कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडलेल्या जपानमधूनही ११९ भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जपानमधील एका क्रुझवर अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या एका विशेष विमानानं त्यांना भारतात आणण्यात आलं आहे. यामध्ये भारतीयांसोबतच श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरूच्या नागरिकांचीही सुटका करण्यात आली आहे. या नागरिकांच्या मदतीनंतर जपाननंही भारताचे आभार मानले आहेत. तर दुसरीकडे भारतीय हवाई दलाच्या एक विमानातून चीनमधील वुहान शहरात अडकलेल्या ११२ भारतीय आणि परदेशी नागरिकांनादेखील भारतात आणण्यात आलं आहे.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली. टोक्योतून एअर इंडियाच्या विशेष विमानानं ११९ भारतीय आणि श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि पेरूच्या पाच नागरिकांना सुखरूप दिल्लीत आणलं आहे. या सर्वांना कोरोना व्हायरसमुळे डायमंड प्रिंसेस या जहाजावर वेगळं ठेवण्यात आलं होतं. जपानच्या अधिकाऱ्यांची मदत महत्त्वपूर्ण आहे. एअर इंडियाचे पुन्हा एकदा धन्यवाद. अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे.