जनता कर्फ्यु: आम्ही भारतीय असे का वागतो?

सोमवार, 23 मार्च 2020 (12:05 IST)
पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यु पाळायला सांगितला... ते करत असताना काय करू नये हेही सांगितलं कारण मोदींना भारतीयांचा स्वभाव माहिती आहे. आपला कॉमन सेन्स कमी आहे. लोकांवर शिवाजी महाराजांचा जोपर्यंत प्रभाव होता तोपर्यंत आपला कॉमन सेन्स मेला नव्हता. पण हा प्रभाव 1925 नंतर हळू हळू कमी व्हायला लागला आणि आपली वाटचाल भयंकर मुर्खपणाकडे होऊ लागली. शिवाजी महाराजांनी जी स्वातंत्र्य चळवळ आरंभीली होती ती चळवळ तत्कालीन नेत्यांनी खूप सोपी करून टाकली. 
 
म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, गरज पडली तर रक्त सांडावं लागतं अशा लॉजिकल गोष्टी नष्ट झाल्या नि स्वातंत्र्य म्हणजे झाडावरच फळ आहे, दगड घ्यायचा, फळाला मारायचा मग फळ खाली पडेल आणि त्याचा आपण आस्वाद घेऊ शकू... अशी भावना काँग्रेसने जनतेत निर्माण केली. म्हणून काँग्रेसच्या दृष्टिकोनातून भगतसिंह, सावरकर आदी क्रांतीकारकांना किंमत नव्हती आणि स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य प्राप्तीनन्तर काँग्रेसने लोकांच्या मनात या क्रांतिकारकांच्या विरोधाची भावना निर्माण करण्याचा आणि त्यांचे योगदान नाकारण्याचा प्रयत्न केला आहे. तो आजतागायत ते करत आहेत.
 
स्वातंत्र्य प्राप्तीनन्तर स्वातंत्र्य म्हणजे काय? तो कसा साजरा करावा? त्याची किंमत काय? याविषयी त्यांच्या हातात सत्ता होती, त्यांनी मार्गदर्शन केले नाही. ते तरी कसे करणार? कारण पूर्व स्वराज्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्य हा प्रयोग फसला होता म्हणून फाळणी केली. त्यातही फाळणी सुद्धा बेजबाबदारपणे केली. आपल्या लोकांची हत्या होणार नाही, महिलांवर बलात्कार होणार नाही याची कोणतीही काळजी तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतली नाही आणि आपला नाकर्तेपणा लपववण्यासाठी वेगवेगळी थियरी मांडण्यात आली. 
 
आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, एकीकडे आपल्या आया बहिणींची अब्रू लुटली जात होती, बांधवांची पशुप्रमाणे हत्या होत होती आणि आपण उन्मादात स्वातंत्र्य साजरा करत होतो. पण आपल्याला स्वातंत्र्य कसा साजरा करावा? याचे मोल काय हे कुणीच सांगितलं नाही. मोदी परवाच्या भाषणात म्हणाले की कर्फ्यु बघायला बाहेर पडू नका. तरी लोक पडलेच हा भाग वेगळा. पण त्याकाळी नेत्यानी आपल्याला सांगितलंच नाही की काय केलं पाहिजे? झुंडीला डोकं नसतं, फक्त मन असतं हे तत्कालीन नेत्यांच्या लक्षात आलं नाही. आपण लॉजिक कसं मारतो याच आताच घडलेलं एक उदाहरण सांगतो;
 
एका फेसबुकीय सरांनी लोकांनी जो आज हैदोस घातला त्यावर टीका करणारी पोस्ट लिहिली, त्यावर मी कमेंट म्हणून वरील फाळणीच्या वेळेचं उदाहरण दिलं. तर हुच्च शिक्षित सर दात काढून हसायला लागले आणि हसायचं कारण विचारल्यावर म्हणाले की 2014 साली मी केल्याची पाने लावायचो आणि आता सूट घालतो. त्यांना असं म्हणायचं आहे की स्वातंत्र्याचा मुद्दा जुना आहे, हा मुद्दा वेगळा आहे. पण कोणत्याही गोष्टीच मूळ भूतकाळात सापडतं... तुम्हाला एखादा गंभीर आजार झाला असेल तर डॉक्टर तुम्हाला विचारतात की तुमच्या कुटुंबांत हा आजार कुणाला होता का? मानसिक आजार असला तरी त्याची मेडिकल आणि फॅमिली हिस्ट्री तपासली जाते.
 
भारतीय लोक जो मूर्खपणा करतात तो मानसिक आजार असून भारतीयांची फॅमिली हिस्ट्री तपासल्यावर कळतं की हा आजार आपल्या पुर्वजानाही होता. म्हणजे हा मुर्खपणा करण्याचा आजार आनुवंशिक आहे. इंग्रजांनी आपल्यावर राज्य का केलं माहिती आहे? ते लॉजीकली correct होते. ज्यावेळी महायुद्धस्ट जर्मनीवर इंग्रजांनी विजय मिळवला तेव्हा पुण्यात ब्रिटिश नागरिकांनी मूक मोर्चा काढला, त्यांच्या हातात फलक होते. फलकावर लिहिलं होतं "जमिनी सोबत आम्ही जिंकलोय, जापानशी आमचं युद्ध सुरुय".... ही जाणीव ब्रिटीशांना होती. ती जाणीव आपल्यात तेव्हाही नव्हती, जर असती तर आपण म्हणालो असतो, आम्हाला स्वातंत्र्य मिळालय पण ते खंडित आहे उलट आमच्या बांधवांवर अनन्वित अत्याचार होत स्वातंत्र्य मिळतंय... किमान भविष्यात तरी हे अत्याचार थांबले पाहिजे. पण नेहरी - लियाकत करार झाल्यानंतरही हे अत्याचार थांबले नाहीत. पण आपल्याला त्याबद्दल काही देणं घेणं नव्हतं.
 
असे उदाहरण देऊनही "त्या" सरांनी दात काढले आणि त्यांच्या वाचकांनीही. पण सरांना हे कळायला हवं होतं की जर राष्ट्र घडत असताना जनतेला शिस्त लागली असती तर आज आपण इतके बेशिस्त झालो असतो का? पु. भा. भावेंची एक छान कथा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो भारतीय कर्मचारी शिस्तीत वागायचा तो स्वातंत्र्यांनंतर ऑफिसच्या आवारात पचा पचा थुंकू लागला. एक ब्रिटिश कर्मचारी अजूनही भारतात राहत होता. त्याला हा घाणेरडापणा सहन होईना. पण सांगतोय कुणाला? आता राज्य भारतीयांचं होतं. त्याचं काही चालणार नव्हतं. त्याचा ब्रिटिश बॉस इंग्लंडमध्ये निघून गेलेला आणि नवीन भारतीय बॉस आला होता. तो पण बेशिस्त, त्याचे नातवंड की मुले गार्डनची नासधूस करायची. हे सगळं त्याने ब्रिटिश बॉसला पत्र लिहून सांगितलं आणि माझी इथून सुटका करा अशी विनवणीही केली. 
 
संपूर्ण कथा सुंदर आहे... भावेंचे साहित्य नक्की वाचा. अशा कथा तर आहेतच, पण तत्कालीन नालायक राजकारण्यांनी जे दंगलीच सत्य आपल्यापासून लपवून ठेवलं त्या संबंधीही कथा लिहिल्या आहेत. असो. तर मुद्दा असा होता की आपल्याला आपल्या नेत्यांनी चांगल्या सवयी लावल्या नाहीत आणि स्वयंभूपणा शिकवला नाही. हे नेत्यांनी शिकवायचं असत का? तर होय, नेत्यांनीच शिकवायचं असतं. काही हुच्च शिक्षित लोक म्हणतील की हे लोकांनाच कळायला पाहिजे. पण ते हुच्च शिक्षित असतात, पण सगळेच नसतात. सगळेच काही आपल्यासारखे स्वयंभू नसतात. जनतेला एक नेता हवा असतो आणि जनता त्या नेत्याचं ऐकत असते. 
 
आपण साधं सिग्नल न तोडण्याचं सौजन्य दाखवू शकत नाही, रेल्वेमध्ये चढताना रांगेत चढण्याचं सौजन्य दाखवू शकत नाही. लोकलच्या दरवाजावर जो दांडा असतो तो एक बाजूने चढणे, आणि दुसऱ्या बाजूने उतरणे याच विभाजन करायलाही असू शकतो याच भान आपल्याला नाही म्हणून जनता कर्फ्यु पाळल्यानंतर लोकांनी रस्त्यासवर उतरून सोहळा साजरा केला, फटाके फोडले यात आश्चर्य वाटण्याचं कारण काय? कर्फ्यु बघायला जाऊ नका अस मोदींनी सांगितलेलं असतानाही काही बिनडोक लोक बाहेर हिंडत होतेच ना? हा आनुवंशिक दोष आहे. इतक्या लवकर जाणार नाही. सतत प्रबोधन करणारा नेता आपल्याला मिळायला हवा, लोकांशी लोकांच्या भाषेत संवाद साधणारा नेता यापुढेही लोकांना हवा आहे. भारत महासत्ता बनेल तेव्हा बनेल. पण असला मूर्खपणा आधी आपल्या मनातून निघाला पाहिजे. 
 
हा मूर्खपणा काढायचा असेल तर आपल्याला लॉजीकली विचार करावा लागेल, या मानसिक रोगाचं मूळ शोधावं लागेल. वर उल्लेख केलेल्या सरांसारखे आणि त्यांच्या वाचकांसारखे दात काढून काही होणार नाही. कारण ते केव्हाच आपल्या घशात गेले आहेत. नरेंद्र मोदी काही प्रयत्न करत आहेत. लेखक समाजाची माऊली असते. ही आपली भारतीय परंपरा आहे. लेखकांना ज्या काळी माऊली मानायचे त्या काळी वर उल्लेखिलेल्या सरांचे पूर्वज जरी केळ्याचे पान लावून फिरत असले तरी त्या काळी या लेखकांनी समाज एकसंध ठेवलेला आहे. त्या काळी तर सतत परकीय आक्रमणे होत होती. म्हणून आपणही प्रत्येक वेळी आपल्या विनोद बुद्धीचे प्रदर्शन न करता समोरच्याचे प्रबोधन नक्कीच करू शकतो.
 
तरी आजच्या प्रसंगाने मला हताश होण्याचं कारण दिसत नाही. आज मुर्खपणा करणारे हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते. बहुसंख्य लोकांनी शिस्त पाळलेली आहे. ज्यांना भक्त म्हणून हिणवले जाते त्यांनी शिस्तीचा नवा पायंडा पाडलेला आहे. भारताचं भविष्य सुंदर आहे...
 
लेखक: जयेश शत्रूघ्न मेस्त्री

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती