UGC Double Degree: एकाच वेळी दोन पदव्या घ्यायच्या असतील तर काय करावे, जाणून घ्या

रविवार, 17 एप्रिल 2022 (14:38 IST)
चार वर्षांपूर्वी अशोकला पत्रकारितेचा अभ्यास करताना समांतर अशा अरबी भाषेच्या पदवी कोर्सला प्रवेश घ्यायचा होता. पण प्रवेश घेण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.
 
एका तर युनिव्हर्सिटीने एकाच वेळी दोन पूर्णवेळ कोर्सेस करता येणार नाहीत हे कारण देऊन त्यांना प्रवेश काही दिला नाही. त्यात आणखीन दोन्ही कोर्सेसच्या शिकवणीची वेळ ही एकच असल्याने त्यांना अडचणी यायच्या.
 
चार वर्षांपूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) नियमसुद्धा काहीसे असेच होते. या नियमांतर्गत भारतात एकाचवेळी दोन कोर्स पूर्ण करण्याची परवानगी नव्हती. अखेर चार वर्षानंतर का होईना अशोकसारख्या इतर विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाने पुढाकार घेतला आहे.
 
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मंगळवारी जाहीर केलंय की, भारतातील विद्यार्थी आता एकाच वेळी दोन पदवी कोर्स पूर्ण शकतील, मात्र त्यासाठी काही अटी असतील.
 
या निर्णयाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांच्याशी चर्चा केली.
 
काही ठराविक विषयांमध्येच हे शक्य आहे का?
* यूजीसीनुसार विषय निवडण्याची कोणतीही सक्ती नाही. दोन पदवी अभ्यासक्रमात वेगवेगळे जसं की, मानव्यशास्त्राबरोबर शास्त्रशाखेतील विषयही घेऊ शकता.
* हे दोन्ही पूर्णवेळ अभ्यासक्रम असू शकतात. तुम्ही एकतर हे एकाच विद्यापीठात पूर्ण करा. किंवा वेगवेगळ्या विद्यापीठातही तुम्ही प्रवेश घेऊ शकता.
* प्रवेशाचे नियम, विद्यार्थ्यांची पात्रता आणि वेळापत्रक हे विद्यापीठ स्तरावर ठरवले जात असल्याने दोन पदव्यांच्या अभ्यासक्रमात कोणते विषय घ्यायचे हे तेच ठरवतील.
* याचा अर्थ असा आहे की, विद्यार्थ्यांना हवं असेल तर ते गणितासोबत इतिहासाची पदवी एकाच वेळी मिळवू शकतात.
* एक पर्याय असा असू शकतो की दोन्ही अभ्यासक्रम फिजिकल मोडच्या स्वरूपात असू शकतात. फक्त अशा दोन्ही पदवी अभ्यासक्रमांची वेळ वेगळी असायला हवी.
* दुसरा पर्याय असा आहे की एक कोर्स फिजिकल स्वरूपात असेल आणि दुसरा ओपन आणि दूरशिक्षणातील किंवा ऑनलाइन कोर्स असू शकेल.
* तिसरा पर्याय असा असू शकतो की दोन्ही अभ्यासक्रम ऑनलाइन असू शकतात किंवा दोन्ही अभ्यासक्रम ओपन आणि डिस्टंस लर्निंगचे असू शकतात.
* या निर्णयात म्हटल्याप्रमाणे दोन्ही अभ्यासक्रम एकाच स्तरातील असावेत. म्हणजेच एकतर दोन्ही कोर्सेस पदवीचे असावे किंवा पदव्युत्तर असावे.
* एकीकडे पदवी आणि दुसरीकडे पदव्युत्तर कोर्स अशी तरतूद या निर्णयात करण्यात आलेली नाही.
 
पण अचानक असा निर्णय का?
जुलै 2020 मध्ये मोदी सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणले. हा एक प्रकारचा धोरणात्मक दस्तऐवज आहे, यात सरकारने शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतचा आपला दृष्टिकोन स्पष्ट केला आहे.
 
या धोरणानुसार विद्यार्थ्यांना हवं असेल तर त्यांना वेगवेगळ्या विषयांचा एकाचवेळी अभ्यास करता येऊ शकतो आणि एकाच वेळी अनेक कौशल्ये आत्मसात करता येऊ शकतील, असा प्रस्ताव सरकारने मांडला होता.
उदाहरण म्हणून बघायचं झालं तर, गणिताचा विद्यार्थी डेटा सायन्सचा अभ्यास करू शकेल तर पत्रकारितेचा अभ्यास करणारी व्यक्ती भाषा अभ्यासक्रमही करू शकेल.
 
नव्या शैक्षणिक धोरणाचा हा प्रस्ताव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
आता दुसरं कारण म्हणजे भारतातील उच्च शिक्षणाच्या मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत आहे. उच्च शैक्षणिक संस्था आपल्या कॅम्पसमध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी केवळ 3% विद्यार्थ्यांनाचं प्रवेश देऊ शकतात.
 
अनेक विद्यापीठ विविध विषयांचे ऑनलाइन अभ्यासक्रम आणि ओपन आणि दूरशिक्षण चालवत आहेत. चांगले अभ्यासक्रम असूनही त्यात जागा रिक्त ठेवल्या जात होत्या. इच्छा असूनही विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येत नव्हता.
 
सर्व तरतुदी एकमेकांशी सुसंगत असाव्यात यासाठी यूजीसीने हा निर्णय घेतला आहे.
 
आता या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार?
2022-2023 या शैक्षणिक सत्रापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव आहे. यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे यूजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येतील.
 
वैधानिक संस्था आणि उच्च शिक्षण संस्थांच्या कौन्सिलची देखील यास मान्यता आवश्यक असेल. तरच त्याची अंमलबजावणी होऊ शकते.
 
ज्या संस्थांच्या वैधानिक संस्थांनी (विद्यापीठ प्रशासन) या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला नाही, त्यांना हा निर्णय घेण्याबाबत सक्ती करता येणार नाही.
 
मात्र, यूजीसीने या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून सर्व विद्यापीठांना प्रोत्साहन मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.
हा निर्णय डिप्लोमा, अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी लागू असेल. हे पी.एचडी आणि एम.फिल पदवीसाठी लागू होणार नाही.
 
जर पहिल्या वर्षी दोन अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला नसेल तर दुसऱ्या किंवा आणि तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळू शकेल का?
होय. असं करायला हरकत नाही. नियमांनुसार विद्यार्थ्यांना दोन वेगवेगळ्या विद्यापीठांमधून दोन पदवी अभ्यासक्रमही करता येणार आहेत.
 
नव्या शैक्षणिक धोरणात मल्टिपल एंट्री आणि एक्झिट सिस्टिमचीही चर्चा करण्यात आली असल्याने एका अभ्यासक्रमाला पहिल्या वर्षी प्रवेश घेता येणार असून दुसऱ्या अभ्यासक्रमाला दुसऱ्या वर्षी प्रवेश घेता येणार आहे.
 
या निर्णयानुसार दोन्ही पदवी अभ्यासक्रम एकाच वेळी सुरू आणि पूर्ण करण्याची सक्ती नाही.
एखादा विद्यार्थी दोन्ही कोर्स करू शकेल हे लक्षात ठेवूनच अभ्यासक्रमाचं वेळापत्रक तयार केल जाईल का?
 
त्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर प्रयत्न करावे लागतील.
 
ज्या अभ्यासक्रमांची मागणी जास्त आहे किंवा जे पॉप्युलर अभ्यासक्रम आहेत त्याबाबत विद्यापीठ स्तरावर असे निर्णय घेतले जाऊ शकतात.
 
दोन्ही अभ्यासक्रमांसाठी उपस्थितीची आवश्यकता असेल का?
त्यासाठी विद्यापीठाला मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्याचे अधिकार असतील. ही व्यवस्था विद्यापीठांसाठी अनिवार्य नसून ऐच्छिक आहे.
 
याचा CUET शी काही संबंध आहे का?
हा निर्णय ऑनलाइन आणि ओपन-डिस्टन्स लर्निंगबद्दल सुध्दा संबंधित असल्याने आणि एक पर्यायी व्यवस्था असल्याने, त्याचा कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेशी (CUET) थेट काहीही संबंध नाही.
 
मात्र विद्यार्थ्यांना फिजिकली उपस्थित राहून पदवी घेत असलेल्या अभ्यासक्रमात संस्थेने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करावं लागेल. जर त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना CUET उत्तीर्ण होणं बंधनकारक असेल, तर विद्यार्थ्यांना त्या अटींची पूर्तता करावीच लागेल.
 
भारताव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या देशात अशी व्यवस्था आहे का?
यूजीसीच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, जगातील इतर कोणत्याही देशात अशी व्यवस्था आहे की नाही, याची त्यांना माहिती नाही.
 
ते म्हणाले की, "कदाचित भारत हा या दिशेने पुढाकार घेणारा पहिला देश असेल, जो जगासमोर आदर्श ठेवू शकेल."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती