ई पास महाराष्ट्र : लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक प्रवासासाठी 'असा' बनवा ई-पास
शुक्रवार, 14 मे 2021 (20:40 IST)
महाराष्ट्रात लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साधारण गेल्या महिन्याभरापासून लॉकडाऊनअंतर्गत लागू असलेले कडक निर्बंध आता 1 जून सकाळी सात वाजेपर्यंत कायम राहणार आहेत.
राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश जारी केलाय. त्यामुळे संचारबंदीसह लागू असलेले सर्व नियम लागू असतील. केवळ अत्यावश्यक सेवा आणि योग्य कारण असल्यास घराबाहेर पडण्याची परवानगी असणार आहे.
अत्यावश्यक कारणासाठीच आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना असेल आणि त्यासाठी ई-पास घ्यावा लागणार आहे. पण जिल्हाबंदीचे नियम काय आहेत आणि हा ई-पास काढायचा तरी कसा, याची माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.
राज्यात जिल्हाबंदीही लागू असेल, याचा अर्थ नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही.
यादरम्यान, फक्त अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासाची परवानगी नागरिकांना असेल आणि त्यासाठी ई-पास घ्यावा लागेल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
ई-पास कुणाला मिळणार?
बस आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त अतिशय आवश्यक कारणासाठीच खाजगी कार किंवा इतर वाहनांद्वारे आंतरजिल्हा प्रवास करण्यास परवानगी असेल. आवश्यक कारणांमध्ये वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, कुटुंबातील निधन अशा कारणांचा समावेश होतो. पण आदेशात नमूद केल्याप्रमाणे त्यांना गृह विलगीकरणात राहावं लागेल.
याबरोबरच इतर राज्यांमध्ये अडकलेले लोक विमान, लांब पल्ल्यांच्या रेल्वे, बस, खाजगी वाहनं किंवा टॅक्सीने आपल्या शहरात परत येऊ शकतात.
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातल्या विमानतळावर जाण्यासाठी टॅक्सीचा वापर करता येईल. पण त्यासाठी प्रवाशांच्या मूळ शहरात विमानतळ नाही, हे सिद्ध करावं लागेल. टॅक्सीमधल्या प्रत्येक प्रवाशाकडे बोर्डिंग पास असणं गरजेचं आहे. या नियमाचा दुरुपयोग होताना आढळला तर कडक कारवाई करण्यात येईल.
व्यापारासाठी आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
नव्या नियमांमध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी कोणती कारणं रास्त ठरतील याचा उल्लेख केला आहे. पोलीस संबंधित पुरावे स्वीकारू शकतील, उदाहरणार्थ वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करत असाल तर त्या संबंधित कागदपत्रं. रास्त कारण आणि त्याचे पुरावे यांची शहानिशा करण्याची जबाबदारी नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला देण्यात आली आहे.
ई-पास कसा काढावा?
गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात अशाच प्रकारचा ई-पास देण्यात येत होता. पास मिळवण्यासाठी यंदाही नागरिकांना तीच प्रक्रिया करावी लागणार आहे.
पोलीस प्रशासनाने ई-पास वितरीत करण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ ही वेबसाईट बनवली आहे. त्यामध्ये खालील दोन पर्याय तुम्हाला दिसतील.
1. पासकरिता अर्ज करण्यासाठी (Apply For Pass Here)
आणि
2. आपल्या अर्जाची प्रक्रिया कुठेपर्यंत आली आहे ते पाहण्यासाठी किंवा पास मंजूर झाल्यास तो डाऊनलोड करण्यासाठी (Check Status/Download Pass)
अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून साधारणपणे एक ते दोन दिवसांत अर्ज निकाली काढण्यात येतात. पण कधी कधी त्याला जास्त वेळही लागू शकतो, असा गेल्या वेळचा अनुभव आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपल्या प्रवासाचं नियोजन करावं.
अर्ज प्रक्रियेतील टप्पे -
1. आपल्या ब्राऊजरमध्ये https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटची लिंक टाईप करा. याठिकाणी तुम्हाला वर उल्लेख केल्याप्रमाणे अर्ज करण्यासाठी आणि अर्ज डाऊनलोड करण्यासाठी असे दोन पर्याय दिसतील.
2. तुम्हाला ई-पासकरिता अर्ज करावयाचा असेल, तर Apply For Pass Here या बटणावर क्लिक करा.
३. पुढच्या पेजवर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर भेट देण्याची गरज आहे का? हा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. यामध्ये योग्य पर्याय निवडून पुढे जा.
4. त्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवासाची सर्व माहिती सविस्तरपणे भरावी लागणार आहे. यामध्ये तुमचं नाव, प्रवासाची तारीख, मोबाईल क्रमांक, प्रवासाचं कारण, वाहनाचा प्रकार, वाहनाचा क्रमांक, सध्याचा पत्ता, इमेल आयडी, प्रवास सुरू होण्याचं ठिकाण, प्रवासाचं शेवटचं ठिकाण, तुम्ही सध्या कंटेनमेंट झोनमध्ये आहात किंवा नाही, त्याशिवाय, परतीचा प्रवास या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील.
या अर्जासोबत तुम्हाला तुमचा फोटोही जोडावा लागणार आहे. फोटोची साईज 200 KB पेक्षा जास्त नसावी. फोटो ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना आदी कागदपत्रे देता येऊ शकतात. प्रत्येक फाईलची साईज 1 MB पेक्षा जास्त नसावी.
तसंच, तुम्ही सांगितलेल्या अत्यावश्यक कारणाशी संबंधित संबंधित कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रतीही तुम्हाला याठिकाणी अपलोड कराव्या लागतील.
तसंच डॉक्टरांकडून मिळालेलं तुमचं फिटनेस सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी देखील लिंक देण्यात आली आहे.
वरील सर्व माहिती योग्यरित्या भरून Submit बटणावर क्लिक केल्यास तुमचा अर्ज पोलिसांकडे पाठवला जाईल.
5. तुमचा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी तुम्हाला मिळेल. हा तुमचा अर्ज क्रमांक असतो. तुमचा अर्ज मंजूर झाला किंवा नाकारला गेला याची माहिती मिळवण्यासाठी हा अर्ज क्रमांक अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा टोकन आयडी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.
6. तुमचा अर्ज मंजूर झाला किंवा नाही याचा माहिती तुम्हाला पहिल्या पेजवरच्या दुसऱ्या पर्यायावर मिळेल. त्याठिकाणी आपला टोकन आयडी नंबर टाकून क्लिक केल्यास अर्ज डाऊनलोड करण्यासाठीचा पर्याय दिसेल. अर्ज नामंजूर झालेला असल्यास तशी माहिती त्याठिकाणी दिलेली असेल.
ही प्रक्रिया करून तुम्ही ई-पाससाठी अर्ज करू शकता. पण नागरिकांनी फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच अर्ज दाखल करावेत, असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच प्रवासासाठी बाहेर पडा.