पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी या बजेटचे कौतुक 'लाजबाब' अशा शब्दांत केले. ते म्हणाले, की हे बजेट सामान्य माणूस, मध्यम वर्ग व शेतकर्यांचे आहे. संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारचे हे पाचवे बजेट प्रथमच लोकांच्या अपेक्षेनुरूप आहे.
बजेटसंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता, पंतप्रधानांच्या चेहर्यावरचा आनंद त्यांना लपवता आला नाही. ते म्हणाले, की या बजेटमुळे कर्जात बुडालेल्या शेतकर्यांना बाहेर निघण्यास मदत होईल. तसेच च लन फुगवटा रोखण्यास, रोजगाराच्या संधी वाढविण्यास तसेच आर्थिक मंदीतून वाचण्यासाठी आर्थिक विकासावर जीडीपी वाढविण्यावर भर दिला जाईल.
नंतर दूरदर्शनवर दिलेल्या प्रतिक्रियेत पंतप्रधान म्हणाले, की पी. चिदंबरम यांनी अतिशय चांगले काम केले आहे. या बजेटमध्ये सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवण्यात आले आहे. प्राप्तीकराची मर्यादा वाढविल्याने प्रत्येक करदात्याला याचा लाभ होईल. लहान शेतकर्यांची कर्जे माफ झाल्याने त्यांना दिलासा मिळाला असेल.
बजेटमुळे विकासाची गती कायम राहील. तसेच रोजगारांच्या नव्या संधी पुढे येतील. शेतकर्यांचे कर्ज माफ करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना हे अतिशय जबाबदारीने उचललेले पाऊल असून तो पूर्णपणे योग्य असल्याचे ते म्हणाले.
कृषी क्षेत्रासाठी फार काही केले जात नाही, अशी एक लोकांची धारणा झाली आहे. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत शेतकरी सहभागी नाहीत, असेही बोलले जात होते. त्यामुळेच शेतकर्यांमध्येही निराशा होती. याकडे लक्ष वेधून आता आपल्याला देशाच्या कृषी विकास दरातही वाढ करण्याची गरज असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.