दहावी आणि बारावीनंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचा ओढा वैद्यकीय आणि अभियांत्रिकीकडेच जास्त असतो. यामागे अनेक कारणं आहेत. विद्यार्थ्यांसह पालकांची मानसिकता असेल किंवा मग विद्यार्थ्यांना या विषयाचे असणारे आकर्षण. पण या दोन क्षेत्रांकडे विद्यार्थ्यांचा कल जरा जास्त दिसून येतो.
परंतु गेल्या काही दिवसांपासून प्राणीशास्त्राकडेही विद्यार्थी जात आहेत. अलीकडील काळात पुणे, मुंबई भागात याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
प्राणीशास्त्र म्हणजे नेमके काय? ज्या प्रमाणे आपण जीवशास्त्राचा अभ्यास करतो, अगदी त्याच प्रमाणे प्राण्याचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे प्राणीशास्त्र होय. यात प्राण्यांच्या सर्वच जातींचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांतून हा विषय शिकवला जातो. या क्षेत्रात करिअर संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. रसायनशास्त्र, संख्याशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतीशास्त्र यांच्या प्रमाणेच प्राणीशास्त्राचा आपण अभ्यास करू शकतो.
यात असणार्या संधी डिस्क्व्हरी आणि नॅशनल जिऑग्रॅफीक या वाहिनीवरून या संदर्भात अत्यंत सुरेख कार्यक्रम दाखवले जातात. हे कार्यक्रम तयार करून देण्यापासून त्यात संशोधक, संशोधन सहाय्य अशा विविध संधी यात उपलब्ध आहेत. फक्त विद्यार्थ्यांनी स्वत:हून यात रस घेणे गरजेचे आहे.
प्राणीशास्त्राच्या अभ्यासकांना या विषयाचे प्राध्यापक बनण्याची संधी तर आहेच. शिवाय मरीन बायोलॉजी, आणि एक्सोबायोलॉजी या क्षेत्रातही उत्तम संधी आहे. या मंडळींना वनखात्यातही नोकरी मिळू शकते, वाईल्ड लाईफचे अत्यंत जवळून अध्ययन करण्यासाठी प्राणीशास्त्राचा अभ्यास हाच एकमेव चांगला पर्याय आहे.