इंग्लंडचे आव्हान कायम व भारताला पहिला धक्का

सोमवार, 1 जुलै 2019 (10:57 IST)
निर्णायक सामन्यात दमदार खेळ करत इंग्लंडने अपराजित असलेल्या भारतावर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 337 धावा फटकावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चांगली झुंज दिली, पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि भारताला 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने 50 षटकात 5 बाद 306 धावा केल्या. भारतासाठी हा पहिला पराभवाचा ध्रक्का होता.
 
इंग्लंडच्या 338 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा सलामीवीर लोकेश राहुल हा एकही धाव न करता बाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी संघाला स्थैर्य मिळवून दिले. स्थिरस्थावर झाल्यावर मात्र रोहीत कोहलीपेक्षा अधिक आक्रकपणे खेळताना दिसला. कोहली आणि रोहीत या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचली. लायम प्लंकेटने यावेळी कोहलीला बाद करत ही जोडी फोडली. कोहलीला 66 धावा करता आल्या. कोहली बाद झाल्यावर रोहितने या विश्वचषकातील तिसरेशतक झळकावले खरे, पण शतकानंतर त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. रोहीतने 15 चौकारांच्या जोरावर 102 धावा केल्या. रोहीत बाद झाल्यावर हार्दिक पंड्याने काहीकाळ आक्रकपणे फटकेबाजी केली, पण त्याला 45 धावा करता आल्या. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने काहीकाळ किल्ला लढवला.
 
इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजीला चांगलंच झोडपलं. इंग्लंडचे सलामीवीर आणि बेन स्टोक्सच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. हा धावांचा डोंगर भारतीय संघ जोरदार फटकेबाजी करून सर करणार का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने यावेळी भेदक मारा केला, नाहीतर इंग्लंडचा संघ चारशे धावांच्या जवळपास जाऊ शकला असता. शमीने या सामन्यात पाच बळी मिळवत इंग्लंडच्या धावसंख्येवर दबाव आणण्याचे काम चोख बजावले. इंग्लंडच्या फलंदाजांनी फटकेबाजी करत भारतापुढे 338 धावांचे आव्हान ठवले.
 
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉय आणि जॉनी बेअरस्टोव यांनी भारताच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत दोघांनी अर्धशतके झळकावली. या दोघांनी 160 धावांची सलामी दिली. यानंतर रॉयने कुलदीप यादवच्या चेंडूवर मोठा फटका लगावला. हा चेंडू आता चौकार जाणार असे वाटत होते. पण मैदानात आलेल्या बाराव्या खेळाडूने (रवींद्र जडेजा) सूर लगावत झेल टिपला आणि भारताला पहिले यश मिळाले. 
 
रॉय बाद झाल्यावरही जॉनी दमदार फटकेबाजी करत होता. बेअरस्टोव हा भारतीय गोलंदाजीची पिसे काढत होता. जॉनीला बाद कसे करायचे, हा पेच कोहलीपुढे होते. त्यावेळी कोहलीने शमीला गोलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी शमीने कोहलीचा विश्वास सार्थ ठरवला. शमीने यावेळी फक्त जॉनीलाच बाद केले नाही तर इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनलाही स्वस्तात तंबूत धाडले. जॉनीने यावेळी 10 चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 111 धावांची खेळी साकारली.
 
जॉनी बाद झाल्यावर बेन स्टोक्सने इंग्लंडची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला जो रूट आणि जोस बटलर यांची साथ मिळाली. पण या दोघांनाही जास्त धावा करता आल्या नाहीत. स्टोक्सने 54 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 79 धावा केल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती