राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.22 मार्च 17 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 49,756 गुन्हे दाखल झाले आहेत तर 10,276 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 32,424 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 70, 307 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा 555 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1044 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उलंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 1,82,76,744 (1 कोटी 82 लाख 76 हजार 744) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
7 अधिकारी व 23 पोलिसांना बाधा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने सात पोलीस अधिकारी व 23 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.