Covid 19 : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक, वुहानसह 12 शहरात लॉकडाऊन

शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (18:17 IST)
यवेट्ट टॅन,
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे झिरो-कोव्हिड धोरणाचा सातत्याने पाठपुरावा करत असल्याने चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आलं आहे.
 
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वप्रथम झाला त्या वुहान शहरासह 12 इतर शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याची सूचना चीन प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 
चीनमधील 8 लाखांपेक्षाही जास्त लोकांना येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत घरीच राहण्यास सांगण्यात आलं आहे.
 
"आम्हाला या सगळ्याचा वीट आला आहे. आता खूप एकटेपणा वाटतो," असं एका स्थानिक नागरिकाने रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं.
 
जगातील सर्वात मोठा आयफोन निर्मितीचा प्रकल्प असलेल्या झेंगझोऊ शहरालाही या लॉकडाऊनचा फटका बसल्याचं दिसून येतं.
 
चीनमध्ये गेले तीन दिवस सलग एक हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिनपिंग यांनी झीरो-कोव्हिड धोरणात कोणतीही सूट मिळणार नाही, असं स्पष्ट केलं होतं.
 
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी हे लोकांचं युद्ध आहे, असं जिनपिंग यांनी लॉकडाऊनविषयी म्हटलं.
 
24 ऑक्टोबरपर्यंत चीनमध्ये 28 शहरांमध्ये लॉकडाऊनसंदर्भात निर्बंध लावण्यात आले होते. आता यामध्ये वाढ करून 30 ऑक्टोबरपर्यंत याची मुदत वाढवली आहे.
 
या लॉकडाऊनमुळे 20 कोटी लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाल्याचं मत तज्ज्ञ नोमुरा यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केलं.
 
देशभरात गेल्या काही दिवसांत तब्बल 200 ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊन लावण्यात आलेल्या क्षेत्रांमधील लोकांचं उच्च किंवा मध्यम जोखीम गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं आहे.
 
वुहानमध्ये या आठवड्यात एका दिवसात 25 नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन आठवड्यात याठिकाणी 200 हून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले.
 
झेंगझोऊ शहरात फॉक्सकॉन-ऍपलचा मोठा प्रकल्प आहे. याचठिकाणी अपलच्या नव्या आयफोन-14च्या निर्मितीचं काम वेगाने सुरू होतं.
 
पण याच दरम्यान, येथील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने याठिकाणी चिंतेचं वातावरण आहे, अशी माहिती येथील एका व्यावसायिकाने बीबीसीला दिली.
 
कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांना विलगीकरणात पाठण्यात आलं असून त्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा यांचा पुरवठा करण्यात येत आहे, असंही त्यांनी सांगितलं. कर्मचाऱ्यांना या आठवड्याच्या सुरुवातीला चीनच्या दक्षिण बाजूस असलेल्या ग्वांगझू शहरातील शाळा आणि रेस्टॉरंट बंद करण्यात आले होते.
 
गुरुवारी या शहरात 19 नवे रुग्ण आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यानंतर शहरात विविध उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.
 
तिबेटची राजधानी ल्हासामध्ये झीरो-कोव्हिड धोरणाअंतर्गत निर्बंध लावण्यात आले होते. या निर्बंधांचा तिबेटमध्ये निषेध करण्यात येत असल्याचे व्हीडिओ क्लिप समोर आले होते.
 
ल्हासा शहरात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. गुरुवारी येथे कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये शेकडो लोक लॉकडाऊनविरोधात निदर्शने करताना आणि पोलिसांशी संघर्ष करताना दिसत आहेत.
 
लॉकडाऊनचा विरोध करणारे लोक प्रामुख्याने हान चिनी स्थलांतरित कामगार होते, अशी माहिती समोर आली आहे.
 
शहरात निदर्शने होत असल्याच्या बातमीला ल्हासा येथील रहिवाशाने दुजोरा दिला. बुधवारी (26 ऑक्टोबर) ल्हासामध्ये निदर्शने झाल्याचं त्याने सांगितलं.
 
कोरोना व्हायरसचा उद्रेक जगातील इतर भागांमध्येही छोट्या-मोठ्या प्रमाणात होत आहे. पण चीनमध्ये यासंदर्भात कठोर अशी झीरो-कोव्हिड पॉलिसी लागू करण्यात आली आहे.
 
त्यामुळे येथील प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे नष्ट करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येतं.
 
मात्र, या सगळ्याचा परिणाम म्हणून म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. गेल्या तिमाहीत चीनचा जीडीपी 2.6 टक्क्यांनी घसरल्याचं दिसून आलं होतं.
 
या सर्व कारणांमुळे झीरो-कोव्हिड धोरणाचा आता लोकांकडून विरोध होताना दिसून येत आहे. लॉकडाउन आणि प्रवासावरील निर्बंधांबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे.

Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती