विश्वचषक स्पर्धेतील पहिले 5 यष्टीरक्षक

मंगळवार, 21 मे 2019 (16:25 IST)
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या पहिल्या 5 यष्टीरक्षकात कुमार संगाकारा, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, महेंद्रसिंग धोनी, ब्रेंडन मक्युलुम यांचा समावेश आहे.
 
भारताच्या संघात ऋषभ पंत याला संधी देण्यात यावी अशी मागणी होती. मात्र महेंद्रसिंग धोनी याच्याबरोबर राखीव यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक याची निवड करण्यात आली आहे. धोनी अजूनही तंदुरुस्त आहे. त्याने आयपीएलमध्ये आपली चमक दाखवली आहे. यष्ट्यांमागे चपळाईने झेल टिपणे आणि यष्टीचीत करणे यामध्ये धोनीचा हात कोणीच धरू शकत नाही. पण विश्वचषक स्पर्धेत गडी बाद करण्याच्या बाबतीत धोनी हा नंबर 1 नाही.
 
विश्वचषकात यष्ट्यांमागे बाद करणारा सर्वाधिक यशस्वी यष्टीरक्षक म्हणून श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगाकारा ठरला आहे. त्याच्या खात्यात  आतापर्यंत 37 सान्यांत 54 गडी आहेत. यात 41 झेल आणि 13 यष्टीचीत आहेत. ऑस्ट्रेलियाचा निवृत्त तडाखेबाज खेळाडू अ‍ॅडम गिलख्रिस्ट हा विश्वचषक स्पर्धेतील दुसर्‍या क्रमांकाचा यशस्वी यष्टीरक्षक आहे. त्याने 31 सामन्यात 52 गडी बाद केले आहेत. यापैकी 45 झेलबाद असून 7 गडी यष्टीचीत आहेत.
 
महेंद्रसिंग धोनी- भारताचा अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याने 20 सामन्यात यष्ट्यांमागून 32 गडी माघारी पाठवले आहेत. यात 27 झेल आणि 5 यष्टीचीत खेळाडू आहेत. धोनी या यादीत तिसरा असला तरी संगाकारा आणि गिलख्रिस्ट या दोघांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असल्याने धोनीला या विश्वचषकात चांगली कामगिरी करून सर्वोत्तम ठरण्याची आणि या यादीत अव्वल ठरण्याची संधी आहे.
 
ब्रेंडन मॅक्युलम - न्यूझीलंडचा माजी यष्टीरक्षक ब्रेंडन मक्युलम हा देखील धोनीसह 32 गडी बाद करून संयुक्त तिसर्‍यास्थानी आहे. त्याने 30 गडी झेलबाद केले असून 2 गडी यष्टीचीत बाद केले आहेत.
 
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू मार्क बाऊचर याने 25 सामन्यात यष्टीरक्षक म्हणून 31 बळी टिपले आहेत. बाऊचरने 1999, 2003 आणि 2007 अशा 3 विश्र्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती