रुग्णालयातून सुट्टीसाठी ओमायक्रॉनबाधिताचा अजब हट्ट!

शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (22:30 IST)
सध्या महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉन शिरकाव केल्याने, आरोग्य यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह औरंगाबदमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. दुबई वारी करून औरंगाबादमध्ये आलेल्या एका तरुणाला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या रुग्णावर चिकलठाणा येथे महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे.
सध्या ओमायक्रॉन रुग्णाबाबत स्थानिक यंत्रणा अधिक सतर्क असून, केंद्र सरकारच्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचा स्थानिक प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे. अशात ओमायक्रॉन बाधित रुग्णाला १४ दिवसांनंतर घरी सोडले जावे, असा नियम आहे. मात्र अशातही हा रुग्ण ‘मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, त्यामुळे मला सुट्टी हवी आहे, असा हट्ट धरून बसला आहे.’ या तरुणाचा हट्ट बघता महापालिका प्रशासनही पेचात सापडले आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून याबाबत निर्देश मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे.
दरम्यान, शहरात आतापर्यंत दोन रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी या दोघांचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील एक औरंगाबादमधील मूळ रहिवासी व सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यांची मुलगी मुंबईतच पॉझिटिव्ह आली होती, तर वडील औरंगाबादला आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाले. दुसरा रुग्ण सिडको एन-७ येथील रहिवासी आहे. तो दुबईहून १७ डिसेंबरला शहरात आला. त्याचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले आहे.
अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी त्याचा दहावा दिवस होता. पण गेल्या दोन दिवसांपासून तो सुट्टीसाठी प्रशासनावर प्रचंड दबाव आणत आहे. कुठलीही तीव्र लक्षणे नसताना हॉस्पिटलमध्ये ठेवताच कशाला? मी घरी विलगीकरणात राहतो, असे सांगून त्याने डॉक्टरांना भांडावून सोडले आहे. महापालिकेने यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाला अधिक तपशील पाठवून दिला आहे. त्याचबरोबर त्याचा अहवालही केंद्राला पाठविला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती