संगोपनाची जबाबदारी पार पाडताना..

मुलांचे संगोपन करताना आईने मुलगा आणि मुलगी असा भेद करू नये. प्रत्येक महिलेकडे आदरानेच पाहिले पाहिजे ही शिकवण मुलांना लहानणपणीच देणे ही आज काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबर घरातील कामे आपल्या मुलीबरोबरच मुलालाही सांगितली पाहिजेत. 
 
घरची कामे करण्याची जबाबदारी एकटय़ा मुलीची नाही, हे मुलाच्या मनावर बिंबवले पाहिजे. अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून आपल्या मुलाच्या मनावर अनेक गोष्टींचे संस्कार आई करू शकते. परंपरागत विचारांची मंडळी पुरुषांनी घरातील विशिष्ट कामे करायची नसतात, हा दृष्टिकोन बाळगणारी असतात. आल्या गेलेल्या पाहुण्याला पाणी देण्याची जबाबदारी ही घरातील महिला वर्गाचीच असते असे मुलांच्या मनावर अजूबाजूच्या वातावरणावरून ठसले जाऊ शकते. असे समज मुलाच्या मनातून काढण्याचे काम आईलाच करावे लागते. त्यामुळे तिने घरातील कामांमध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधीही करू नये.
 
मुलांना लहानपणापासून स्वावलंबनाचे धडे द्यावेत. अनेक मुलांना आपल्या छोटय़ा छोटय़ा कामांसाठी आईला, बहिणीला हुकूम सोडायची सवय असते. घरातील आपली कामे आपणच केली पाहिजेत, आई, बहीण हे आपले नोकर नाहीत हे मुलाला योग्य प्रकारे समजावून सांगितले पाहिजे. बाहेरून आल्यावर आपले कपडे घडी घालून कपाटात ठेवणे, घरात झाडून काढणे यांसारखी कामे मुलाकडूनही करवून घेतली पाहिजेत. 
 
अनेक आया मुलांच्या चुकांवर पांघरुण घालत असतात. परंतु तसे करण्यामुळे मुले लाडावतात. म्हणूनच मुलांच्या चुका वेळच्या वेळी स्पष्ट शब्दात सांगाव्यात. चुकांबद्दल त्यांना माफी मागण्याची सवय लावावी. 
 
मुले मोठी होत असताना त्याला भविष्यात येणार्‍या अडचणींची, आव्हानांची वेळीच कल्पना द्या. यासाठी लहानपणापासून आईने मुलाशी सातत्याने संवाद ठेवावा. मुलांशी त्याच्या मित्राप्रमाणेच मोकळेपणाने बोलून त्याचा विश्वास संपादन करण्याचे काम आईला करावे लागते.  

मुलांच्या मनात असलेल्या वेगवेगळ्या शंका, प्रश्न यांची उत्तरे आईला देता आली पाहिजेत. 
 
अलीकडे पालक आणि मुलांमध्ये मोकळेपणे संवादच होऊ शकत नाही. पालक आणि मुलांमधील याविसंवादामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणूनच मुलाशी मित्रासारखे नाते तयार करा. अनेकदा वडिलांच्या स्वभवामुळे मुले त्यांच्याशी बोलायला घाबरतात. अशा वेळी आईची जबाबदारी अधिक वाढते. 
 
मुले बुजर्‍या स्वभावाची असतील तर त्यांना चारचौघांमध्ये वावरतांना अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावातील संकोची वृत्ती दूर करण्याकरिता आईनेच पुढाकार घ्यावा. त्याकरिता मुलांशी नेहमी बोलणे हा उत्तम मार्ग आहे. मुलांशी संवाद नसणार्‍या आयांमुळे त्या कुटुंबात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणूनच मुलाशी अत्यंत मोकळेपणे बोलून विविध विषयांवर संवाद साधण्याची हातोटी आईकडे असली पाहिजे. मुलांवर नीतीमत्तेचे संस्कार करण्याकरिता आईनेही आपल्या वैयक्तिक वर्तनात काही पथ्ये पाळली पाहिजेत. आपण मुलासमोर खोटे बोलत नाही ना, याची दक्षता आईने घेतली पाहिजे. 
 
आपल्या मुलाच्या मनात सकारात्मक विचार रुजवण्यासाठी आईने मुलाच्या लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजेत. परीक्षेत कमी गुण मिळाले अथवा अपयश आले तर त्या कारणावरून मुलाला टोचून बोलू नका. या अपयशातून कसे सावरायचे हे मुलाला सांगत राहा. असे केले तर त्याच्या मनात परिस्थितीशी लढण्याची वृत्ती निर्माण होईल. 

वेबदुनिया वर वाचा