करोना व्हायरसविरोधात लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने करोना व्हायरस अॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. जेरुसलेम पोस्टने हे वृत्त दिले आहे. करोना विरोधात लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली.
मिगव्हॅक्स ही इस्रायलमधली संशोधकांची दुसरी टीम सुद्धा करोना व्हायरसविरोधात लस बनवण्याचा पहिला टप्पा पूर्ण करण्याच्याजवळ पोहोचली आहे. इस्रायलने आतापर्यंत चार लाख ४ हजार नागरिकांच्या करोना चाचण्या केल्या आहेत. त्यात १६,२४६ नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. करोनामुळे इस्रायलमध्ये आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला आहे.