नीतिशतक निरूपण : सर्वांसाठी उपयुक्त ग्रंथ

शनिवार, 21 मे 2022 (13:13 IST)
भारतीय वाङ्मयाच्या इतिहासात जसे कथा, आख्याने, व्याकरण ग्रंथ, उच्चारणशास्त्र ग्रंथ, तत्त्वज्ञान ग्रंथ यांचे स्थान आहे, त्याच प्रमाणे नीतिशास्त्राच्या ग्रंथांचे देखील महत्वपूर्ण असे स्थान आहे. नीतिशास्त्रीय वाङ्मयात विशेषत: माणसाने चांगले जीवन जगण्याकरिता “काय करावे आणि काय करू नये” या विषयी प्रतिपादन केलेले असते. प्राचीन भारतीय साहित्यात भर्तृहरिविरचित-नीतिशतकम्, कामंदकीय नीतिसार, कौटिल्याचे अर्थशास्त्र इत्यादी ग्रंथांचा समावेश होतो. 
 
भर्तृहरि हे एक यशस्वी राजे होते. त्यांच्या कालखंडाविषयी विद्वानांमध्ये एकमत नाही. काही विद्वान त्यांचा काळ इसवी सन ७८ सांगतात. तर काही विद्वान त्यांचा कालखंड इसवी सन ५४४ सांगतात. त्यांनी नीतिशतकम्, वैराग्यशतकम्, शृंगारशतकम् अशी शतक काव्ये तसेच वाक्यपदीयम् हा शास्त्रीय ग्रन्थ यांची रचना केली आहे. असे उल्लेख मिळतात.
 
नीतिशतकम् या ग्रंथात त्यांनी १०० पेक्षा अधिक श्लोकांमधून सज्जनांची लक्षणे, मूर्खांची लक्षणे, विद्वानांची लक्षणे, कर्माचे महत्व, सत्कर्माचे महत्व, सुसंगतीचे महत्व इत्यादी विषयांवर उद्बोधक विचार मांडले आहेत. शिक्षक, विचारवंत, अभ्यासक, प्रवचनकार, कीर्तनकार आणि पालक अशा सर्वांसाठीच उपयुक्त असे हे श्लोक आहेत. यातील श्लोक, त्यांचे अर्थ आणि ह.भ.प. डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर यांचे निरूपण असा हा ग्रंथ निश्चितच संग्रहणीय आहे.
 
प्रस्तुत पुस्तक आधुनिक भारताचे शिल्पकार, आधुनिक भारतातील पहिले लोकनेते लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले आहे.
 
या पुस्तकात नीतिशतकातील बहुतेक श्लोकांचा अर्थ आणि निरूपण देण्यात आले आहे. तसेच विचार शतक या शीर्षकाखाली १०० असे विचार जे वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त आहेत, त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यानंतर श्रीगुरू भगवानशास्त्रीमहाराज आणि डॉ. चंद्रहास शास्त्री यांच्या परिचयात्मक लेखांचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ देखील अतिशय चित्तवेधक अशा प्रकारचे आहे.
 
नीतिशतक निरूपण
डॉ. चंद्रहास शास्त्री सोनपेठकर,
सहलेखन: सौ. मानसी चंद्रहास शास्त्री सोनपेठकर,
पृष्ठे: ११९
मूल्य: १८४ रु.
प्रकाशन: शॉपिजेन प्रकाशन, अहमदाबाद

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती