कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गाठी का तयार होतात?
गुरूवार, 13 मे 2021 (13:23 IST)
मयांक भागवत
कोरोनासंसर्गावर उपचार घेणारे आणि कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार होण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय.
हृदयविकार तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रक्तवाहिन्या आणि फुफ्फुसात रक्ताची गाठ तयार झालेल्या अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
कोव्हिडसंसर्गात हृदयात निर्माण होणारी गुंतागुंत 30 ते 50 टक्के मृत्यूचं प्रमुख कारण असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयाचे व्हॅस्कुलर सर्जन डॉ. अंबरीश सात्विक यांनी कोरोनारुग्णाच्या शरीरातून काढलेल्या गाठीचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
डॉ. सात्विक यांच्याकडून आम्ही शरीरात गाठ का तयार होते? फक्त हृदयातच गाठ होते का? गाठ तयार झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाचा मृत्यू होतो? याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कोरोनारुग्णांच्या शरीरात गाठ का तयार होते?
शरीरात दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एक हृदयाकडून शरीराच्या इतर अवयवांकडे रक्त नेते. दुसरी रक्त हृदयाकडे घेऊन येते. या दोन्ही रक्तवाहिन्यात गाठी तयार होऊ शकतात.
कोव्हिड व्हायरस फफ्फुसांच्या एअर सॅकवर हल्ला करतो. आणि शेजारच्या रक्तवाहिन्यामध्ये शिरतो. रक्तवाहिन्यातील लाईनिंगवर (वैद्यकीय भाषेत Endothelium) परिणाम करतो. त्यामुळे फफ्फुसातील रक्तवाहिन्यात गाठी तयार होतात. यामुळे रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो.
किती रुग्णांमध्ये शरीरात गाठ तयार होते?
अंदाजे 20 टक्के कोरोनासंक्रमित रुग्णांमध्ये शरीराच्या इतर भागातून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यात (Veins) गाठ तयार होण्याची शक्यता असते. रुग्णालयात ICU आणि HDU मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये गाठ तयार होते. याला वैद्यकीय भाषेत 'डीप व्हेनस थॉम्बॉसिस' (DEEP VENUS THROMBOSIS) म्हणतात.
2-5 टक्के कोव्हिड रुग्णांमध्ये हृदयाकडून शरीराच्या विविध अवयवांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार होण्याचे प्रकार पाहायला मिळतात. या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार झाली तर रक्तपुरवठा अचानक बंद पडतो.
शरीरात कुठे गाठ तयार होऊ शकते?
हृदयाच्या रक्तवाहिन्यात गाठ तयार झाली तर हार्टअटॅक येण्याची शक्यता आहे. मेंदूत क्लॉट झाली तर ब्रेनस्ट्रोक होण्याची शक्यता असते. तसंच आतडी किंवा किडणीच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार होऊ शकतात.
हात आणि पायाच्या रक्तवाहिन्यात गाठी तयार होऊ शकतात. अशावेळी तात्काळ उपचार करावे लागतात.
गाठ कधी तयार होण्याची भीती असते?
कोरोनासंसर्गात दुसऱ्या आठवड्यात, जेव्हा संसर्ग मोठ्या प्रमाणात असतो. त्यावेळी गाठ तयार होण्याची शक्यता असेत. पहिल्या आठवड्यात व्हायरसमुळे रुग्णाला त्रास होतो. दुसऱ्या आठवड्यात रोगप्रतिकारशक्तीमुळे रिअक्शन होतात.
व्हायरस आणि रोगप्रतिक्रशक्ती यामुळे शरीराचं नुकसान होतं. रक्तवाहिन्यात तयार होणाऱ्या गाठींना इम्युनो थ्रॉम्बोसिस म्हणतात.
कोरोनामुळे रक्त घट्ट होतंय. त्याच्यामुळे रुग्ण रिकव्हर होत असताना तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात रक्तवाहिन्यात गाठ तयार होतात.
ही प्रकरणं वाढली आहेत?
कोरोनारुग्णांची संख्या वाढल्याने रक्ताच्या गाठी होण्याची संख्या वाढली आहे. कोरोनासंसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रक्तवाहिन्यात गाठी तयार होण्याची प्रकरणं वाढली आहेत.
प्रत्येक रुग्णामध्ये रक्ताची गाठ तयार होईल?
लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रत्येक रुग्णाच्या शरीरात रक्ताची गाठ तयार होणार नाही. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये या केसेस जास्त दिसून येतात. साधारण:त पाचव्या दिवशी खूप जास्त ताप असेल तर, डॉक्टर काही टेस्ट करतात. टेस्टमध्ये काही गोष्टी वाढल्या असतील तर लोकांनी काळजी घेतली पाहिजे.
काही रुग्णांना स्टिरॉईड किंवा रक्तपातळ करणारी औषध द्यावी लागतात. ज्या लोकांमध्ये इन्फमेटरी मार्कर वाढतात त्यांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
कोरोनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हाता-पायात दुखायला लागलं. छातीत, पोटात दुखू लागलं, दिसण्यात काही अडथळा निर्माण झाला किंवा पॅरालेसिससारखं झालं तर तात्काळ डॉक्टरांना दाखवा. कुठलंही नवीन लक्षण आढळून आल्यास वैद्यकीय मदत घ्या.
तुम्ही रुग्णाच्या शरीरातून गाठ कशी काढलीत?
हा रुग्ण उपचार घेत होता. त्याच्या उजव्यापायात दुखू लागलं. पाय अचानक थंड झाला. या रुग्णाच्या पूर्ण पायात गाठ होती. सर्व रक्तवाहिन्यात बंद होत्या. रुग्ण वेळेत पोहोचल्याने त्याचा पाय वाचला.
एकदा गाठ काढली म्हणजे संपलं असं नाही. गाठ सारखी होत रहाणार. रोगप्रतिकारशक्ती आणि व्हायरसमुळे होणारी गुंतागुंत थांबत नाही. त्यामुळे काही औषध द्यावी लागतात.
मुंबई आणि दिल्लीत तुम्हाला काय फरक जाणवतो?
या दोन शहरांची तुलना योग्य ठरणार नाही. मुंबई महापालिकेची प्रतिक्रिया चांगली होती. सर्वांत महत्त्वाचा मला जाणवलेला फरक म्हणजे, मुंबईत जंबो रुग्णालयं होती. जंबो रुग्णालयं असली तर मोठया रुग्णालयांवरील ताण कमी होतो. दिल्लीत रुग्णालयांवर प्रचंड ताण आला.
प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन लागत नाही. फिल्ड रुग्णालयं, जंबो सेंटर्स असतील तर अनेक रुग्ण याठिकाणी उपचार घेऊ शकतात. दिल्लीत जंबो सेंटर्स नव्हती. त्यामुळे प्रत्येक रुग्ण हॉस्पिटलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे गंभीर रुग्णांना बेड्स मिळाले नाहीत.