वर्ल्ड कप 2019: इंग्लंडला हरवून भारत सेमी फायनलला जाणार का?

सेमी फायनलच्या तीन जागांसाठी मुकाबला आता चुरशीचा झाला असून, टीम इंडियासमोर आता इंग्लंडचं आव्हान आहे.
 
टीम इंडियाला सेमी फायलनमध्ये जागा पक्की करण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. इंग्लंडला पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने पराभवाचा दणका दिल्याने त्यांचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. इंग्लंडला उर्वरित दोन्ही लढतीत विजय मिळवणं क्रमप्राप्त आहे.
 
भारतीय संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. भारतीय संघाने पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजला नमवलं आहे. न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाली होती.
 
दुसरीकडे इंग्लंडने दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज यांना नमवलं मात्र ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे इंग्लंडला भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे.
 
हेड टू हेड
भारत आणि इंग्लंड वर्ल्ड कपमध्ये सातवेळा एकमेकांसमोर आले आहेत. भारताने 3 तर इंग्लंडने 3 मॅचेस जिंकल्या आहेत. एक मॅच टाय झाली आहे. त्यामुळे विजयाचं पारडं 50-50 असं आहे. 2011 वर्ल्ड कप स्पर्धेत या दोन संघांमध्ये शेवटचा मुकाबला झाला होता. ती मॅच टाय झाली होती.
 
खेळपट्टी आणि वातावरण
बर्मिंगहॅमच्या मैदानावर दोन मॅच झाल्या आहेत. या दोन्हीमध्ये मोठ्या धावसंख्येची नोंद झाली नाही.
 
संघ
भारत- विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल.राहुल, ऋषभ पंत, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या.
 
इंग्लंड-इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जेम्स विन्स, जो रूट, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, लायम प्लंकेट, मार्क वूड, आदिल रशीद, मोईन अली, जोफ्रा आर्चर, लायम डॉसन, टॉम करन.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती