Omicron : कोरोनाची लस घेतल्यानंतर काही जणांना रक्ताच्या गुठळ्या का होतात?

शनिवार, 4 डिसेंबर 2021 (07:49 IST)
गेल्या दीड-दोन वर्षात कोरोना जितक्या वेगानं पसरला, तितक्याच वेगानं त्यासंदर्भातील अफवाही पसरल्या. केवळ कोरोनाच्या विषाणू, आजाराबाबतच नव्हे, तर लशींबाबतही अफवा पसरल्या.
 
विशेषत: ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन झालेली आणि भारतात आपण जिला कोव्हिशिल्ड म्हणून ओळखतो ती लसही सुरुवातीला वादात सापडली होती.
 
कोव्हिशिल्डचा डोस घेतल्यानंतर काही जणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. मात्र, त्याचं प्रमाण अत्यल्प होतं. पुढे त्या संदर्भातील अफवा खोडून काढण्यात आल्या आणि नंतर जगाने ही लस स्वीकारलीही.
 
पण, आता ज्या अत्यल्प लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या, त्या कशामुळे यावरही संशोधनातून काही तथ्य समोर आली आहेत. लशीच्या सुधारित आवृत्तीमध्ये तसे बदल करता येणार आहेत. हे संशोधन नेमकं काय आहे आणि त्याचा उपयोग काय, हे आपण जाणून घेऊया.
जगभरात आतापर्यंत या लशीचे काही अब्ज डोस दिले गेले आहेत. भारतातही एक अब्ज अकरा कोटीच्या वर डोस कोव्हिशिल्डचे आहेत.
 
पण, युकेमध्ये दिलेल्या दोन कोटी पन्नास लाख लोकांपैकी 73 लोकांचा रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू झाला आणि तिथून भुवया उंचावल्या.
युरोपच्या शेजारी देशांमधूनही अशी काही प्रकरणं समोर आली. त्यामुळे मग कोरोना लशीमुळे आणि त्यातही ऑक्सफर्डमध्ये बनलेल्या या लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात का आणि का होतात यावर संशोधन सुरू झालं. अशा घटना जरी अत्यल्प असल्या तरी त्यामुळे सुधारित लस बनवताना हा धोकाही टाळता येणार होता.
 
लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या का होतात?
ही लस कोरोना व्हायरसच्या आतील जेनेटिक घटक आणि सर्दी-तापाच्या एका विशिष्ट विषाणूची मिळून बनली आहे.
खरंतर लस स्नायूंमध्ये टोचली जाते. पण, कधी कधी रक्तात मिसळते.
तशी ती रक्तात मिसळली तर रक्तातल्या प्लेटलेटमधलं एक प्रोटीन तिच्याकडे आकर्षित होतं.
काही वेळा या प्लेटलेटची ओळख न पटल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती तिलाच विषाणू समजून तिच्याविरोधात अँटीबॉडीज् तयार करते.
अशा अँटीबॉडीज् या प्लेटलेट भोवती तयार होतात आणि त्यातून रक्ताच्या गुठळ्या तयार होतात.
रक्ताच्या गुठळ्या का होतात यावर संशोधन करणारे कार्डिफ विद्यापीठाचे संशोधक डॉ. अॅलन पार्कर याविषयी म्हणतात, "ही लस बनवताना मृत कोरोना व्हायरसबरोबरच सर्दी-तापाचा एक विषाणू एडेनोव्हायरसही वापरण्यात आला आहे. आणि या व्हायरसचा पृष्ठभाग बराचसा सपाट असतो.
 
"त्यामुळे रक्तातली प्लेटलेट त्याकडे आकर्षित होते आणि मग रक्ताची गुठळी तयार होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते."
 
ऑक्सफर्ड लशीवरील हे संशोधन का महत्त्वाचं?
आता झालेल्या या संशोधनात ऑक्सफर्ड विद्यापीठाची टीमही सहभागी झाली होती.
 
काही विशिष्ट वयोगटातल्या आणि विशिष्ट प्रकारच्या लोकांमध्येच अशी गुठळी होते का, तसंच रक्ताची गुठळी कुठल्या अवयवात तयार होऊ शकते अशा प्रकारचे निष्कर्ष अजून संशोधकांना काढता आलेले नाहीत. त्या दिशेनं काम अजूनही सुरू आहे. पण, आतापर्यंत लशीवर झालेलं संशोधनही पुरेसं आश्वासक असल्याचं विद्यापीठाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
या पत्रकात म्हटलंय, "रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण हे अत्यल्प होतं आणि आहे. उलट या लशीने आतापर्यंत जगभरात करोडो लोकांचे जीव वाचवले आहेत. पण, लशीवरच्या प्रत्येक संशोधनाचं आम्ही स्वागतच करतो. कारण, असे संभाव्य धोके समजले तर लशीच्या सुधारित आवृत्त्या आणताना आम्हाला मदतच होणार आहे."
 
जगभरात कोरोनाचे नवनवे व्हेरियंट येतायत तसं सध्याच्या लशींचे नवीन फॉर्म्युले आवश्यक ठरणार आहेत.
अमेरिकेत फायझर आणि मॉडर्ना या दोन्ही लशींनी शंभर दिवसांत आताच्या लशींच्या सुधारित आवृत्त्या आणण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी आजूबाजूच्या कोरोना परिस्थितीचा आढावा आणि लशींवर सातत्याने संशोधन महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे कोरोना लशीची लोकांमधली विश्वासार्हताही वाढणार आहे.
 
जगभरात लशींबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे लोक लस घ्यायला पुढे येत नाहीयेत. लसीकरणाचं प्रमाणही अशा संशोधनामुळे वाढू शकेल. कारण, शेवटी कोरोना उद्रेक आटोक्यात आणण्याचा एकमेव उपाय आपल्याला सध्या ठाउक आहे तो म्हणजे कोरोनाविरोधी लस.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती