतभागी, काय दैवीं लिहिलें । पाहिजे पोळीलें. चिंताग्नींत्त ॥ आजवरी नाहीं, केली त्वां उपेक्षा । अनेकां सापेक्षां, भेटलास । पहासी पतीता, दु:खे तळमळतां । केंवि तुझे चित्ता, चैन पडे ॥३०॥
घेसी तेव्हां देशी, हेंच कां औदार्य । पदराचें काय, वेचें तुझें ॥ सांग तरी मागें, कोणी काय दीले । जयाने. तोषीलें, चित्त तुझे ॥(उदासी)
७६. ऊठ अनसूये जिवलगे । धांव निळकंठाचे मागें ॥ ये धावुनि सद्गुरुराया । माझी डोई घे तव पायां ॥ आजवरी झाले हाल । आतां पुढे तरी सांभाळ ॥ आई प्रेमपान्हा सोडा । अंकी घ्या हो हा बापुडा ॥ मायबापा दत्तात्रेया ॥ अझुनी कां ना ये दया ॥ काय उपाय तरी करूं । सांगा दत्तात्रेया सद्गुरु ॥ अत्रि-अनसूयेच्या मुला । कधीं पावशील मला ॥ माझा तू एक जिव्हाळा । ऐक स्वामी या दयाळा ॥ गुरु चालतां चरणीं । खाली ममांगाची धरणी ॥ सारा जन्म वायां गेला । आतां कधी भजूं तुला ॥(उदासी)
७७. मायबापा धाव आतां शरण मी तुला दुहिता । नये करुणा अजुनी तुजसी । लोटिसी मजला ताता? ॥१॥
अंत किती तूं पाहसी माझा । विनवितें मी तुजसी दत्ता ॥२॥
झाडिन आतां चरण धुळी मी । जन्म नको मजला आतां ॥३॥
क्षमा करावी अपराधाची । अल्लड मी बाला दत्ता ॥४॥
धावा करितें लीला ही । उद्धरीं तूं मज आतां ॥५॥
७८. गुरूचें भजन करितें । ह्रदयास रंजवीतें । हा काम क्रोध गर्व । टाकुनि सर्व देतें ॥१॥
ही सर्व ब्रह्म माया । क्षणभर दूर करितें ॥२॥
भजनांत रंगताना तल्लीन मन होते ॥३॥
ही आस एक आतां । सदैव रक्षी माते ॥४॥
चरणांसि देई थारा । दत्तासी विनवीतें ॥५॥(लीला)
७९. धाव सख्या गुरुराया । चरणीं अर्पियली ही काया । क्षण हा भंगुर जाई वाया । जाऊं कोठें आणिका ठाया? ॥ बालक म्हणुनी संबोधिलें । घेउनि जवळीं आश्वासीलें । बोल कां रे फोल अपुले । झालें ऐसें श्रवणीं न पडलें । देई हाता स्वामीनाथा वासुदेवानंता । तारी झडकरी बा तव तनया ॥(शंकर कुलकर्णीं)
८०. बरें झालें देवा आपुलासा केलें । ज्ञानदृष्टी दिधली तुंवा । संकटीं सांभाळिलें ॥ ब्रह्मा विष्णू महेशदेवा । दत्त तूं केवळ । दयाक्षमा शांतिसागर । कीर्ति तुझी धवल । अनन्यभावें शरण तुला मी । ठेवी करकमल । पाशातुनि मज मुक्त करोनि । ठेवियलें निर्मल बरें झालें देवा ॥(शंकर कुलकर्णी)
८१. गुरुदेवा तुझेंच मी लेकरूं । पतित म्हणुनी नको रे अव्हेरू । हीनदीन परि मी तुझाच म्हणवीन । ओढाळ मन हें सांग कसें आवरूं । बावरलों, चित्त लावियलें तव पायीं । ठायीं ठायीं घेईं ह्रदयीं तुझेंच हे वासरूं । बालक मी रे तुझेंचि श्रीगुरु । ठेवी कृपेचा करू ॥(शंकर कुलकर्णी)
अॅपमध्ये पहा x