राज्यात ३५० नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या २६८४
राज्यात आज कोरोनाच्या ३५० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या २६८४ झाली आहे. कोरोनाबाधित २५९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २२४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ५० जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६, मुंबईत १४ तर प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.
दरम्यान, आज राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईचे ११, पुण्यातील ४ तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ७ महिला आहेत. त्यातील ५ जण हे ६० वर्षांवरील आहेत ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १३ रुग्णांमध्ये (७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कर्करोग तर एकाला क्षयरोग होता.