राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी राज्यात सर्वत्र समन्वय ठेवून आहे. हा विभाग टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 196 गुन्हे 13 एप्रिल 2020 पर्यंत दाखल झाले आहेत. यातील आठ गुन्हे अदखलपात्र आहेत. या गुन्ह्यांमधे आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 93 गुन्हे दाखल झाले आहेत.
आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 61 गुन्हे तर टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 2 गुन्हे व अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी 27 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 37 आरोपींना अटक झाली आहे.
गैरफायदा - सावधानता बाळगा
कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्यांनी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरायला अडचण होऊ नये याकरिता हे हफ्ते 3 महिन्यांसाठी स्थगित करण्याचे आवाहन भारतीय रिझर्व बँकेने देशातील सर्व बँकांना केले होते. काही सायबर गुन्हेगार या आवाहनाचा गैरफायदा घेऊन सामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. सामान्य लोकांना एक एसएमएस पाठवून बँक खात्याचे डिटेल्स म्हणजेच खाते क्रमांक, डेबिट/क्रेडिट कार्डसचा तपशील व पीन क्रमांक इत्यादी एका विशिष्ट मोबाइल क्रमांकावर पाठवायला सांगत आहेत. खातेदारकांनी ही माहिती पाठविल्यावर थोड्या वेळात एक ओटीपी येतो व तो माहिती करून घेण्यासाठी एक कॉल येतो व समोरची व्यक्ती असे भासविते की, ती व्यक्ती त्या बँकेतील कर्मचारी आहेत व तो ओटीपी घेतो. थोड्यावेळाने खातेदारकाला बँकेचा एसएमएस येतो की त्याच्या खात्यातून काही रक्कम डेबिट होऊन दुसऱ्या कोणत्यातरी अनोळखी खात्यात ट्रान्सफर झाली आहे.
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना असे आवाहन करते की, जर असा काही माहिती मागणारा एसएमएस आला तर आपण आपली माहिती पाठवू नये कारण तुमचे कर्ज असणाऱ्या बँकेकडे तुमचा सर्व तपशील आधीपासून उपलब्ध असतोच व असा एसएमएस आल्यास आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर फोन करून खातरजमा करावी, तसेच आपण जर चुकून असे फसविले गेले असाल तर आपल्या बँकेच्या हेल्पलाईनवर माहिती द्यावी व पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची नोंद करावी. तसेच या गुन्ह्याची नोंद www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर पण करावी.