JN.1 कोव्हिड व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने, पण लशीमुळे प्रादुर्भाव कमी -WHO
शुक्रवार, 22 डिसेंबर 2023 (08:38 IST)
कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन स्ट्रेनच्या एका नव्या व्हेरिएंटचा प्रसार झपाट्याने होत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली असून याचं वर्गीकरण व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट असं करण्यात आलं आहे.
भारत, चीन, ब्रिटन आणि अमेरिकेसहित जगभरातील अनेक देशांमध्ये हा JN.1 व्हेरिएंट आढळला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, लोकांनी घेतलेल्या लशींमुळे सध्या धोका कमी आहे.
परंतु या हिवाळ्यात कोरोना आणि इतर संसर्ग वाढू शकतात असा इशारा संघटनेने दिला आहे.
जगाच्या उत्तर गोलार्धात फ्लू, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (आरएसव्ही) आणि न्यूमोनिया यांसारखे श्वसनाचे विकार देखील वाढत आहेत.
कोव्हिडला कारणीभूत असलेला व्हायरस कालांतराने विकसित होत जातो आणि याचे नवे व्हेरिएंट समोर येतात.
यातील ओमिक्रॉन हा व्हेरिएंट खूप प्रबळ ठरला होता.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) सध्या ओमिक्रॉनशी संबंधित प्रकरणांचा आणि त्याच्या नव्या व्हेरिएंटचा अभ्यास करत आहेत.
यात जेएन.1 या व्हेरिएंटचा समावेश आहे, मात्र हा व्हेरिएंट तितकासा धोकादायक मानला जात नाही.
मात्र या व्हेरिएंटचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे.
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, अमेरिकेत याचा प्रसार मोठ्या गतीने होत आहे. एकूण संक्रमणापैकी जवळपास 15-29% संक्रमण या विषाणूचे आहे.
यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सध्या प्रयोगशाळेत अभ्यासलेल्या पॉझिटिव्ह प्रकरणांपैकी जवळपास 7% प्रकरणं जेएन.1ची आहेत.
ते या आणि इतर प्रकारांवरील सर्व उपलब्ध माहितीचं परीक्षण करतील असं त्यांनी म्हटलं आहे.
हिवाळ्यातील लाट
सर्व ठिकाणी JN.1 हा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. कदाचित त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये BA.2.86 व्हेरिएंटच्या तुलनेत अतिरिक्त उत्परिवर्तन झालं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मूल्यांकनात म्हटलंय की, "हिवाळ्याच्या हंगामात इतर व्हायरल आणि बॅक्टेरियाचे संसर्ग वाढतात. मात्र यावेळी JN.1 या व्हेरिएंटमुळे Sars-Cov-2 (कोरोना) च्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते असा अंदाज आहे."
जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की, लशींद्वारे देऊ केलेल्या प्रतिकारशक्ती समोर JN.1 कितपत टिकाव धरतो याचे मर्यादित पुरावे उपलब्ध आहेत.
मागील व्हेरिएंटच्या तुलनेत या व्हेरिएंटमुळे लोक जास्त आजारी पडल्याची प्रकरणं अद्याप समोर आलेली नाहीत.
परंतु याचा लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणं आवश्यक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
मात्र रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांच्या माहितीची नोंद करणाऱ्या देशांची संख्या नाट्यमयरित्या कमी झाली आहे.
संक्रमण आणि गंभीर आजार टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने काही सल्ले दिले आहेत.
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा
खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात धरा
आपले हात नियमित स्वच्छ करा
कोव्हिड आणि फ्लू लसीकरणाच्या बाबतीत अपडेट रहा
आजारी असल्यास घरी विश्रांती घ्या
तुम्हाला लक्षणे आढळल्यास चाचणी करा
एकनाथ शिंदेंनी घेतली आढावा बैठक
देशात आणि राज्यात सध्या JN.1 हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली.
राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी.
नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.
'सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी'
JN.1 च्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणेनी सुसज्ज राहावे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी," असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
"लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे," असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स च्या सद्य:स्थितीबाबतचीही माहिती यावेळी घेतली.