नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) महाराष्ट्र राज्य शाखेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात ‘निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक’ सुरु करण्यात येत आहेत. सदर इम्युनिटी क्लिनिक प्रकल्पाला महाराष्ट्र कोविड 19 आयुष टास्क फोर्सकडून परवानगी दिली मिळाली आहे. त्यामुळे आता राज्यात सुमारे 400 क्लिनिक सुरु करण्यात येत आहेत. तर नाशिक जिल्ह्यात 55 क्लिनिक सुरू करण्यात येत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निमा महाराष्ट्र राज्य शाखेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र कोविड 19 आयुष टास्क फोर्सचे प्रमुख पद्मश्री डॉ तात्यारावजी लहाने यांच्यासोबत राज्यातील कोविड 19 च्या सद्य परिस्थितीवर विडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. सदर चर्चेत उपचारांसोबतच मुख्यतः इम्युनिटी क्लिनिकची संकल्पना निमा महाराष्ट्र राज्य शाखेने सादर केली. यावेळी सविस्तर चर्चेनंतर निमाच्या माध्यमातून प्रस्तावित ‘निमा इम्युनिटी आयुर्वेद क्लिनिक’ ची संकल्पना सर्व मान्यवरांना आवडली. याबाबतची संपूर्ण माहिती शासनाकडे पाठविण्यात आली. त्यानंतर सुरुवातीला सुमारे 400 क्लिनिक सुरु करुन ही संकल्पना राज्यात सर्वत्र राबविण्यास महाराष्ट्र कोविड 19 आयुष टास्क फोर्सने परवानगी दिली आहे. या ‘निमा इम्युनिटी आयुर्वेद क्लिनिक’चे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टला दिवशी करण्यात येत आहेत. याविषयीची माहिती अशी माहिती निमा नाशिक अध्यक्षा डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी दिली.
कोविड 19 या आजारावर अजूनहीभावी औषधे किंवा लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे प्रतिकार शक्ती चांगली असल्यास आजार न होणे किंवा झाल्यास लवकर बरा होण्यास मदत होत असल्याचे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. याच धर्तीवर प्रतिकार शक्ती नैसर्गिक पद्धतीने वाढविण्यासाठी ही आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक ची संकल्पना समोर आली आहे. निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकची ही संकल्पना पद्मश्री मा. डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच राबविता येणे शक्य झाले आहे. त्यामुळेच निमा लहाने यांना आपले प्रेरणास्थान मानत आहे.
निमा सदस्य डॉक्टरांद्वारा आपापल्या क्लिनिकमध्ये ही इम्युनिटी क्लिनिक पहिल्या टप्प्यात जिल्हा आणि तालुका ठिकाणी मोठ्या संख्येने सुरु करत आहेत. या क्लिनिक मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रश्नावलीद्वारा संपूर्ण माहिती घेऊन प्रकृती परीक्षण आणि इम्युनिटी स्कोअर निश्चित करण्यात येईल. त्यानंतर व्यक्तींनुसार आवश्यक असलेली आयुर्वेदिक औषधी देण्यात येतील. दैनंदिन जीवन पद्धतीतील बदल, व्यायाम, योगाभ्यास याचे व्यक्तिपरत्वे योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. प्रत्येक व्यक्तीने या क्लिनिकमध्ये मार्गदर्शन केल्याप्रमाणे 2 महिन्यात किमान 4 वेळा येणे आवश्यक राहिल. यावेळी उपाचारा दरम्यान कुठलीही फसवणूक होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे.
या निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकच्या संकल्पनेला प्रमुख मार्गदर्शक डॉ विनायक टेम्भूर्णीकर, अध्यक्ष निमा केंद्रीय शाखा, डॉ आशुतोष कुळकर्णी खजिनदार, महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ जी एस कुळकर्णी, सचिव महाराष्ट्र शाखा डॉ अनिल बाजारे, डॉ भूषण वाणी, कोषाध्यक्ष, यांचे मार्गदर्शन लाभले आहे. इम्युनिटी क्लिनिकला मूर्तरूप देण्यासाठी प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ तुषार सूर्यवंशी, प्रवक्ता निमा महाराष्ट्र, कोषाध्यक्ष, निमा महाराष्ट्र आणि डॉ मनीष जोशी, निमाचे वेबसाईट आणि तांत्रिक प्रमुख यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
इम्युनिटी क्लिनिक चे प्रकल्प समन्वयक म्हणून महाराष्ट्र शासन कोविड 19 आयुष टास्क फोर्स चे सदस्य डॉ संजय लोंढे, (अध्यक्ष- निमा मुंबई), डॉ शुभा राऊळ (माजी महापौर -बृहन्मुंबई, माजी अध्यक्ष निमा मुंबई वुमन्स फोरम) व डॉ राजश्री कटके ओ. एस. डी. आयुष टास्क फोर्स यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. राज्यातील जनतेने कोविड 19 च्या लढ्यातील एक भाग म्हणून आपली इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या इम्युनिटी क्लिनिकमध्ये जाऊन लाभ घ्यावा असे निमा महाराष्ट्र राज्य शाखेद्वारा कळविण्यात आले आहे.