IND vs BAN LIVE स्कोअर इथे पाहा : भारताला जिंकण्यासाठी 257 धावांची गरज, हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त

गुरूवार, 19 ऑक्टोबर 2023 (18:09 IST)
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विश्वचषक स्पर्धेतील सामना पुण्यात होतोय. भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे बांगलादेशच्या फलंदाजांना वेगाने धावा करता आलेल्या नाहीत.
 
भारतीय गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केल्यामुळे बांगलादेशच्या फलंदाजांना फारसं काही करता आलं नाही. नियमित अंतराने विकेट पडत असल्यामुळे सलामीवीरांच्या अर्धशतकानंतर एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही.
 
डावाच्या सुरुवातीला तांझिद हसन आणि लिटन दास या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागिदारी केली. वन-डे विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागिदारी आहे.
 
तत्पूर्वी बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांटोनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
 
बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात शाकिबला दुखापत झाली होती.
 
विराट कोहलीला का करावी लागली गोलंदाजी ?
भारताकडून हार्दिक पांड्यानं नवव्या ओव्हरची सुरूवात केली होती. लिटन दासनं त्याच्या पहिल्या तीन बॉलवरच दोन चौकार लगावले. लिटननं लगावलेला फटका अडवताना हार्दिकचा पाय दुखावला.
 
हार्दिकवर काही वेळ मैदानात उपचार करण्यात आले. त्या उपचारानंतरही त्याला गोलंदाजी करणं शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर रोहितनं विराटला हार्दिकची उर्वरित ओव्हर पूर्ण करण्यास सांगितलं.
 
सध्या हार्दिकच्या दुखापतीची तपासणी करण्यात येतीय. हार्दिकच्या पायाचे स्कॅन करण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयनं ट्विट करून दिलीय.
 
या सामन्यासाठी दोन्ही संघ असे आहेत :
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज
 
बांगलादेश : तांझिद हसन, लिटन दास, नजमुल हुसेन शांटो (कर्णधार), तौहिद ऱ्हिदोय, मुश्फिकुर रहीम (यष्टीरक्षक), मेहिदी हसन मिराझ, महमदुल्ला, नसुम अहमद, हसन महमुद, शोरीफुल इस्लाम, मुस्ताफिजूर रहमान
 
भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यांचा इतिहास काय आहे?
यापूर्वीचा इतिहास काहीही असला तरी मैदानात उतरल्यावर तो कामाला येत नाही. हा खेळातला नियम अफगाणिस्ताननं इंग्लंडला आणि नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत सिद्ध केलाय.
 
2007 मधील अनुभव गाठीशी असल्यानं भारतीय टीम तरी बांगलादेशला कमी लेखण्याची चूक कधीही करणार नाही.
 
16 वर्षांपूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशकडून पराभूत झाल्यानं टीम इंडियाचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं होतं.
 
पुण्यात 27 वर्षांनी सामना
भारत- बांगलादेश सामन्याचा निकाल काहीही लागो. या सामन्यातील पहिला बॉल पडताच पुण्यात एक नवा इतिहास रचला जाईल.
 
पुण्यात तब्बल 27 वर्षांनी वर्ल्ड कप मॅच होते आहे. याआधी नेहरू स्टेडियमवर 1996 सालच्या विश्वचषकात वेस्ट इंडीज विरुद्ध केनिया सामना झाला होता, ज्यात केनियानं विंडीजला 73 रन्सनी हरवलं होतं.
 
गहुंजे इथल्या एमसीए स्टेडियमवर पहिल्यांदाच विश्वचषकाच्या सामन्याचं आयोजन होतंय.
 
उपांत्य फेरीवर नजर
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यावर विजय मिळवून पुण्यात दाखल झालीय. तर, बांगलादेशला पहिल्या तीन सामन्यात एकच विजय मिळवता आलाय.
 
या स्पर्धेतील सलग चौथा सामना जिंकून उपांत्य फेरीच्या दिशेनं दमदार पाऊल टाकण्याची संधी यजमानांना आहे.
 
कर्णधार रोहित शर्माला गवसलेला फॉर्म ही टीम इंडियाची या स्पर्धेतील सर्वात दिलासादायक बाब आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितनं अफगाणिस्तान विरुद्ध विक्रमी शतक झळकावलं. तर पाकिस्तान विरुद्ध आणखी खेळ उचांवत रोहितनं 63 चेंडूत 86 धावांची खेळी केली होती.
 
शुबमन गिलच्या पुनरागमनामुळे फलंदाजी आणखी मजबूत झालीय. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांनीही या स्पर्धेत अर्धशतक झळकावलंय.
 
जसप्रीत बुमरा हे गोलंदाजीत भारतीय टीमचं मुख्य अस्त्र आहे. बुमरानं पहिल्या तीन सामन्यात 8 विकेट्स घेतल्यात. त्याला कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजाची उत्तम साथ मिळतीय.
 
शार्दूल ठाकूरला मागील दोन सामन्यात फारसा प्रभाव टाकता आलेला नाही. पण पुण्यात शार्दूलचा रेकॉर्ड चांगला असून त्यानं इथं 3 सामन्यात 7 विकेट्स घेतल्यात.
 
बांगलादेशच्या बाजूची गोष्ट
बांगलादेशला 2007 नंतर भारतीय टीमला एकदाही हरवता आलेलं नाही. पण,दोन्ही टीममधील मागच्या चार सामन्यांचा इतिहास बांगलादेशच्या बाजूनं आहे.
 
पाहुण्या टीमनं मागील चार पैकी तीन सामन्यात टीम इंडियाचा पराभव केलाय. यामध्ये नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेतील सामन्याचाही समावेश आहे.
 
बांगलादेशला सलामीवीर लिट्टन दासकड़ून मोठी अपेक्षा असेल. लिटननं इंग्लंड विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं.
 
मेहिदी हसन मिराझचा भारताविरुद्धचा फॉर्मही बांगला टायगर्ससाठी जमेची बाजू आहे. भारतीय टीमनं 2022 साली बांगलादेशचा दौरा केला होता.
 
त्या दौऱ्यातील तीन वन-डे सामन्यात मेहिदीनं 141 धावा आणि 11 विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी केली होती.
 
2007 मधील ऐतिहासिक विजयाचा अनुभव असलेल्या कर्णधार शाकीब अल हसन आणि यष्टीरक्षक मुश्फिकूर रहीम यांची ही पाचवी विश्वचषक स्पर्धा आहे. या अनुभवी खेळाडूंना रोखण्यासाठी भारतीय गोलंदाजांना खास रणनीती आखावी लागेल.
 
पुण्यातील इतिहास कुणाच्या बाजूनं?
गहुंजेतील एमसीए स्टेडियमवर टीम इंडियाची कामगिरी संमिश्र आहे. इथं झालेल्या सात पैकी चार सामन्यात भारतीय टीमनं विजय मिळवला असून तीन सामन्यात त्यांना पराभव सहन करावा लागला आहे.
 
बांगलादेशची टीम पुण्यात पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळतीय.
 
सात सामन्यांपैकी 4 वेळा पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या तर 3 वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं इथं बाजी मारलीय.
 
पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची येथील सरासरी धावसंख्या 307 असून दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या 281 आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती