दासबोध दशक चौदावा - अखंडध्यान

समास पहिला : निस्पृह लक्षणनाम
॥ श्रीराम ॥ ऐका स्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण । जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥ सोपा मंत्र परी नेमस्त । साधें वोषध गुणवंत । साधें बोलणें सप्रचित । तैसें माझें ॥ २ ॥ तत्काळचि अवगुण जाती । उत्तम गुणाची होये प्राप्ती । शब्दवोषध तीव्र श्रोतीं । साक्षपें सेवावें ॥ ३ ॥ निस्पृहता धरूं नये । धरिली तरी सोडूं नये । सोडिली तरी हिंडों नये । वोळखीमधें ॥ ४ ॥ कांता दृष्टी राखों नये । मनास गोडी चाखऊं नये । धारिष्ट चळतां दाखऊं नये । मुख आपुलें ॥ ५ ॥ येकेस्थळीं राहों नये । कानकोंडें साहों नये । द्रव्य दारा पाहों नये । आळकेपणें ॥ ६ ॥ आचारभ्रष्ट होऊं नये । दिल्यां द्रव्य घेऊं नये । उणा शब्द येऊं नये । आपणावरी ॥ ७ ॥ भिक्षेविषीं लाजों नये । बहुत भिक्षा घेऊं नये । पुसतांहि देऊं नये । वोळखी आपली ॥ ८ ॥ धड मळिन नेसों नये । गोड अन्न खाऊं नये । दुराग्रह करूं नये । प्रसंगें वर्तावें ॥ ९ ॥ भोगीं मन असों नये । देहदुःखें त्रासों नये । पुढें आशा धरूं नये । जीवित्वाची ॥ १० ॥ विरक्ती गळों देऊं नये । धारिष्ट चळों देऊं नये । ज्ञान मळिण होऊं नये । विवेकबळें ॥ ११ ॥ करुणाकीर्तन सोडूं नये । अंतर्ध्यान मोडूं नये ॥ प्रेमतंतु तोडूं नये । सगुणमूर्तीचा ॥ १२ ॥ पोटीं चिंता धरूं नये । कष्टें खेद मानूं नये । समैं धीर सांडूं नये । कांहीं केल्या ॥ १३ ॥ अपमानितां सिणों नये । निखंदितां कष्टों नये । धिःकारितां झुरों नये । कांहीं केल्या ॥ १४ ॥ लोकलाज धरूं नये । लाजवितां लाजों नये । खिजवितां खिजों नये । विरक्त पुरुषें ॥ १५ ॥ शुद्ध मार्ग सोडूं नये । दुर्जनासीं तंडों नये । समंध पडों देऊं नये । चांडाळासी ॥ १६ ॥ तपीळपण धरूं नये । भांडवितां भांडों नये । उडवितां उडऊं नये । निजस्थिती आपुली ॥ १७ ॥ हांसवितां हासों नये । बोलवितां बोलों नये । चालवितां चालों नये । क्षणक्ष्णा ॥ १८ ॥ येक वेष धरूं नये । येक साज करूं नये । येकदेसी होऊं नये । भ्रमण करावें ॥ १९ ॥ सलगी पडों देऊं नये । प्रतिग्रह घेऊं नये । सभेमध्यें बैसों नये । सर्वकाळ ॥ २० ॥ नेम आंगीं लाऊं नये । भरवसा कोणास देऊं नये । अंगीकार करूं नये । नेमस्तपणाचा ॥ २१ ॥ नित्यनेम सांडूं नये । अभ्यास बुडों देऊं नये । परतंत्र होऊं नये । कांहीं केल्यां ॥ २२ ॥ स्वतंत्रता मोडूं नये । निरापेक्षा तोडूं नये । परापेक्षा होऊं नये । क्षणक्ष्णा ॥ २३ ॥ वैभव दृष्टीं पाहों नये । उपाधीसुखें राहों नये । येकांत मोडूं देऊं नये । स्वरूपस्थितीचा ॥ २४ ॥ अनर्गळता करूं नये । लोकलाज धरूं नये । कोठेंतरी होऊं नये । आसक्त कदां ॥ २५ ॥ परंपरा तोडूं नये । उआपाधी मोडूं देऊं नये । ज्ञानमार्गे सोडूं नये । कदाकाळीं ॥ २६ ॥ कर्ममार्ग सांडूं नये । वैराग्य मोडूं देऊं नये । साधन भजन खंडूं नये । कदाकाळीं ॥ २७ ॥ अतिवाद करूं नये । अनित्य पोटीं धऊं नये । रागें भरीं भरों नये । भलतीकडे ॥२८॥ न मनी त्यास सांगों नये। कंटाळवाणें बोलों नये । बहुसाल असो नये । येकें स्थळीं ॥ २९ ॥ कांहीं उपाधी करूं नये । केली तरी धरूं नये । धरिली तरी सांपडों नये । उपाधीमध्यें॥ ३० ॥ थोरपणें असो नये । महत्त्व धरून बैसों नये । कांहीं मान इछूं नये । कोठेंतरी ॥ ३१ ॥ साधेपण सोडूं नये । सानेपण मोडूं नये । बळात्कारें जोडूं नये । अभिमान आंगीं ॥ ३२ ॥ अधिकारेवीण सांगों नये । दाटून उपदेश देऊं नये । कानकोंडा करूं नये । परमार्थ कदा ॥ ३३ ॥ कठीण वैराग्य सोडूं नये । कठीण अभ्यास सांडूं नये । कठिणता धरूं नये । कोणेकेविशैं ॥ ३४ ॥ कठीण शब्द बोलों नये । कठीण आज्ञा करूं नये । कठीण धीरत्व सोडूं नये । कांहीं केल्यां ॥ ३५॥ आपण आसक्त होऊं नये । केल्यावीण सांगों नये । बहुसाल मागों नये । शिष्यवर्गांसी ॥ ३६ ॥ उत्धट शब्द बोलों नये । इंद्रियेंस्मरण करूं नये । शाक्तमार्गें भरों नये । मुक्तपणें भरीं ॥ ३७ ॥ नीच कृतीं लाजों नये । वैभव होतां माजों नये । क्रोधें भरीं भरों नये । जाणपणें ॥ ३८ ॥ थोरपणें चुकों नये । न्याये नीति सांडूं नये । अप्रमाण वर्तों नये । कांहीं केल्या ॥ ३९ ॥ कळल्यावीण बोलों नये । अनुमानें निश्चये करूं नये । सांगतां दुःख धरूं नये । मूर्खपणें ॥ ४० ॥ सावधपण सोडुं नये । व्यापकपण सांडुं नये । कदा सुख मानूं नये । निसुगपणाचें ॥ ४१ ॥ विकल्प पोटीं धरूं नये । स्वार्थआज्ञा करूं नये । केली तरी टाकूं नये । आपणास पुढें ॥ ४२ ॥ प्रसंगेंवीण बोलों नये । अन्वयेंवीण गाऊं नये । विचारेंवीण जाऊं नये । अविचारपंथें ॥ ४३॥ परोपकार सांडूं नये । परपीडा करूंनये । विकल्प पडों देऊं नये । कोणीयेकासी ॥ ४४ ॥ नेणपण सोडूं नये । महंतपण सांडूं नये । द्रव्यासाठीं हिंडों नये । कीर्तन करीत ॥ ४५ ॥ संशयात्मक बोलों नये । बहुत निश्चये करूं नये । निर्वाहेंवीण धरूं नये । ग्रंथ हातीं ॥ ४६ ॥ जाणपणें पुसों नये । अहंभाव दिसों नये । सांगेन ऐसें म्हणों नये । कोणीयेकासी ॥ ४७ ॥ ज्ञानगर्व धरूं नये । सहसा छळणा करूं नये । कोठें वाद घालुं नये । कोणीयेकासी ॥ ४८ ॥ स्वार्थबुद्धी जडों नये । कारबारीं पडों नये । कार्यकर्ते होऊं नये । राजद्वारीं ॥ ४९ ॥ कोणास भर्वसा देऊं नये । जड भिक्षा मागों नये । भिक्षेसाथीं सांगों नये । परंपरा आपुली ॥५० ॥ सोइरिकींत पडों नये । मध्यावर्ति घडों नये । प्रपंचाची जडों नये । उपाधी आंगीं ॥ ५१ ॥ प्रपंचप्रस्तीं जाऊं नये । बाष्कळ अन्न खाऊं नये । पाहुण्यासरिसें घेऊं नये । आमंत्रणें कदां ॥ ५२ ॥ श्राध पक्ष सटी सामासें । शांती फळशोबन बारसें । भोग राहात बहुवसें । नवस व्रतें उद्यापनें ॥ ५३ ॥ तेथें निस्पृहें जाऊं नये । त्याचें अन्न खाऊं नये । येळिलवाणें करूं नये । आपणासी ॥ ५४ ॥ लग्नमुहुर्तीं जाऊं नये । पोटासाठीं गाऊं नये । मोलें कीर्तन करूं नये । कोठेंतरी ॥ ५५ ॥ आपली भिक्षा सोडूं नये । वारें अन्न खाऊं नये । निस्पृहासि घडों नये । मोलयात्रा ॥ ५६ ॥ मोलें सुकृत करूं नये । मोलपुजारी होऊं नये । दिल्हा तरी घेऊं नये । इनाम निस्पृहें ॥ ५७ ॥ कोठें मठ करूं नये । केला तरी तो धरूं नये । मठपती होऊन बैसों नये । निस्पृह पुरुषें ॥ ५८ ॥ निस्पृहें अवघेंचि करावें । परी आपण तेथें न सांपडावें । परस्परें उभारावें । भक्तिमार्गासी ॥ ५९ ॥ प्रेत्नेंविण राहों नये । आळस दृष्टी आणूं नये । देह अस्तां पाहों नये । वियोग उपासनेचा ॥ ६० ॥ उपाधीमध्यें पडों नये । उपाधी आंगीं जडों नये । भजनमार्ग मोडूं नये । निसंगळपणें ॥ ६१ ॥ बहु उपाधी करूं नये । उपाधीविण कामा नये । सगुणभक्ति सोडूं नये । विभक्ति खोटी ॥ ६२ ॥ बहुसाल धांवों नये । बहुसाल साहों नये । बहुत कष्ट करूं नये । असुदें खोटें ॥ ६३ ॥ बहुसाल बोलों नये । अबोलणें कामा नये । बहुत अन्न खाऊं नये । उपवास खोटा ॥ ६४ ॥ बहुसाल निजों नये । बहुत निद्रा मोडुं नये । बहुत नेम धरूं नये । बाश्कळ खोटें ॥ ६५ ॥ बहु जनीं असों नये । बहु आरण्य सेऊं नये । बहु देह पाळूं नये । आत्महत्या खोटी ॥ ६६ ॥ बहु संग धरूं नये । संतसंग सांडुं नये । कर्मठपण कामा नये । अनाचार खोटा ॥ ६७ ॥ बहु लोकिक सांडुं नये । लोकाधेन होऊं नये । बहु प्रीती कामा नये । निष्ठुरता खोटी ॥ ६८ ॥ बहु संशये धरूं नये । मुक्तमार्ग कामा नये । बहु साधनीं पडों नये । साधनेंवीण खोटें ॥ ६९ ॥ बहु विषये भोगूं नये । विषयत्याग करितां नये । देहलोभ धरूं नये । बहु त्रास खोटा ॥ ७० ॥ वेगळा अनुभव घेऊं नये । अनुभवेंवीण कामा नये । आत्मस्थिती बोलों नये । स्तब्धता खोटी ॥ ७१ ॥ मन उरों देऊं नये । मनेंवीण कामा नये । अलक्ष वस्तु लक्षा नये । लक्षेंवीण खोटें ॥ ७२ ॥ मनबुद्धिअगोचर । बुद्धीवीण अंधकार । जाणीवेचा पडो विसर । नेणीव खोटी ॥ ७३ ॥ ज्ञातेपण धरूं नये । ज्ञानेंवीण कामा नये । अतर्क्य वस्तु तर्का न ये । तर्केंवीण खोटें ॥ ७४ ॥ दृश्यस्मरण काम नये । विस्मरण पडों नये । कांहीं चर्चा करूं नये । केलियावीण न चले ॥ ७५ ॥ जगीं भेद कामा नये । वर्णसंकर करूं नये । आपला धर्म उडऊं नये । अभिमान खोटा ॥ ७६ ॥ आशाबद्धत बोलों नये । विवेकेंवीण चालों नये । समाधान हालों नये । कांहीं केल्यां ॥ ७७ ॥ अबद्ध पोथी लेहों नये । पोथीवीण कामा नये । अबद्ध वाचूं नये । वाचिल्यावीण खोटें ॥ ७८ ॥ निस्पृहें वगत्रुत्व सांडूं नये । आशंका घेतां भांडों नये । श्रोतयांचा मानूं नये । वीट कदा ॥ ७९ ॥ हें सिकवण धरितां चित्तीं । सकळ सुखें वोळगती । आंगीं बाणें महंती । अकस्मात ॥ ८० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निस्पृहलक्षणनाम समास पहिला ॥
 
 
समास दुसरा : भिक्षानिरूपण ॥ श्रीराम ॥ ब्रह्माणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा । वों भवति या पक्षा । रक्षिलें पाहिजे ॥ १ ॥ भिक्षा मागोन जो जेविला । तो निराहारी बोलिला । प्रतिग्रहावेगळा जाला । भिक्षा मागतां ॥ २ ॥ संतासंत जे जन । तेथें कोरान्न मागोन करी भोजन । तेनें केलें अमृतप्राशन । प्रतिदिनीं ॥ ३ ॥ ॥ श्लोक ॥ भिक्षाहारी निराहारी । भिक्षा नैव प्रतिग्रहः । असंतो वापि संतो वा । सोमपानं दिने दिने ॥ ऐसा भिक्षेचा महिमा । भिक्षा माने सर्वोत्तमा । ईश्वराचा अगाध महिमा । तोहि भिक्षा मागे ॥ ४ ॥ दत्त गोरक्ष आदिकरुनी । सिद्ध भिक्षा मागती जनीं । निस्पृहता भिक्षेपासुनी । प्रगट होये ॥ ५ ॥ वार लाऊन बैसला । तरी तो पराधेन जाला । तैसीच नित्यावळीला । स्वतंत्रता कैंची ॥ ६ ॥ आठां दिवसां धान्य मेळविलें । तरी तें कंटाळवाणें जालें । प्राणी येकायेकीं चेवलें । नित्यनूतनतेपासुनी ॥ ७ ॥ नित्य नूतन हिंडावें । उदंड देशाटण करावें । तरीच भिक्षा मागतां बरवें । श्लाघ्यवाणें ॥ ८ ॥ अखंड भिक्षेच अभ्यास । तयास वाटेना परदेश। जिकडे तिकडे स्वदेश । भुवनत्रैं ॥ ९ ॥ भिक्षां मागतां किरकों नये । भिक्षा मागतां लाजो नये । भिक्षा मागतां भागों नये । परिभ्रमण करावें ॥ १० ॥ भिक्षा आणि चमत्कार । च्चाकाटती लहानथोर । कीर्ति वर्णी निरंतर । भगवंताची ॥ ११ ॥ भिक्षा म्हणिजे कामधेनु । सदा फळ नव्हे सामान्यु । भिक्षेस करी जो अमान्यु । तो करंटा जोगी ॥ १२ ॥ भिक्षेनें वोळखी होती । भिक्षेनें भरम चुकती । सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी ॥ १३ ॥ भिक्षा म्हणिजे निर्भये स्थिति । भिक्षेनें प्रगटे महंती । स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती । भिक्षागुणें ॥ १४ ॥ भिक्षेस नाहीं आडथळा । भिक्षाहारी तो मोकळा । भिक्षेकरितां सार्थक वेअळा । काळ जातो ॥ १५ ॥ भिक्षा म्हणिजे अमरवल्ली । जिकडे तिकडे लगवली । अवकाळीं फळदायेनी जाली । निर्ल्लजासी ॥ १६ ॥ पृथ्वीमधें देश नाना । फिरतां उपवासी मरेना । कोणे येके ठाईं जना । जड नव्हे ॥ १७ ॥ गोरज्य वाणिज्य कृषी । त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी । विसंभों नये झोळीसी । कदाकाळीं ॥ १८ ॥ भिक्षेऐसें नाहीं वैराग्य । वैराग्यापरतें नाहीं भाग्य । वैराग्य नस्तां अभाग्य । येकदेसी ॥ १९ ॥ कांहीं भिक्षा आहे म्हणावें । अल्पसंतोषी असावें । बहुत आणितां घ्यावें । मुष्टी येक ॥ २० ॥ सुखरूप भिक्षा मागणें । ऐसी निस्पृहतेचीं लक्षणें । मृद वागविळास करणें । परम सौख्यकारी ॥ २१ ॥ ऐसी भिक्षेची स्थिती । अल्प बोलिलें येथामती । भिक्षा वांचवी विपत्ती । होणार काळीं ॥ २२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भिक्षानिरूपणनाम समास दुसरा ॥
 
 
समास तिसरा : कवित्वकाआ निरूपण ॥ श्रीराम ॥ कवित्व शब्दसुमनमाळा । अर्थ परिमळ आगळा । तेणें संतषट्पदकुळा । आनंद होये ॥ १ ॥ ऐसी माळा अंतःकरणीं । गुंफुन पूजा रामचरणीं । वोंकारतंत अखंडपणीं । खंडूं च नये ॥ २ ॥ परोपकाराकारणें । कवित्व अगत्य करणें । तया कवित्वाचीं लक्षणें । बोलिजेती ॥ ३ ॥ जेणें घडे भगवद्भक्ती । जेणें घडे विरक्ती । ऐसिया कत्वाची युक्ती । आधीं वाढवावी ॥ ४ ॥ क्रियेवीण शब्दज्ञान । तया न मानिती सज्जन । म्हणौनी देव प्रसन्न । अनुतापें करावा ॥ ५ ॥ देवाचेन प्रसन्नपणें । जें जें घडे बोलणें । तें तें अत्यंत श्लाघ्यवाणें । या नाव प्रासादिक ॥ ६ ॥ धीट पाठ प्रसादिक । ऐसें बोलती अनेक । तरी हा त्रिविध विवेक । बोलिजेल ॥ ७ ॥ धीट म्हणिजे धीटपणें केलें । जें जें आपुल्या मनास आलें । बळेंचि कवित्व रचिलें । या नाव धीट बोलिजे ॥ ८ ॥ पाठ म्हणिजे पाठांतर । बहुत पाहिलें ग्रंथांतर । तयासरिखा उतार । आपणचि केला ॥ ९ ॥ सीघ्रचि कवित्व जोडिलें । दृष्टि पडिलें तें चि वर्णिलें । भक्तिवांचून जें केलें । त्या नाव धीटपाठ ॥ १० ॥ कामिक रसिक श्रृंघारिक । वीर हास्य प्रस्ताविक । कौतुक विनोद अनेक । या नाव धीटपाठ ॥ ११ ॥ मन जालें कामाकार । तैसेचि निघती उद्गार । धीटपाठें परपार । पाविजेत नाहीं ॥ १२ ॥ व्हावया उदरशांती । करणें लागे नरस्तुती । तेथें केली जे वित्पत्ति । त्या नाव धीटपाठ ॥ १३ ॥ कवित्व नसावें धीटपाठ । कवित्व नसावें खटपट । कवित्व नसावें उद्धट । पाषांडमत ॥ १४ ॥ कवित्व नसावें वादांग । कवित्व नसावें रसभंग । कवित्व नसावें रंगभंग । दृष्टांतहीन ॥ १५ ॥ कवित्व नसावें पाल्हाळ । कवित्व नसावें बाष्कळ । कवित्व नसावें कुटीळ । लक्षुनियां ॥ १६ ॥ हीन कवित्व नसावें । बोलिलेंचि न बोलावें । छंदभंग न करावें । मुद्राहीन ॥ १७ ॥ वित्पत्तिहीन तर्कहीन । कळाहीन शब्दहीन । भक्तिज्ञानवैराग्यहीन । कवित्व नसावें ॥ १८ ॥ भक्तिहीन जें कवित्व । तेंचि जाणावें ठोंबें मत । आवडीहीन जें वगत्रृत्व । कंटाळवाणें ॥ १९ ॥ भक्तिविण जो अनुवाद । तोचि जाणावा विनोद । प्रीतीविण संवाद । घडे केवी ॥ २० ॥ असो धीट पाठ तें ऐसें । नाथिलें अहंतेचें पिसें । आतां प्रसादिक तें कैसें । सांगिजेल ॥ २१ ॥ वैभव कांता कांचन । जयास वाटे हें वमन । अंतरीं लागलें ध्यान । सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥ जयास घडीनें घडी । लागे भगवंतीं आवडी । चढती वाढती गोडी । भगद्भजनाची ॥ २३ ॥ जो भगवद्भजनेंवीण । जाऊं नेदी येक क्षण । सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगें रंगलें ॥ २४ ॥ जया अंतरी भगवंत । अचळ राहिला निवांत । तो स्वभावें जें बोलत । तें ब्रह्मनिरूपण ॥ २५ ॥ अंतरी बैसला गोविंद । तेणें लागला भक्तिछंद । भक्तीविण अनुवाद । आणीक नाहीं ॥ २६ ॥ आवडी लागली अंतरीं । तैसीच वदे वैखरी । भावें करुणाकीर्तन करी । प्रेमभरें नाचतु ॥ २७ ॥ भगवंतीं लागलें मन । तेणें नाठवे देहभान । शंका लज्या पळोन । दुरी ठेली ॥ २८ ॥ तो प्रेमरंगें रंगला । तो भक्तिमदें मातला । तेणें अहंभाव घातला । पायांतळीं ॥ २९ ॥ गात नाचत निशंक । तयास कैचे दिसती लोक । दृष्टीं त्रैलोक्यनायेक । वसोन ठेला ॥ ३० ॥ ऐसा भगवंतीं रंगला । आणीक कांहीं नलगे त्याला । स्वैछा वर्णूं लागला । ध्यान कीर्ती प्रताप ॥ ३१ ॥ नाना ध्यानें नाना मूर्ती । नाना प्रताप नाना कीर्ती । तयापुढें नरस्तुती । त्रुणतुल्य वाटे ॥ ३२ ॥ असो ऐसा भगवद्भक्त । जो ये संसारीं विरक्त । तयास मानिती मुक्त । साधुजन ॥ ३३ ॥ त्याचे भक्तीचें कौतुक । तयानव प्रसादिक । सहज बोलतां विवेक । प्रगट होय ॥ ३४ ॥ ऐका कवित्वलक्षण । केलेंच करूं निरूपण । जेणे निवे अंतःकर्ण । श्रोतयांचें ॥ ३५ ॥ कवित्व असावें निर्मळ । कवित्व असावें सरळ । कवित्व असावें प्रांजळ । अन्वयाचें ॥ ३६ ॥ कवित्व असावें भक्तिबळें । कवित्व असावें अर्थागळें । कवित्व असावें वेगळें । अहंतेसी ॥ ३७ ॥ कवित्व असावें कीर्तिवाड । कवित्व असावें रम्य गोड । कवित्व असावें जाड । प्रतापविषीं ॥ ३८ ॥ कवित्व असावें सोपें । कवित्व असावें अल्परूपें । कवित्व असावें सुल्लपें । चरणबंद ॥ ३९ ॥ मृदु मंजुळ कोमळ । भव्य अद्भुत विशाळ । गौल्य माधुर्य रसाळ । भक्तिरसें ॥ ४० ॥ अक्षरबंद पदबंद । नाना चातुर्य प्रबंद । नाना कौशल्यता छंदबंद । धाटी मुद्रा अनेक ॥ ४१ ॥ नाना युक्ती नाना बुद्धी । नाना कळा नाना सिद्धी । नाना अन्वये साधी । नाना कवित्व ॥ ४२ ॥ नाना साहित्य दृष्टांत । नाना तर्क धात मात । नाना संमती सिद्धांत । पूर्वपक्षेंसीं ॥ ४३ ॥ नाना गती नाना वित्पत्ती । नाना मती नाना स्फुर्ति । नाना धारणा नाना धृती । या नाव कवित्व ॥ ४४ ॥ शंका आशंका प्रत्योत्तरें । नाना काव्यें शास्त्राधारें । तुटे संशये निर्धारें । दिर्धारितां ॥ ४५ ॥ नाना प्रसंग नाना विचार । नाना योग नाना विवर । नाना तत्वचर्चासार । या नाव कवित्व ॥ ४६ ॥ नाना साधनें पुरश्चरणें । नाना तपें तीर्थाटणें । नाना संदेह फेडणें । या नाव कवित्व ॥ ४७ ॥ जेणें अनुताप उपजें । जेणें लोकिक लाजे । जेणें ज्ञान उमजे । या नाव कवित्व ॥ ४८ ॥ जेणें ज्ञान हें प्रबळे । जेणें वृत्ती हे मावळें । जेणें भक्तिमार्ग कळे । या नाव कवित्व ॥ ४९ ॥ जेणें सद्बुद्धि तुटे । जेणें भवसिंधु आटे । जेणें भगवंत प्रगटे । या नाव कवित्व ॥ ५० ॥ जेणें सद्बुद्धि लागे । जेणें पाषांड भंगे । जेणें विवेक जागे । या नाव कवित्व ॥ ५१ ॥ जेणें सद्वस्तु भासे । जेणें भास हा निरसे । जेणें भिन्नत्व नासे । या नाव कवित्व ॥ ५२ ॥ जेणें होये समाधान । जेणें तुटे संसारबंधन । जया मानिती सज्जन । तया नाव कवित्व ॥ ५३ ॥ ऐसें कवित्वलक्षण । सांगतां तें असाधारण । परंतु कांहींयेक निरूपण । बुझावया केलें ॥ ५४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कवित्वकला निरूपण समास तिसरा ॥
 
 
समास चवथा : कीर्तन लक्षण ॥ श्रीराम ॥ कलयुगीं कीर्तन करावें । केवळ कोमळ कुशळ गावें । कठीण कर्कश कुर्टें सांडावें । येकीकडे ॥ १ ॥ खटखट खुंटून टाकावी । खळखळ खळांसीं न करावी । खरें खोटें खवळों नेदावी । वृत्ति आपुली ॥ २ ॥ गर्वगाणें गाऊं नये । गातां गातां गळों नये । गोप्य गुज गर्जों नये । गुण गावे ॥ ३ ॥ घष्टणी घिसणी घस्मरपणें । घसर घसरूं घसा खाणें । घुमघुमों चि घुमणें । योग्य नव्हे ॥ ४ ॥ नाना नामे भगवंताचीं । नाना ध्यानें सगुणाचीं । नाना कीर्तनें कीर्तीचीं । अद्भुत करावीं ॥ ५ ॥ चकचक चुकावेना । चाट चावट चळावेना । चरचर चुरचुर लागेना । ऐसें करावें ॥ ६ ॥ छळछळ छळणा करूं नये । छळितां छळितां छळों नयें । छळणें छळणा करूं नये । कोणीयेकाची ॥ ७ ॥ जि जि जि जि म्हणावेना । जो जो जागे तो तो पावना । जपजपों जनींजनार्दना । संतुष्ट करावें ॥ ८ ॥ झिरपे झरे पझरे जळ । झळके दुरुनी झळाळ । झडझडां झळकती सकळ । प्राणी तेथें ॥ ९ ॥ या या या या म्हणावें नलगे । या या या या उपाव नलगे । या या या या कांहीं च नलगे । सुबुद्धासी ॥ १० ॥ टक टक टक करूं नये । टाळाटाळी टिकों नये । टम टम टम टम लाऊं नये । कंटाळवाणी ॥ ११ ॥ ठस ठोंबस ठाकावेना । ठक ठक ठक करावेना । ठाकें ठमकें ठसावेना । मूर्तिध्यान ॥ १२ ॥ डळमळ डळमळ डकों नये । डगमग डगमग कामा नये । डंडळ डंडळ चुकों नये । हेंकाडपणें ॥ १३ ॥ ढिसाळ ढाला ढळती कुंचे । ढोबळा ढसकण डुले नाचे । ढळेचिना ढिगढिगांचे । कंटाळवाणे ॥ १४ ॥ नाना नेटक नागर । नाना नम्र गुणागर । नाना नेमक मधुर । नेमस्त गाणें ॥ १५ ॥ ताळ तुंबरे तानमानें । ताळबद्ध तंतगाणें । तूर्त तार्किक तनें मनें । तल्लिन होती ॥ १६ ॥ थर्थरां थरकती रोमांच । थै थै थै स्वरें उंच। थिरथिर थिरावे नाच । प्रेमळ भक्तांचा ॥ १७ ॥ दक्षदाक्षण्य दाटलें । बंदें प्रबंदें कोंदाटलें । दमदम दुमदुमों लागलें । जगदंतर ॥ १८ ॥ धूर्त तूर्त धावोन आला । धिंगबुद्धीनें धिंग जाला । धाकें धाकें धोकला । रंग अवघा ॥ १९ ॥ नाना नाटक नेटकें । नाना मानें तुकें कौतुकें । नाना नेमक अनेकें । विद्यापात्रें ॥ २० ॥ पाप पळोन गेलें दुरी । पुण्य पुष्कळ प्रगटे वरी । परतरतो परे अंतरीं । चटक लागे ॥ २१ ॥ फुकट फाकट फटवणें नाहीं । फटकळ फुगडी पिंगा नाहीं । फिकें फसकट फोल नाहीं । भकाध्या निंदा ॥ २२ ॥ बरें बरें बरें म्हणती । बाबा बाबा उदंड करिती । बळें बळेंचि बळाविती । कथेलागीं ॥ २३ ॥ भला भला भला लोकीं । भक्तिभावें भव्य अनेकीं । भूषण भाविक लोकीं । परोपकारें ॥ २४ ॥ मानेल तरी मानावें मनें । मत्त न व्हावें ममतेनें । मी मी मी मी बहुत जनें । म्हणिजेत आहे ॥ २५ ॥ येकें टोकत येकांपासीं । येऊं येऊं येती झडेसीं । या या या या असे तयासी । म्हणावें नलगे ॥ २६ ॥ राग रंग रसाळ सुरंगें । अंतर संगित रागें । रत्नपरीक्षा रत्नामागें । धांवती लोक ॥ २७ ॥ लवलवां लवती लोचन । लकलकां लकलें मन। लपलपों लपती जन । आवडीनें ॥ २८ ॥ वचनें वाउगीं वदेना । वावरेविवरे वसेना । वगत्रुत्वें निववी जना । विनित हौनी॥ २९॥ सारासार समस्तांला । सिकऊं सिकऊं जनाला। साहित संगित सज्जनाला । बरें वाटे ॥ ३० ॥ खरेंखोटें खरें वाटलें । खर्खर खुर्खुर खुंटलें । खोटें खोटेपणें गेलें। खोटें म्हणोनियां ॥३१ ॥ शाहाणे शोधितां शोधेना । शास्त्रार्थ श्रृती बोधेना । शुक शारिकाशमेना । शब्द तयाचा ॥ ३२ ॥ हरुषें हरुषें हासिला । हाहाहोहोनें भुलला । हित होईना तयाला । परत्रीचें ॥ ३३ ॥ लक्षावें लक्षितां अलक्षीं । लक्षिलें लोचनातें लक्षी । लंगलें लयेतें अलक्षी । विहिंगममार्गें ॥ ३४॥ क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो । क्षमा क्षमून क्ष्मवितो । क्ष्मणें क्षोभणें क्षेत्रज्ञ तो । सर्वां ठाईं ॥ ३५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तन लक्षण निरूपण समास चौथ्रा ॥
 
 
समास पांचवा : हरिकथा लक्षण ॥ श्रीराम ॥ मागां हरिकथेचें लक्षण । श्रोतीं केला होता प्रस्न । सावध होऊन विचक्षण । परिसोन आतां ॥ १ ॥ हरिकथा कैसी करावी । रंगें कैसी भरावी । जेणें पाविजे पदवी । रघुनाथकृपेची ॥ २ ॥ सोनें आणि परिमळे । युक्षदंडा लागती फळें । गौल्य माधुर्य रसाळें । तरी ते अपूर्वता ॥ ३ ॥ तैसा हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त । वित्पन्न आणि वादरहित । तरी हेहि अपूर्वता ॥ ४ ॥ रागज्ञानी ताळज्ञानी । सकळकळा ब्रह्मज्ञानी । निराभिमानें वर्ते जनीं । तरी हेहि अपूर्वता ॥ ५ ॥ मछर नाहीं जयासी । जो अत्यंत प्रिये सज्जनासी । चतुरांग जाणें मानसीं । अंतरनिष्ठ ॥ ६ ॥ जयंत्यादिकें नाना पर्वें । तीर्थें क्षेत्रें जें अपूर्वें । जेथें वसिजे देवाधिदेवें । सामर्थ्यरूपें ॥ ७ ॥ तया तिर्थातें जे न मानिती । शब्दज्ञानें मिथ्या म्हणती । तया पामरां श्रीपती । जोडेल कैंचा ॥ ८ ॥ निर्गुण नेलें संदेहानें । सगुण नेलें ब्रह्मज्ञानें । दोहिकडे अभिमानें । वोस केलें ॥ ९ ॥ पुढें असतां सगुणमूर्ती । निर्गुणकथा जे करिती । प्रतिपादून उछेदिती । तेचि पढतमूर्ख ॥ १० ॥ ऐसी न कीजे हरिकथा । अंतर पडे उभये पंथा । परिस लक्षणें आतां । हरिकथेचीं ॥ ११ ॥ सगुणमूर्तीपुढें भावें । करुणाकीर्तन करावें । नानाध्यानें वर्णावें । प्रतापकीर्तीतें । १२ ॥ ऐसें गातां स्वभावें । रसाळ कथा वोढवे । सर्वांतरीं हेलावे । प्रेमसुख ॥ १३ ॥ कथा रचायाची खूण । सगुणीं नाणावें निर्गुण । न बोलावे दोष गुण । पुढिलांचे कदा ॥ १४ ॥ देवाचें वर्णावें वैभाव । नाना प्रकारें महत्त्व । सगुणीं ठेउनियां भाव । हरिकथा करावी ॥ १५ ॥ लाज सांडून जनाची । आस्था सांडून धनाची । नीच नवी कीर्तनाची । आवडी धरावी ॥ १६ ॥ नम्र होऊन राजांगणीं । निःशंक जावें लोटांगणी । करताळिका नृत्य वाणीं । नामघोषें गर्जावें ॥ १७ ॥ येकांची कीर्ति येकापुढें । वर्णितां साहित्य न पडे । म्हणोनियां निवाडे । जेथील तेथें ॥ १८ ॥ मूर्ती नस्तां सगुण । श्रवणीं बैसले साधुजन । तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ॥ १९ ॥ नाहीं मूर्ती नाहीं सज्जन । श्रवणीं बैसले भाविक जन । तरी करावें कीर्तन । प्रस्ताविक वैराग्य ॥ २० ॥ श्रुंघारिक नवरसिक । यामधें सांडावें येक । स्त्रियादिकांचें कौतुक । वर्णुं नये कीं ॥ २१ ॥ लावण्य स्त्रियांचें वर्णितां । विकार बाधिजे तत्वता । धारिष्टापासून श्रोता । चळे तत्काळ ॥ २२ ॥ म्हणऊन तें तजावें । जें बाधक साधकां स्वभावें । घेतां अंतरीं ठसावें । ध्यान स्त्रियांचें ॥ २३ ॥ लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार जालें मन । कैचें आठवेल ध्यान । ईश्वराचें ॥ २४ ॥ स्त्री वर्णितां सुखावला । लावण्याचे भरीं भरला । तो स्वयें जाणावा चेवला । ईश्वरापासुनी ॥ २५ ॥ हरिकथेसी भावबळें । गेला रंग तो तुंबळे । निमिष्य येक जरी आकळे । ध्यानीं परमात्मा ॥ २६ ॥ ध्यानीं गुंतलें मन । कैचें आठवेल जन । निशंक निर्ल्लज कीर्तन । करितां रंग माजे ॥ २७ ॥ रागज्ञान ताळज्ञान । स्वरज्ञानेंसीं वित्पन्न । अर्थान्वयाचें कीर्तन । करूं जाणे ॥ २८ ॥ छपन्न भाषा नाना कळा । कंठमाधुर्य कोकिळा । परी तो भक्तिमार्ग वेगळा । भक्त जाणती ॥ २९ ॥ भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणें अन्न । कळावंतांचें जें मन । तें कळाकार जालें ॥ ३० ॥ श्रीहरिवीण जे कळा । तेचि जाणावी अवकळा । देवास सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१ ॥ सर्पीं वेढिलें चंदनासी । निधानाआड विवसी । नाना कळा देवासी । आड तैस्या ॥ ३२ ॥ सांडून देव सर्वज्ञ । नादामध्यें व्हावें मग्न । तें प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥ येक मन गुंतलें स्वरीं । कोणें चिंतावा श्रीहरी । बळेंचि धरुनियां चोरीं । शुश्रृषा घेतली ॥ ३४ ॥ करितां देवाचें दर्शन । आडवें आलें रागज्ञान । तेणें धरुनियां मन । स्वरामागें नेलें ॥ ३५ ॥ भेटों जातां राजद्वारीं । बळेंचि धरिला बेगारी । कळावंतां तैसी परी । कळेनें केली ॥ ३६ ॥ मन ठेऊन ईश्वरीं । जो कोणी हरिकथा करी । तोचि ये संसारीं । धन्य जाणा ॥ ३७ ॥ जयास हरिकथेची गोडी । उठे नीच नवी आवडी ।
 
तयास जोडली जोडी । सर्वोत्तमाची ॥ ३८ ॥ हरिकथा मांडली जेथें । सर्व सांडून धावे तेथें । आलस्य निद्रा दवडून स्वार्थें । हरिकथेसि सादर ॥ ३९ ॥ हरिभक्तांचिये घरीं । नीच कृत्य अंगिकारी । साहेभूत सर्वांपरीं । साक्षपें होये ॥ ४० ॥ या नावाचा हरिदास । जयासि नामीं विश्वास । येथून हा समास । संपूर्ण जाला ॥ ४१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे हरिकथालक्षणनिरूपण समास पांचवा ॥

समास सहावा : चातुर्य लक्षण ॥ श्रीराम ॥ रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये । कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ १ ॥ काळें माणुस गोरें होयेना । वनाळास येत्‌न चालेना । मुक्यास वाचा फुटेना । हा सहजगुण ॥ २ ॥ आंधळें डोळस होयेना । बधिर तें ऐकेना । पांगुळ पाये घेइना । हा सहजगुण ॥ ३ ॥ कुरूपतेचीं लक्षणें । किती म्हणोनि सांगणें । रूप लावण्य याकारणें । पालटेना ॥ ४ ॥ अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभासितां येती । कुविद्या सांडून सिकती । शाहाणे विद्या ॥ ५ ॥ मूर्खपण सांडितां जातें । शाहाणपण सिकतां येतें । कारबार करितां उमजतें । सकळ कांहीं ॥ ६ ॥ मान्यता आवडे जीवीं । तरी कां उपेक्षा करावी । चातुर्येंविण उंच पदवी । कदापी नाहीं ॥ ७ ॥ ऐसी प्रचीत येते मना । तरी कां स्वहित कराना । सन्मार्गें चालतां जनां । सज्जना माने ॥ ८ ॥ देहे नेटकें श्रुंघारिलें । परी चातुर्येंविण नासलें । गुणेंविण साजिरें केलें । बष्कळ जैसें ॥ ९ ॥ अंतर्कळा श्रृंघारावी । नानापरी उमजवावी । संपदा मेळऊन भोगावी । सावकास ॥ १० ॥ प्रेत्न करीना सिकेना । शरीर तेंहि कष्टविना । उत्तम गुण घेईना । सदाकोपी ॥ ११ ॥ आपण दुसर्यास करावें । तें उसिणें सवेंचि घ्यावें । जना कष्टवितां कष्टावें । लागेल बहु ॥ १२ ॥ न्यायें वर्तेल तो शहाणा । अन्याइ तो दैन्यवाणा । नाना चातुर्याच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥ जें बहुतांस मानलें । तें बहुतीं मान्य केलें । येर तें वेर्थचि गेलें । जगनिंद्य ॥ १४ ॥ लोक आपणासि वोळावे । किंवा आवघेच कोंसळावे । आपणास समाधान फावे । ऐसें करावें ॥ १५ ॥ समाधानें समाधान वाढे । मित्रिनें मित्रि जोडे । मोडितां क्षणमात्रें मोडे । बरेपण ॥ १६ ॥ अहो कांहो अरे काअंरे । जनीं ऐकिजेतें किं ते । कळत असतांच कां रे । निकामीपन ॥ १७ ॥ चातुर्यें श्रुंघारे अंतर । वस्त्रें श्रुंघारे शरीर । दोहिमधें कोण थोर । बरें पाहा ॥ १८ ॥ बाह्याकार श्रुंगारिलें । तेणें लोकांच्या हातासि काये आलें । चातुर्यें बहुतांसी रक्षिलें । नाना प्रकारें ॥ १९ ॥ बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें । समस्तीं बरें म्हणावें । ऐसी वासना ॥ २० ॥ तनें मनें झिजावें । तेणें भले म्हणोन घ्यावें । उगें चि कल्पितां सिणावें । लागेल पुढें ॥ २१ ॥ लोकीं कार्यभाग आडे । तो कार्यभाग जेथें घडे । लोक सहजचि वोढे । कामासाठीं ॥ २२ ॥ म्हणोन दुरर्यास सुखी करावें । तेणें आपण सुखी व्हावें । दुसर्यास कष्टवितां कष्टावें । लागेल स्वयें ॥ २३ ॥ हें तों प्रगटचि आहे । पाहिल्याविण कामा नये । समजणें हा उपाये । प्राणीमात्रासी ॥ २४ ॥ समजले आणि वर्तले । तेचि भाग्यपुरुष जाले । यावेगळे उरले । तें करंटे पुरुष ॥ २५ ॥ जितुका व्याप तितुकें वैभव । वैभवासारिखा हावभाव । समजले पाहिजे उपाव । प्रगटचि आहे ॥ २६ ॥ आळसें कार्येभाग नासतो । साक्षेप होत होत होतो । दिसते गोष्टी कळेना तो । शाहाणा कैसा ॥ २७ ॥ मित्रि करितां होतें कृत्य । वैर करितां होतो मृत्यु । बोलिलें हें सत्य किं असत्य । वोळखावें ॥ २८ ॥ आपणास शाहाणें करूं नेणें । आपलें हित आपण नेणें । जनीं मैत्रि राखों नेणे । वैर करी ॥ २९ ॥ ऐसे प्रकारीचे जन । त्यास म्हणावें अज्ञान । तयापासीं समाधान । कोण पावे ॥ ३० ॥ आपण येकायेकी येकला । सृष्टींत भांडत चालिला । बहुतांमध्यें येकल्याला । येश कैचें ॥ ३१ ॥ बहुतांचे मुखी उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें । उत्तम गुणीं विवरावें । प्राणीमात्रासी ॥ ३२ ॥ शाहाणे करावे जन । पतित करावे पावन । सृष्टिमधें भगवद्भजन । वाढवावें ॥ ३३ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चातुर्येलक्षणनिरूपण समास सहावा ॥
 
 
समास सातवा : युगधर्म निरूपण ॥ श्रीराम ॥ नाना वेश नाना आश्रम । सर्वांचें मूळ गृहस्थाश्रम । जेथें पावती विश्राम । त्रैलोक्यवासी ॥ १ ॥ देव ऋषी मुनी योगी । नाना तापसी वीतरागी । पितृआदिकरून विभागी । अतीत अभ्यागत ॥ २ ॥ गृहस्थाश्रमीं निर्माण जाले । आपला आश्रम टाकून गेले । परंतु गृहस्थागृहीं हिंडों लागले । कीर्तिरूपें ॥ ३ ॥ याकारणें गृहस्थाश्रम । सकळामधें उत्तमोत्तम । परंतु पाहिजे स्वधर्म । आणी भूतदया ॥ ४ ॥ जेथें शडकर्में चालती । विध्योक्त क्रिया आचरती । वाग्माधुर्यें बोलती । प्राणीमात्रासी ॥ ५ ॥ सर्वप्रकारें नेमक । शास्त्रोक्त करणें कांहींयेक । त्याहिमध्यें अलोलिक । तो हा भक्तिमार्ग ॥ ६ ॥ पुरश्चरणी कायाक्लेसी । दृढव्रती परम सायासी । जगदीशावेगळें जयासी । थोर नाहीं ॥ ७ ॥ काया वाचा जीवें प्राणें । कष्टे भगवंताकारणें । मनें घेतलें धरणें । भजनमार्गीं ॥ ८ ॥ ऐसा भगवंताचा भक्त । विशेष अंतरीं विरक्त । संसार सांडून झाला मुक्त । देवाकारणें ॥ ९ ॥ अंतरापासून वैराग्य । तेंचि जाणावें महद्भाग्य । लोलंगतेयेवढें अभाग्य । आणीक नाहीं ॥ १० ॥ राजे राज्य सांडून गेले । भगवंताकारणें हिंडलें । कीर्तिरूपें पावन जाले । भूमंडळीं ॥ ११ ॥ ऐसा जो कां योगेश्वर । अंतरीं प्रत्ययाचा विचार । उकलूं जाणे अंतर । प्राणीमात्रांचें । १२ ॥ ऐसी वृत्ति उदासीन । त्याहिवरी विशेष आत्मज्ञान । दर्शनमात्रें समाधान । पावती लोक ॥ १३ ॥ बहुतांसी करी उपाये । तो जनाच्या वाट्या न ये । अखंड जयाचे हृदये । भगवद्रूप ॥ १४ ॥ जनास दिसे हा दुश्चित । परी तो आहे सावचित । अखंड जयाचें चित्त । परमेश्वरीं ॥ १५ ॥ उपासनामूर्तिध्यानीं । अथवा आत्मानुसंधानीं । नाहिं तरी श्रवणमननीं । निरंतर ॥ १६ ॥ पूर्वजांच्या पुण्यकोटी । संग्रह असिल्या गांठीं । तरीच ऐसीयाची भेटी । होये जनासी ॥ १७ ॥ प्रचीतिविण जें ज्ञान । तो आवघाचि अनुमान । तेथें कैंचें परत्रसाधन । प्राणीयासी ॥ १८ ॥ याकारणें मुख्य प्रत्यये । प्रचीतिविण काम नये । उपायासारिखा अपाये । शाहाणे जाणती ॥ १९ ॥ वेडें संसार सांडून गेलें । तरी तें कष्टकष्टोंचि मेलें । दोहिकडे अंतरलें । इहलोक परत्र ॥ २० ॥ रागें रागें निघोन गेला । तरी तो भांडभांडोंचि मेला । बहुत लोक कष्टी केला । आपणहि कष्टी ॥ २१ ॥ निघोन गेला परी अज्ञान । त्याचे संगती लागले जन । गुरु शिष्य दोघे समान । अज्ञानरूपें ॥ २२ ॥ आशावादी अनाचारी । निघोनि गेला देशांतरीं । तरी तो अनाचारचि करी । जनामध्यें ॥ २३ ॥ गृहीं पोटेविण कष्टती । कष्टी होऊन निघोन जाती । त्यास ठाईं ठाईं मारिती । चोरी भरतां ॥ २४ ॥ संसार मिथ्या ऐसा कळला । ज्ञान समजोन निघोन गेला । तेणें जन पावन केला । आपणाऐसा ॥ २५ ॥ येके संगतीनें तरती । येके संगतीनें बुडती । याकारणें सत्संगती । बरी पाहावी ॥ २६ ॥ जेथें नाहीं विवेकपरीक्षा । तेथें कैंची असेल दीक्षा । घरोघरीं मागतां भिक्षा । कोठेंहि मिळेना ॥ २७ ॥ जो दुसर्याचें अंतर जाणे । देश काळ प्रसंग जाणे । तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ २८ ॥ नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला । वेदशास्त्रब्राह्मणाला । कोण पुसे ॥ २९ ॥ ब्रह्मज्ञानाचा विचारू । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू । वर्णानां ब्रह्मणो गुरुः । ऐसें वचन ॥ ३० ॥ ब्राह्मण बुद्धिपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले । गुरुत्व सांडून जाले । शिष्य शिष्यांचे ॥ ३१ ॥ कित्येक दावलमलकास जाती। कित्येक पीरास भजती । कित्येक तुरुक होती । आपले इछेनें ॥ ३२ ॥ ऐसा कलयुगींचा आचार । कोठें राहिला विचार । पुढें पुढें वर्णसंकर । होणार आहे ॥ ३३ ॥ गुरुत्व आले नीचयाती । कांहींयेक वाढली महंती । शुद्र आचार बुडविती । ब्रह्मणाचा ॥ ३४ ॥ हें ब्रह्मणास कळेना । त्याची वृत्तिच वळेना । मिथ्या अभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥ ३५ ॥ राज्य नेलें म्लेंचिं क्षेत्रीं । गुरुत्व नेलें कुपात्रीं । आपण अरत्रीं ना परत्रीं । कांहींच नाहीं ॥ ३६ ॥ ब्रह्मणास ग्रामणीनें बुडविलें। विष्णूनें श्रीवत्स मिरविलें । त्याच विष्णूनें श्रापिलें । फरशरामें ॥ ३७ ॥ आम्हीहि तेचि ब्रह्मण । दुःखें बोलिलें हें वचन । वडिल गेले ग्रामणी करून । आम्हां भोवतें ॥ ३८ ॥ अतांचे ब्रह्मणीं काये केलें । अन्न मिळेना ऐसें जालें । तुम्हा बहुतांचे प्रचितीस आलें । किंवा नाहीं ॥ ३९ ॥ बरें वडिलांस काये म्हणावें । ब्रह्मणाचें अदृष्ट जाणावें । प्रस्ंगें बोलिलें स्वभावें । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ४०॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे युगधर्म निरूपण समास सातवा ॥
 
 
समास आठवा : अखंड ध्यान निरूपण ॥ श्रीराम ॥ बरें ऐसा प्रसंग जाला । जाला तो होऊन गेला। आतां तरी ब्राह्मणीं आपणाला । शाहाणे करावें ॥ १ ॥ देव पुजावा विमळहस्तीं । तेणें भाग्य पाविजे समस्तीं । मूर्ख अभक्त वेस्तीं । दरिद्र भोगिजे ॥ २ ॥ आधीं देवासवोळखावें । मग अनन्यभावें भजावें । अखंड ध्यानचि धरावें । सर्वोत्तमाचें ॥ ३ ॥ सर्वांमधें जो उत्तम । तया नाव सर्वोत्तम । आत्मानात्मविवेकवर्म । ठाईं पाडावें ॥ ४ ॥ जाणजाणों देह रक्षी । आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी । पदार्थमात्रास परीक्षी । जाणपणें ॥ ५ ॥ तो सकळ देहामधें वर्ततो। इंद्रियेंग्राम चेष्टवितो । प्रचितीनें प्रत्यये येतो । प्राणीमात्रीं ॥ ६ ॥ प्राणीमात्रीं जगदांतरें । म्हणोनि राखावीं अंतरें । दाता भोक्ता परस्परें । सकळ कांहीं ॥ ७ ॥ देव वर्ततो जगदांतरी । तोचि आपुलें अंतरीं । त्रैलोकींचे प्राणीमात्रीं । बरें पाहा ॥ ८ ॥ मुळीं पाहाणार तो येकला । सकळां ठाईं विभागला । देहप्रकृतीनें जाला । भिन्न भिन्न ॥ ९ ॥ भिन्न भासें देहाकारें । प्रस्तुता येकचि अंतरें । बोलणें चालणें निर्धारें । त्यासीच घडे ॥ १० ॥ आपुले पारिखे सकळ लोक । पक्षी स्वापद पश्वादिक । किडा मुंगी देहधारक । सकळ प्राणी ॥ ११ ॥ खेचर भूचर वनचर । नाना प्रकारें जळचर । चत्वार खाणी विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १२॥ समस्त जाणीवेनें वर्तती । रोकडी पाहवी प्रचिती । त्याची आपुली संगती । अखंड आहे ॥ १३॥ जगदांतरें वोळला धणी । किती येकवटील प्राणी । परी ते वोळायाची करणी । आपणापासीं ॥ १४ ॥ हें आपणाकडेंच येतें । राजी राखिजे समस्तें । देहासि बरें करावें तें । आत्मयास पावे ॥ १५ ॥ दुर्जन प्राणी त्यांतील देव । त्याचा लाताड स्वभाव । रागास आला जरी राव । तरी तंडों नये कीं ॥ १६ ॥ प्रसंगीं सांडीच करणें । पुढें विवेकें विवरणें । विवेक सज्जनचि होणें । सकळ लोकीं ॥ १७ ॥ आत्मत्वीं दिसतो भेद । हा अवघाचि देहसमंध । येका जीवनें नाना स्वाद । औषधीभेदें ॥ १८ ॥ गरळ आणि अमृत जालें । परी आपपण नाहीं गेलें । साक्षत्वें आत्मयास पाहिलें । पाहिजे तैसें ॥ १९ ॥ अंतरिनिष्ठ जो पुरुष । तो अंतरनिष्ठेनें विशेष । जगामधें जो जगदीश । तो तयास वोळखे ॥ २० ॥ नयनेंचि पाहावा नयेन । मनें शोधावें मन । तैसाचि हा भगवान । सकळां घटीं ॥ २१ ॥ तेणेंविण कार्यभाग आडे । सकळ कांहीं तेणेंचि घडे । प्राणी विवेकें पडावे । तेणेंचि योगें ॥ २२ ॥ जागृतीस व्यापार घडतो । समंध तयासीच पडतो । स्वप्नामधें घडे जो तो । येणेंचि न्यायें ॥ २३ ॥ अखंड ध्यानाचें लक्षण । अखंड देवाचें स्मरण । याचें कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४ ॥ सहज सांडून सायास । हाचि कोणीयेक दोष । आत्मा सांडून अनात्म्यास । ध्यानीं धरिती ॥ २५ ॥ परी तें धरितांहि धरेना । ध्यानीं येती वेक्ति ना । उगेंचि कष्टती मना । कासाविस करूनी ॥ २६ ॥ मूर्तिध्यान करिता। सायासें । तेथें येकाचें येकचि दिसे । भासों नये तेंचि भासे । विलक्षण ॥ २७ ॥ ध्यान देवाचें करावें । किंवा देवाल्याचें करावें । हेंचि बरें विवरावें । आपले ठाईं ॥ २८ ॥ देह देउळ आत्मा देव । कोठें धरूं पाहातां भाव । देव वोळखोन जीव । तेथेंचि लावावा ॥ २९ ॥ अंतरनिष्ठा ध्यान ऐसें । दंडकध्यान अनारिसें । प्रत्ययेविण सकळ पिसें । अनुमानध्यान ॥ ३० ॥ अनुमानें अनुमान वाढे । ध्यान धरितां सवेंचि मोडे । उगेचि कष्टती बापुडे । स्थूळध्यानें ॥ ३१ ॥ देवास देहधारी कल्पिती । तेथें नाना विकल्प उठती । भोगणें त्यागणें विपत्ति । देहयोगें ॥ ३२ ॥ ऐसें मनी आठवतें । विचारितां भलतेंचि होतें । दिसों नये तें दिसतें । नाना स्वप्नीं ॥ ३३ ॥ दिसतें तें सांगतां न ये । बळें भावर्थ धरितां नये । साधक कासाविस होये । अंतर्यामीं ॥ ३४ ॥ सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्ष आपुलें मन । मनामध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ॥ ३५ ॥ फुटक मन येकवटिलें । तेणें तुटक ध्यान केलें । तेथें कोण सार्थक जालें । पाहाना कां ॥ ३६ ॥ अखंड ध्यानें न घडे हित । तरी तो जाणावा पतित । हाचि अर्थ सावचित । बरा पाहावा ॥ ३७ ॥ ध्यान धरितें तें कोण । ध्यानीं आठवतें तें कोण । दोनीमधें अनन्य लक्षण । असिलें पाहिजे ॥ ३८ ॥ अनन्य सहजचि आहे । साधक शोधून न पाहे । ज्ञानी तो विवरोन राहे । समाधानें ॥ ३९ ॥ ऐसीं हे प्रत्ययाची कामें । प्रत्ययेंविण बाधिजे भ्रमें । लोकदंडकसंभ्रमें । चालती प्राणी ॥ ४० ॥ दंडकध्यानाचें लक्षण । धरून बैसलें अवलक्षण । प्रमाण आअणि अप्रमाण । बाजारी नेणती ॥ ४१ ॥ मिथ्या समाचार उठविती । बाउग्याच बोंबा घालिती । मनांस आणितां अंतीं । आवघेंचि मिथ्या ॥ ४२ ॥ कोणीयेक ध्यानस्त बैसला । कोणीयेक सिकवी त्याला । मुकुट काढूनि माळ घाला । म्हणिजे बरें ॥ ४३ ॥ मनाचेथें काये दुष्काळ । जे आखुड कल्पिती माळ । सांगते ऐकते केवळ । मूर्ख जाणावे ॥ ४४ ॥ प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती । दोरे फुलें गुंफावी न लगती । कल्पनेची माळ थिटी करिती । काये निमित्य ॥ ४५ ॥ बुधीविण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ । तया मुर्खासीं खळखळ । कोणें करावी ॥ ४६ ॥ जेणें जैसा परमार्थ केला । तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला । साता पांचाचा बळावला । साभिमान ॥ ४७ ॥ प्रत्ययेंविण साभिमान । रोगी मारिले झांकून । तेथें अवघाची अनुमान । ज्ञान कैंचें ॥ ४८ ॥ सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा । माया पूर्वपक्ष खंडावा । विवेकबळें ॥ ४९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अखंडध्याननिरूपणनाम समास आठवा ॥
 
 
समास नववा : शाश्वत निरूपण ॥ श्रीराम ॥ पिंडाचें पाहिलें कौतुक । शोधिला आत्मानात्मा विवेक । पिंड अनात्मा आत्मा येक । सकळ कर्ता ॥ १ ॥ आत्म्यास अनन्यता बोलिली । ते विवेकें प्रत्यया आली । आतां पाहिजे समजली । ब्रह्मांडरचना ॥ २ ॥ आत्मानात्माविवेक पिंडी । सारासारविचार ब्रह्मांडी। विवरविवरों हे गोडी । घेतली पाहिजे ॥ ३ ॥ पिंड कार्य ब्रह्मांड कारण । याचें करावें विवरण । हेंचि पुढें निरूपण । बोलिलें असे ॥ ४ ॥ असार म्हणिजे नासिवंत । सार म्हणिजे तें शाश्वत । जयास होईल कल्पांत । तें सार नव्हे ॥ ५ ॥ पृथ्वी जळापासून जाली । पुढें ते जळीं मिळाली । जळाची उत्पत्ति वाढली । तेजापासुनी ॥ ६ ॥ ते जळ तेजें शोषिलें । महत्तेजें आटोन गेलें । पुढें तेजचि उरलें । सावकाश ॥ ७ ॥ तेज जालें वायोपासुनी । वायो झडपी तयालागुनी । तेज जाउनी दाटणी । वायोचीच जाली ॥ ८ ॥ वायो गगनापासुनी जाला । मागुतां तेथेंचि विराला । ऐसा हा कल्पांत बोलिला । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥ गुणमाया मूळमाया । परब्रह्मीं पावती लया । तें परब्रह्म विवराया । विवेक पाहिजे ॥ १० ॥ सर्व उपाधींचा सेवट । तेथें नाहीं दृश्य खटपट । निर्गुण ब्रह्म घनदाट । सकळां ठाईं ॥ ११ ॥ उदंड कल्पांत जाला । तरी नाश नाहीं तयाला । मायात्यागें शाश्वताला । वोळखावें ॥ १२ ॥ देव अंतरात्मा सगुण । सगुणें पाविजे निर्गुण । निर्गुणज्ञानें विज्ञान । होत असे ॥ १३ ॥ कल्पनेतीत जें निर्मळ । तेथें नाहीं मायामळ । मिथ्यत्वें दृश्य सकळ । होत जातें ॥ १४ ॥ जें होते आणि सवेंचि जातें । तें तें प्रत्ययास येतें । जेथें होणें जाणें नाहीं तें । विवेकें वोळखावे ॥ १५ ॥ येक ज्ञान येक अज्ञान । येक जाणावें विपरीत ज्ञान । हे त्रिपुटी होये क्षीण । तेंचि विज्ञान ॥ १६ ॥ वेदांत सिधांत धादांत । याची पाहावी प्रचित । निर्विकार सदोदित । जेथें तेथें ॥ १७ ॥ तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोन अनन्य राहावें मुख्य आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ १८ ॥ दृश्यास दिसते दृश्य । मनास भासतो भास । दृश्यभासातीत अविनाश । परब्रह्म तें ॥ १९ ॥ पाहों जातां दुरीच्या दुरी । परब्रह्म सबाहेअंतरीं । अंतचि नाहीं अनंत सरी । कोणास द्यावी ॥ २० ॥ चंचळ तें स्थिरावेना । निश्चळ तें कदापी चळेना । आभाळ येतें जातें गगना । चळण नाहीं ॥ २१ ॥ जें विकारें वाढें मोडे । तेथें शाश्वतता कैंची घडे । कल्पांत होताच विघडे । सकळ कांहीं ॥ २२ ॥ जे अंतरींच भ्रमलें । मायासंभ्रमें संभ्रमलें । तयास हें कैसें उकले । आव्हाट चक्र ॥ २३ ॥ भिडेनें वेव्हार निवडेना । भिडेनें सिधांत कळेना । भिडेनें देव आकळेना । आंतर्यामीं ॥ २४ ॥ वैद्याची प्रचित येईना । आणी भीडहि उलंघेना । तरी मग रोगी वांचेना । ऐसें जाणावें ॥ २५ ॥
 
जेणें राजा वोळखिला । तो राव म्हणेना भलत्याला । जेणें देव वोळखिला । तो देवरूपी ॥ २६ ॥ जयास माईकाची भीड । तें काये बोलेल द्वाड । विचार पाहातां उघड । सकळ कांहीं ॥ २७ ॥ भीड मायेऐलिकडे । परब्रह्म तें पैलीकडे । पैलीकडे ऐलीकडे । सदोदित ॥ २८ ॥ लटिक्याची भीड धरणें । भ्रमें भलतेंचि करणें । ऐसी नव्हेंतीलक्षणें । विवेकाचीं ॥ २९ ॥ खोटें आवघेंचि सांडावें । खरें प्रत्ययें वोळखावें । मायात्यागें समजावें । परब्रह्म ॥ ३० ॥ तें मायेचें जें लक्षण । तेंचि पुढें निरूपण । सुचितपणें विवरण । केलें पाहिजे ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शाश्वतनिरूपणनाम समास नववा ॥
 
 
समास दहावा : मायानिरूपण ॥ श्रीराम ॥ माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे । माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥ १ ॥ करंटा पडोनि उताणा । करी नानापरी कल्पना । परी तें कांहींच घडेना । तैसी माया ॥ २ ॥ द्रव्यदारेचें स्वप्नवैभव । नाना विळासें हावभाव । क्षणीक वाटे परी भाव । तैसी माया ॥ ३ ॥ गगनीं गंधर्वनगरें । दिसताती नाना प्रकारें । नाना रूपें नाना विकारें । तैसी माया ॥ ४ ॥ लक्षुमी रायेविनोदाची । बोलतां वाटे साची । मिथ्या प्रचित तेथीची । तैसी माया ॥ ५ ॥ दसर्याचे सुवर्णाचे लाटे । लोक म्हणती परी ते कांटे । परी सर्वत्र राहाटे । तैसी माया ॥ ६ ॥ मेल्याचा मोहोछाव करणें । सतीचें वैभव वाढविणें । मसणीं जाउनी रुदन करणें । तैसी माया ॥ ७ ॥ राखेसी म्हणती लक्षुमी । दुसरी भरदोरी लक्षुमी । तिसरी नाममात्र लक्षुमी । तैसी माया ॥ ८ ॥ मुळीं बाळविधवा नारी । तिचें नांव जन्मसावित्री । कुबेर हिंडे घरोघरी । तैसी माया ॥ ९ ॥ दशावतारांतील कृष्णा । उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा । नदी नामें पीयुष्णा । तैसी माया ॥ १० ॥ बहुरूपांतील रामदेवराव । ग्रामस्तांपुढे दाखवी हावभाव । कां माहांराज म्हणोनि लाघव । तैसी माया ॥ ११ ॥ देव्हारां असे अन्नपूर्णा । आणी गृहीं अन्नचि मिळेना । नामें सरस्वती सिकेना । शुभावळु ॥ १२ ॥ सुण्यास व्याघ्र नाम ठेविलें । पुत्रास इंद्रनामें पाचारिलें । कुरूप परी आळविलें । सुंदरा ऐसें ॥ १३ ॥ मूर्ख नामें सकळकळा । राशभी नामें कोकिळा । नातरी डोळसेचा डोळा । फुटला जैसा ॥ १४ ॥ मातांगीचें नाम तुळसी । चर्मिकीचें नाम कासी । बोलती अतिशूद्रिणीसी । भागीरथी ऐसें ॥ १५ ॥ साउली आणी अंधकार । येक होतां तेथीचा विचार । उगाचि दिसे भासमात्र । तैसी माया ॥ १६ ॥ श्रवण बोटें संधी करतळ । रविरश्में दिसती इंगळ । रम्य आरक्तकल्होळ । तैसी माया ॥ १७ ॥ भगवें वस्त्र देखतां मनाला । वाटे अग्नचि लागला । विवंचितां प्रत्ये आला । तैसी माया ॥ १८ ॥ जळीं चरणकरांगुळें । आखुड लांबें जिरकोळें । विपरीत काणें दिसती जळें । तैसी माया ॥ १९ ॥ भोवंडीनें पृथ्वी कलथली । कामिणीनें पिवळी जाली । सन्यपातस्थां अनुभवली । तैसी माया ॥ २० ॥ कोणीयेक पदार्थविकार । उगाचि दिसे भासमात्र । अनन्याचा अन्य प्रकार । तैसी माया ॥ २१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मायानिरूपणनाम समास दहावा ॥
 
॥ दशक चौदावा समाप्त ॥

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती