7.5 श्रेयांक मिळविणारे विद्यार्थी PhD साठी पात्र

बुधवार, 15 जून 2022 (07:53 IST)
पदवी अभ्यासक्रमात 10 पैकी 7.5 श्रेयांक मिळवणारे विद्यार्थी कोणत्याही पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पूर्ततेविनाच पीएचडीसाठी पात्र ठरणार असल्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. दर्जाहीन नियतकालिकांमध्ये आपले संशोधन प्रसिद्ध करण्याच्या पद्धतीला अटकाव करण्याच्या हेतूने यूजीसीने काही नवे नियम घालून दिले आहेत. आपल्या संशोधनाचे पेटंट करून घ्यावे किंवा विद्वत प्रमाणित नियतकालिकांमध्ये (पीअर रिव्हय़ूड जर्नल्स) संशोधन प्रसिद्ध करावे, असे म्हटले आहे.
 
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विकसित करण्यात आलेल्या प्रथम वर्ष पदवी कार्यक्रमानुसार 8 सत्रांच्या 4 वर्षीय अभ्यासक्रमानंतर पीएचडीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10 पैकी 7.5 श्रेयांक मिळवणे आवश्यक आहे. यात अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष विद्यार्थी आणि आर्थिकदृष्टय़ा मागास वर्गाला 0.5 श्रेयांकाची सूट देण्यात आली आहे.
 
4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी प्रोत्साहन देणे हे उच्च शिक्षण संस्थांमधील संशोधन वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे यूजीसीने म्हटले आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांना 7.5 पेक्षा कमी श्रेयांक आहेत. त्यांना पीएचडीला प्रवेश घेण्यासाठी एक वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती