पुढच्या महिन्यापासून कोवॅक्‍सिनचे पुण्यात उत्पादन

सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (16:08 IST)
भारत बायोटेक कंपनीची करोना प्रतिबंधक लस कोवॅक्‍सिनचे उत्पादन पुण्यातील मांजरी येथील कंपनीत सुरू होणार आहे. लस उत्पादनाची प्रायोगिक चाचणी सुरू करण्यात आली आहे. डिसेंबरपासून लसींचे उत्पादन सुरू होऊन त्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
 
देशावरील करोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या इंटरवेट इंडिया प्रा लि.’ (बायोवेट) कंपनीची जागा मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता.
त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली व दाद मागितली. उच्च न्यायालयाने करोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन हवेली तालुक्‍यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने या प्रकल्पासाठी या जागेचा ताबादेखील दिला. आता भारत बायोटेककडून लसीचे उत्पादन करण्यासाठी आवश्‍यक ती तयारी करण्याचे काम वेगाने सुरू आहे.
लस उत्पादनाची कंपनीकडून तयारी पूर्ण झाली आहे. पुढील आठवड्यात कंपनीला भेट देऊन पाहणी करणार आहोत. त्यानंतर प्रत्यक्ष उत्पादन सुरू होईल. या कंपनीतून साडेसात कोटी लसींचे उत्पादन करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी वीजपुरवठा, पर्यावरणविषयक परवानगी, जागेचे हस्तांतरण, करारनामे आदी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कंपनीकडून मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीची तयारी पूर्ण झाली आहे. कंपनीसाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश यापूर्वीच पुणे महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार दररोज सात ते आठ टॅंकर पाणी पुरवठा होत आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती