नागपूरातील मेडिकलमध्ये तीन तर मेयोमध्ये तीन संशयीत रुग्णांना दाखल करण्यात आले होते. यामधील पाच रुग्णांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यातील मेयोतल्या एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 11 वर पोहचली आहे. यात 8 पुणे येथे तर 2 मुंबई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये कुठल्याही गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून आली नसून त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सतर्कता बाळगावी, असे आवाहन करतानाच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन क्षेत्रिय स्तरावर असावे यासाठी विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज नियमाच्या अधीन राहून शनिवार किंवा रविवारपर्यंत पूर्ण करण्यात येईल. विना प्रेक्षक आयपीएल सामन्यांसंदर्भात कुठलाही प्रस्ताव प्राप्त झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, 40 जणांचा समूह दुबईहून भारतात आला. त्यातील बाधा झालेल्यांपैकी 10 जण आहेत. त्यातील सर्वांशी संपर्क झाला असून 3 व्यक्ती कर्नाटकच्या आहेत. या समूहातील चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
नागरिकांनी घाबरुन न जाता सार्वजनिक कार्यक्रमांना होणारी गर्दी टाळावी. परदेशात जाऊन आलेल्या व्यक्तींनी 14 दिवस घरामध्ये थांबावे. राज्य शासन कोरोनासंदर्भात दर दोन तासांनी आढावा घेत आहे. खासगी प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. अतिशय जबाबदारीने काम करणाऱ्या खासगी प्रयोगशाळेला केंद्राच्या परवानगीनंतरच चाचणीचे काम दिले जाईल.
अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय यंत्रणा व्यस्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींना नागरिकांमध्ये जाता यावं, त्यांना दिलासा देता यावा यासाठी अधिवेशनाचे कामकाज शनिवार किंवा रविवारपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधापरिषद उपसभापती, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, गटनेते यांच्या बैठकीत घेण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
*नियमाच्या अधीन राहून कामकाज पूर्ण करणार - उपमुख्यमंत्री*
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी, अधिकारी आपआपल्या भागात राहण्यासाठी अधिवेशनाचे कामकाज नियमाच्या अधीन राहून पूर्ण करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. यासंदर्भात उद्या दोन्ही सभागृहात संसदीय कार्यमंत्री निवेदन करतील. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रम, विविध परिषदा, मेळावे, सभा आदी कार्यक्रम रद्द करावेत. पर्यटनाच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या समूहाने त्यांच्या परतीबाबत आरोग्य यंत्रणेशी संपर्कात रहावे, असे आवाहन केले.