नाशिक जिल्ह्यात इतक्या जणांचे झाले लसीकरण !

शुक्रवार, 16 जुलै 2021 (23:28 IST)
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे वाईट अनुभव आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने वेगाने लसीकरणास सुरुवात केली आहे. पण जिल्ह्याची स्थिती पाहता अद्यापही तब्बल ५६ लाख ६७ हजार ४५५ जणांचे लसीकरण होणे बाकीच आहे. आतापर्यंत १६ लाख २१ हजार ५३५ जणांनी लस घेतली असून १२ लाख ६१ हजार ३२८ जणांनी पहिला तर ३ लाख ६० हजार २०७ जणांनी दुसरा प्रतिबंधक डोस घेतला आहे.
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सामान्यांमध्ये भीती होती. त्यानंतर काळातच जगभर विविध प्रकारच्या लसींची निर्मितीही झाली. प्रथम नागरिकांनी लस घेण्याबाबत अनुत्सुकता दाखविली. मात्र दुसरी लाट आली अन् अनेकांना प्राण गमवावा लागला. त्यातून लस उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांचा कल वाढला. अन् आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लस घेण्यासाठी नागरिकांची तर झुंबडच उडाली आहे.
 
केंद्राकडून डोस कमी प्रमाणत उलब्ध होत असल्याने लसीकरण केंद्राबाहेर तर लसीकरणाच्या दिवशी रांगाच लागत आहेत. याच स्थितीत जिल्ह्यास गुरुवारी ४३ हजार लसचे डोस प्राप्त झाले. त्याचे शहर, ग्रामीण असे लोसंख्येच्या प्रमाणात वितरणही झाले आहे. जिल्ह्याचा विचार केला तर ग्रामीण भागात ४८ लाख १६ हजार २३७ इतके लसीकरणास पात्र नागरिक राहातात. नाशिक मनपा हद्दीत १९ लाख १० हजार २३१ इतके तर मालेगाव मनपामध्ये ५ लाख ६२ हजार ५२२ इतके पात्र नागरिक राहातात.
 
अशा एकूण ७२ लाख ८८ हजार ९९० जणांना लस देण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट असून, त्यासाठी वाया जाण्याचे प्रमाण विचारात घेता १ कोटी २४ लाख ३२ हजार ५३९ डोसेसची आवश्यकता आहे. परंतु सध्या जिल्ह्यात आठवड्याला ४० हजार डोसही महत्प्रयासाने उपलब्ध होत असल्याने केव्हा ही सव्वा कोटी डोस प्राप्त होतील अन् जिल्ह्यातील सर्वच नागरिकांचे लसीकरण होईल, याच चिंतेत प्रशासन आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती