महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढले, मास्क सक्तीबद्दल राजेश टोपे म्हणतात..
शनिवार, 4 जून 2022 (16:00 IST)
'मास्क वापरण्याचं आवाहन करत आहोत, सक्ती नाही', असं म्हणत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत भाष्य केलं.
राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले, "महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाणे या भागात संख्या वाढत आहे. या जिल्ह्यांचा विचार करून केंद्र सरकारनं उपाययोजना करण्यासाठी आम्हाला पत्र पाठवलं होतं.
"जिथं जिथं बंदिस्त जागा आहेत, तिथं मास्क वापरण्याचं आवाहन करावं, असं टास्क फोर्सच्या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे बस, रेल्वे, शाळा, कार्यालयं या ठिकाणी मास्क वापरावं, असं आवाहन करत आहोत. मास्क वापरण्याचं आवाहन करत आहोत, सक्ती नाही. मास्क न वापरल्यास दंड आकारला जाणार नाहीये."
"रुग्णसंख्या वाढत असल्यानं उपाययोजना करण्यात येणार आहे. लसीकरण, टेस्टिंग वाढवण्यात येणार आहेत. आरोग्य विभाग वेळोवेळी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. रुग्णसंख्या वाढत असली तरी दवाखान्यात भरती होण्याचं प्रमाण नगण्य आहे. जे रुग्ण आढळत आहेत, ते त्यांच्या प्रतिकारशक्तीनेच बरे होत आहेत. त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीये," असंही टोपे म्हणाले आहेत.
कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती?
न थांबणारा खोकला - कधीकधी हा खोकला तासाभरापेक्षा जास्त काळही येऊ शकतो. किंवा 24 तासांत खोकल्याची अशी उबळ तीन वा त्यापेक्षा जास्त वेळा येऊ शकते.
ताप - शरीराचं तापमान 37.8C म्हणजे 100.4F पेक्षा जास्त
तोंडाची चव, वास येण्याची क्षमता बदलणं - तुमच्या तोंडची चव पूर्णपणे जाते, गोष्टींचा वास येत नाही. किंवा मग या दोन्ही गोष्टी नेहमीपेक्षा वेगळ्या भासू लागतात. वास न येणे, चव न कळणे हीसुद्धा कोरोनाची लक्षणं आहेत.
डेल्टा व्हेरियंटची लक्षणं कोणती ?
ओमिक्रॉन पूर्वी आलेल्या डेल्टा व्हेरियंटने अशीच भीती निर्माण केली होती. कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांमध्ये काही वेगळी लक्षणंही दिसून आली आहेत. डोकेदुखी, घसा खवखवणं, नाक गळणं ही कोरोनाच्या नवीन डेल्टा व्हेरियंटची लक्षणं असू शकतात. युकेमध्ये डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांमध्ये ही लक्षणं आढळल्याचं प्रा. टिम स्पेक्टर यांनी केलेल्या संशोधनात आढळलंय.
कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या लोकांमध्ये जुन्या व्हेरियंटच्या संसर्गाच्या तुलनेत खोकला आणि घसा खवखवणं, थकवा आणि स्नायूदुखी जास्त तीव्रपणे जाणवते.
डोकेदुखी, घसा खवखवणं, नाक गळणं ही लक्षणं डेल्टा व्हेरियंटसंदर्भात आढळून आली आहेत.
यापैकी कोणतीही लक्षणं दिसू लागताच ताबडतोब चाचणी करून घेणं गरजेचं आहे. शिवाय चाचणीचा अहवाल येईपर्यंत कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये.
तुमच्या कुटुंबीयांनी वा सोबत राहणाऱ्यांनीही टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत घरीच थांबणं योग्य आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंटची लक्षणं काय?
ओमिक्रॉनचा संसर्ग नवा असला तरी त्यामध्येही कोरोना संसर्गाची यापूर्वी आढळणारी तीन लक्षणं आढळत असल्याचं युकेच्या NHSने म्हटलं आहे.
काही लोकांमध्ये ओमिक्रॉन हा सर्दीसारखा आढळला आहे. घसा खवखवणं, नाक वाहणं आणि डोकेदुखी ही लक्षणं ओमिक्रॉन संसर्ग झालेल्यांमध्ये आढळली.
आधीच्या कोव्हिड व्हेरियंट्मध्ये वास आणि चव जाणं, खोकला आणि जास्त ताप ही लक्षणं आढळली होती. आणि याबद्दलही सजग राहणं गरजेचं आहे.
ओमिक्रॉन आधीच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरत असला तरी तो तुलनेने सौम्य असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे.
कोव्हिडचे प्रकार
* तापासारखी लक्षणं, पण ताप नाही : डोकेदुखी, वास न येणं, स्नायूदुखी, खोकला, घसा खवखवणं, छातीत दुखणं, ताप नाही.
* तापासारखी लक्षणं आणि ताप : डोकेदुखी, वास न येणं, खोकला, घसा खवखवणं, घसा बसणं, ताप, भूक न लागणं.
* गॅस्ट्रोइंटेस्टाईनल (आतडी आणि पचनसंस्था) : डोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, अतिसार, घसा खवखवणं, छातीत दुखणं, खोकला नाही.