झ्विगॅटो : नंदिता दासने डिलिव्हरी बॉयच्या रोलसाठी कपिल शर्माला घेतलं, कारण...

मंगळवार, 21 मार्च 2023 (17:53 IST)
PR
दिग्दर्शक म्हणून झ्विगॅटो हा नंदिता दासचा तिसरा चित्रपट आहे. टेलिव्हिजनच्या पडद्यावर कॉमेडीचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिल शर्माचा अभिनय हे या सिनेमाचं सगळ्यात मोठं विश्लेषण आहे.
 
कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगाराची नोकरी जाते. त्यानंतर तो भुवनेश्वरमध्ये फूड डिलिव्हरीचं काम करायला लागतो. या कामगाराची, मानस महतोची भूमिका कपिल शर्माने केली आहे.
 
कॉमेडी हीच ओळख असलेल्या कपिल शर्माला या भूमिकेसाठी निवडण्याचा विचार नंदिता दासने एका अवॉर्ड फंक्शनमधल्या व्हीडिओ क्लिप्स पाहून केला होता.
 
कपिल प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरसोबत हा कार्यक्रम होस्ट करत होता.
 
गेल्या वर्षी टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये समकालीन जागतिक सिनेमा या कॅटेगरीत या सिनेमाचा प्रीमियर झाला होता.
 
प्रीमियरनंतर तातडीने फेअरमोंट यार्क हॉटेलमध्ये संवाद साधताना नंदिता दास यांनी म्हटलं होतं, “कपिल खूप स्वाभाविक आणि सहजगत्या अभिनय करतो. त्याच्यावर प्रतिमेचा कोणताही दबाव नाही. तो सामान्य व्यक्तिसारखाच दिसतो.”
 
नंदिताने कपिलला इन्स्टाग्रामवर फॉलो करायला सुरुवात केली आणि त्याच्या काही व्हीडिओ क्लिपही पाहिल्या. त्यानंतर नंदिताला जाणवलं की, तो स्वतः एक मोठा स्टार आहे आणि सर्वसामान्य व्यक्ती अजिबातच नाहीये. पण तरीही तिला त्याच्यात एका मध्यमवर्गीय माणसाचा चेहरा दिसत राहिला.
 
नंदिताने जेव्हा तिच्या कास्टिंग डायरेक्टला मानस महतोच्या व्यक्तिरेखेसाठी कपिलचं नाव सुचवलं, तेव्हा त्याला धक्काच बसला. कपिल शर्माला जेव्हा या भूमिकेसाठी विचारलं, तेव्हा त्यालाही भूमिका स्वीकारताना भीतीच वाटली. पण आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नंदिताचा विश्वास सार्थ ठरताना दिसतोय. कपिलने आपल्या भाषा आणि बॉडी लँग्वेजवरही खूप मेहनत घेतली.
 
नंदिता दासने म्हटलं, “त्याने आपले जुने दिवस आठवले आणि भूमिका पूर्णपणे आत्मसात केली. एका एसी रुममधून दुसऱ्या एसी रुममध्ये जाताना मी कडक ऊन विसरलोच होतो. या सिनेमाने त्याला त्या दिवसांची पुन्हा एकदा आठवण करून दिली.”
 
कशी सुचली सिनेमाची गोष्ट?
‘झ्विगॅटो’ची कल्पना कोरोना काळात सुचली होती. सुरुवातीला चार दिग्दर्शक एकत्र येऊन नवीन आणि शहरी भारतातील गोष्टींवर एक अँथॉलॉजी बनवणार होते. यामध्ये आपल्या आजूबाजूला वेगाने घडणाऱ्या बदलांवर आधारित गोष्टींवर काम करायचं होतं. त्यामध्ये ही एक कल्पना होती, पण ती पुढे गेली नाही.
 
त्यानंतर नंदिता दासने आपल्या या वीस मिनिटांच्या कथेवर पूर्ण लांबीची फिचर फिल्म बनविण्याचा निर्णय घेतला.
 
नंदिताची सुरूवातीची 20 मिनिटांची गोष्ट ही एका जोडप्याची होती. नंदिताने त्यामध्ये मुलं, कुटुंब आणि त्यांचे एकत्रित संघर्ष आणून त्याला एका चित्रपटाचं रुप दिलं.
 
मंटो किंवा फिराकसारख्या चित्रपटांनंतर नंदिताला नातेसंबंधांवर आधारित एका चित्रपटावर काम करायचं होतं.
 
या चित्रपटाच्या पटकथेसाठी तिने आपला मित्र आणि स्क्रोल वेबसाइटचे संस्थापक समीर पाटील यांना सोबत घेतलं. सुरुवातीच्या चर्चेनंतर सिनेमाची पटकथा ही बेरोजगारी, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या, असंघटित कामगारांची अर्थव्यवस्था आणि नवीन स्टार्ट अपवर आधारित होती.
 
या मुद्द्यांशी संबंधित आकडे आणि संशोधनांवर आधारिक गोष्टी पटकथेत घेतल्या गेल्या. त्याशिवाय फूड डिलिव्हरीचं काम करणाऱ्या अनेक तरुणांसोबत बोलून त्यांचे इनपुट्सही घेण्यात आले, जेणेकरुन चित्रपट प्रासंगिक वाटेल.
 
नंदिता दासने म्हटलं, “जगभरात गिग इकॉनॉमी म्हणजेच असंघटित कामगारांबद्दल बोललं जात आहे. मग ते अॅमेझॉन असेल की ऊबर कर्मचारी असोत. भारतातही यावर चर्चा होत आहेत.
 
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या अडचणी
नंदिता दास यांच्या मते भारतात लिंग, जात, वर्ग आणि धर्माच्या आधारावर असमानता आणि भेदभावाची परिस्थिती आहेच आणि आता नवीन अर्थव्यवस्थेत ही दरी वाढतच चाललीये.
 
नंदिता सांगते की, तिच्या चित्रपटामध्ये त्या लोकांची गोष्ट आहे, जे नवीन शहरी कामगार आहेत. त्यांच्यामुळेच कोरोनात लॉकडाऊनच्या काळातही लोकांचं आयुष्य सुरळीत चालत राहिलं. पण त्याच लोकांना आता भेदभाव आणि उपेक्षेला सामोरं जावं लागत आहे.
 
नंदिताने म्हटलं, “ही त्या लोकांची गोष्ट आहे, जे आपल्या आयुष्यात आहेत पण अदृश्य आहेत. कोरोनाच्या संकट काळात याच लोकांनी आपल्यासाठी कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीची सोय दिली. त्यांना फाइव्ह स्टार रेटिंग, टिप्स द्यायला किंवा त्यांच्यासोबत थोडंस माणुसकीने वागणं आपल्याला जड जाऊ नये.”
 
डिलिव्हरी बॉइजच्या रोजच्या आयुष्यात फार काही मोठं घडत नाही. चांगलं रेटिंग मिळवून काहीतरी इन्सेन्टिव्ह मिळवावेत एवढीच त्यांची अपेक्षा असते. पण त्यासाठी अनेकदा त्यांना आत्मसन्माशीही तडजोड करावी लागते.
 
आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी ते पण आपल्या आयुष्यात आनंदाचे क्षण शोधत असतात.
 
नंदिता दास सांगतात, “सिनेमाच्या माध्यमातून अशा छोट्या छोट्या गोष्टी दाखविण्यात मला रस आहे.”
 
पण तरीही झ्विगॅटो ही सगळं काही गोड-गोड असल्याची भावना देणारा चित्रपट नाहीये. सिनेमा अशाही काही अडचणी दाखवतो, ज्यांच्यावर काही तोडगाही नाही.
 
नंदिता म्हणते, “सिनेमामुळे काही चित्र बदलेल किंवा समस्येवर काही उपाय निघेल असंही नाही. सिनेमा केवळ तुम्हाला आरसा दाखवतो. या लोकांचं आयुष्य असं आहे, एवढंच सांगतो. जर लोकांमध्ये सहानुभूती निर्माण झाली आणि समाजात खोलवर दडून बसलेल्या काही गोष्टी बाहेर आणता आल्या तर चांगलंच आहे.”
 
सिनेमात मानस महतोच्या मुख्य भूमिकेत कपिल शर्मा आहे, तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत शाहाना गोस्वामी आहे. तिनेही तिची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावली आहे.
 
नंदिताच्या मते शहाना गोस्वामीमध्येही कपिल शर्मा इतकीच एनर्जी दिसते.
 
नंदिता सांगते, “महिलांच्या व्यक्तिरेखा साकारताना मला नेहमीच मजा येते.”
 
कपिल शर्माचं अजून एका गोष्टीसाठी कौतुक करायला हवं. ते म्हणजे सिनेमात काम करत असताना तो स्थानिक कलाकारांसोबत पूर्णपणे मिळूनमिसळून वागत होता.
 
सिनेमात पाच कलाकार मुंबईमधले आहेत, बाकी सगळे कलाकार भुवनेश्वरमधील स्थानिक कलाकार आहेत.
 
‘झ्विगॅटो’ ही झारखंडमधील एका कुटुंबाची गोष्ट आहे, जे भुवनेश्वरमध्ये राहात आहे.
 
हिंदी सिनेमात दिसणार भुवनेश्वरमधील गल्लीबोळ
नंदिता दास सांगतात, “एका भारतामध्ये अनेक भारत आहेत. मी दहा भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. देशातल्या अनेक भागांत गेले आहे. सुरुवातीच्या काळात मी सोशल वर्कही केलंय. मला नेहमी वाटतं की, फिल्ममेकर्सना नवीन जागा, भाषा आणि लोकांबद्दल बोलायला हवं.”
 
वैयक्तिक आयुष्यात नंदिताचं भुवनेश्वरशी नातं आहे, पण या फिल्मच्या शूटिंगदरम्यान तिला भुवनेश्वरमध्ये राहाण्याची संधी मिळाली.
 
नंदिता सांगते, “मला लोकांना सांगावं लागतं की, मी ओडिशाची आहे. लोक मला बंगाली समजतात आणि मी ओडिशाची असल्याचं त्यांना सांगते. माझ्यात प्रादेशिकवाद नाहीये, पण ओडिशाबद्दल मला नेहमी असाच अनुभव आलाय.”
 
महानगरांव्यतिरिक्त नवीन शहरांमध्ये सिनेमाचं शूटिंग करण्याची नंदिताची इच्छा होती.
 
याबद्दल बोलताना तिने सांगितलं, “नव्याने वाढणाऱ्या शहरांमध्ये पारंपरिकता आणि आधुनिकतेचं एक मिश्रण असतं, जे ठळकपणे पाहायला मिळते. अशा ठिकाणी भारतीयत्वाची जाणीव तीव्रतेनं होते. त्यामुळेच मी विचार केला की, भुवनेश्वरमध्ये शूटिंग का करू नये. अजूनतरी हे शहर हिंदी सिनेमांमध्ये तितक्या चांगल्या पद्धतीने दाखवलं गेलं नाहीये.”
 
'झ्विगॅटो' केन लोचच्या 2019 मध्ये आलेल्या ‘सॉरी वुई मिस्ड यू’ ची आठवण करून देतो.
 
हा चित्रपट ब्रिटनमध्ये फूड डिलिव्हरी करणाऱ्या एका व्यक्तीच्या आणि त्याच्या पत्नीच्या अडचणींवर आधारित आहेत. केन लोचच्या सिनेमांमध्ये कामगार वर्गाचं चित्रण नेहमी पाहायला मिळतं, पण भारतीय सिनेमात या वर्गाचं तितकं प्रभावी चित्रण झालं नाहीये.
 
नंदिता दास याबाबतीत वेगळी ठरते.
 
नंदितासाठी केवळ सिनेमा म्हणजेच आयुष्य नाहीये. मी सतत सिनेमाच्याच विचारात असते, असा दावा ती करत नाही. ती सिनेमाकडे एक माध्यम म्हणून पाहते.
 
ती म्हणते, “सिनेमा लोकांपर्यंत पोहोचायला हवा आणि त्याने लोकांच्या प्रश्नांची उत्तर दिली नाही, तरी एका चर्चेला तोंड तरी फोडलं पाहिजे.”
 
‘झ्विगॅटो’ डिलिव्हरी बॉइजच्या आयुष्याबद्दल, त्यांना येणाऱ्या अडचणींबद्दल चर्चा सुरू करेल, अशी आशा तिला वाटते.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती