बारावीच्या विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या, मंत्री उदय सामंत यांनी केली ही मोठी घोषणा

बुधवार, 1 जून 2022 (22:25 IST)
तुम्ही जर इयत्ता बारावीचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. बारावी आणि सीईटी या परीक्षांच्या बाबतील शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही परीक्षांना ५० – ५० टक्के महत्त्व असणार असून पुढील वर्षापासून त्यानुसारच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे इथून पुढे फक्त सीईटीचीच नाही तर बारावीच्या परीक्षेचीही विद्यार्थ्यांना व्यवस्थित तयारी करावी लागणार आहे.

गेल्या काही वर्षात बारावीतील विद्यार्थी बारावीच्या परीक्षेकडे फक्त पास होण्यापुरतं बघतात तर सीईटीला जास्त महत्त्व देतात. उच्च शिक्षणासाठी सीईटीचे मार्क्सच ग्राह्य धरले जात असल्याने बारावीच्या परीक्षेपेक्षा सीईटीला प्राधान्य दिले जात होते. २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षापासून मात्र सीईटीतले ५० टक्के आणि बारावीतले ५० टक्के मार्कांच्या आधारावर प्रवेश दिला जाणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. याशिवाय सीईटीच्या निकालाची तारीखदेखील जाहीर करण्यात आली असून १ जुलै रोजी निकाल लागेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. १ सप्टेंबरपासून पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे.
 
या करण्यामागचं कारण सामंत यांनी स्पष्ट केले असून, बारावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांकडून कमी महत्त्व मिळत असल्याचे त्यांनी म्हणले आहे. इथून पुढे बारावीचे मार्कही प्रवेशासाठी आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना समजलं तर ते सीईटीइतकाच बारावीचाही अभ्यास करतील. शिवाय आता बारावीनंतर ज्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतल्या जातात त्यांची संख्याही आता कमी करण्यात येणार आहे.
 
सीईटीला अधिक महत्त्व दिले जात असल्याने विद्यार्थी त्यासाठी वेगवेगळे क्लासेस लावतात. पण याचा परिणाम बारावीच्या नियमित तासिकांवर होत आहे. वर्गामध्ये विद्यार्थीच बसत नसल्याची परिस्थिती आहे. आता ५० – ५० टक्के महत्त्व असल्यामुळे विद्यार्थी बारावीच्या तासिकाही नित्यनेमाने पूर्ण करतील. येत्या ५ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२२ दरम्यान पीसीएम तर १२ ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान पीसीबीची एमएचटी सीईटी परीक्षा होणार आहे. त्या सगळ्यांसाठी नवे नियम लागू असणार आहेत अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती