मुंबईत म्युकर मायकोसिस आजाराचा धोका झाला कमी

शनिवार, 31 जुलै 2021 (08:02 IST)
मुंबईत म्युकर मायकोसिस आजाराचा धोका कमी होत असल्याची माहिती मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मुंबईत आतापर्यंत म्युकर मायकोसिसच्या 904 रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यापैकी 571 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 135 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून यात मुंबईचे केवळ 46 सक्रिय रुग्ण आहेत. म्युकर मायकोसिस हा बुरशीजन्य आजार डोळे, नाक आणि मेंदूवर परिणाम करतो. 
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला म्युकर मायकोसिस रुग्णांची संख्या जलदगतीनं वाढत होती. त्यामुळं चिंतेचं वातावरण पसरलं होतं. पण योग्य उपचार पद्धतीमुळे म्युकर मायकोसिसचे रुग्ण लवकर बरे होत आहेत. एकूण 904 रुग्णांपैकी मुंबईतील फक्त 264 रुग्ण म्युकर मायकोसिसचे होते. तर 620 रुग्ण मुंबईबाहेरील होते. मुंबईत 178 जणांचा म्युकर मायकोसिसमुळे मृत्यू झाला असून मृतांमध्ये मुंबईतील 52 रुग्ण दगावले आहेत.दरम्यान, मुंबईत अंधेरी पूर्वमध्ये प्रायोगिक तत्वावर अंथरूणावर खिळून असलेल्या म्हणजे बेड रिडन रुग्णांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. येत्या सोमवारपासून संपूर्ण मुंबईतील 24 वॉर्डमध्ये अशा रुग्णांच्या लसीकरणाचा प्रारंभ होणार आहे.मुंबईतून सुमारे साडेचार हजार बेड रिडन रुग्णांनी याकरता नोंदणी केली असून त्यांना सोमवारपासून लस दिली जाणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती