मराठी कविता : उद्या साठी ठेवता ठेवता,आज विसरून जातो
शुक्रवार, 20 मे 2022 (16:04 IST)
उद्या साठी ठेवता ठेवता, आज विसरून जातो,
भविष्य सुधारता सुधारता, आज जगायचं राहून जातं,
मुलांसाठी हे करू,ते करू म्हणत, पोटाला चिमटा,
एक घर बांधण्या साठी, ओढवतो नाना चिंता,
घरच्या लक्ष्मी ला उपेक्षित ठेवून, जमवतो सोनं,
ते सुरक्षित ठेवता ठेवता गमावतो समाधान,
डोक्यावर चा ताण जराही कमी होतं नाही,
मुलांच्या गरजा पुरवताना, त्यांना जवळ घेता येत नाही,
काळाचे फासे भविष्यात उलटे पडतात,
वेळच नसतो मुलांना, ते कुठं तुमची फिकीर करतात,
अमाप पैसे ते ही कमवतात, तुमच्या पैशाची गरज नसते,
तुम्ही मात्र तेच जमवायचं म्हणून, आयुष्याची वाट लावलेली असते,
असच व्यस्त गणित चालू राहतं सदा,
वेळ अन गरज, ह्यांची सांगड जमत नाही कित्येकदा,
म्हणून जगावं आजच, भरभरून पोट भर,
नंतर त्याची खंत, वाटणार नाही आयुष्यभर!!