बॉलीवुडमधील दिवगंत अभिनेता, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार विनोद खन्ना यांना चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. चित्रपट जगतात भारतातील सर्वोच्च बहुमान असलेला हा मरणोत्तर पुरस्कार जाहीर त्यांना जाहीर करण्यात आला आहे.
विनोद खन्ना यांनी बॉलीवुडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनय साकारला आहे. त्यांनी मेरे अपने, इंसाफ, परवरिश, मुकद्दर का सिकंदर, कुर्बानी, दयावान, मेरा गाव मेरा देश, चांदनी, द बर्निंग ट्रेन आणि अमर अकबर अँथोनी यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. विनोद खन्ना यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या निर्णायक भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी नकारात्मक आणि चरित्र भूमिकाही सक्षमपणे पेलल्या आहेत. राजकारणात सक्रीय असतानाही त्यांनी चित्रपटसृष्टीत कार्यरत होते.
सुनिल दत्त यांच्या “मन का मीत’या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी 1968मध्ये पर्दापण केले. मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारण्यापूर्वी त्यांनी “आन मिलो सजना’,“पूरब और पश्चिम’आणि “सच्चा छूटा’सारख्या चित्रपटात सहाय्यक खलनायकच्या भूमिका केल्या होत्या. 1971मध्ये गुलजारद्वारा दिग्दर्शित “मेरे अपने’पासून त्यांची कारकिर्द बहरात आली. त्यानंतर त्यांनी “हेराफेरी’,“खून पसीना’,“अमर अकबर ऍथोनी’आणि “मुकद्दर का सिंकदर’यासारखी ब्लॉकबस्टर चित्रपट दिली.
2015 मध्ये प्रदर्शीत झालेला “एक थी रानी ऐसी भी’हा त्यांचा चित्रपट अखेरचा ठरला. दरम्यान, गतवर्षी 27 एप्रिल रोजी दिर्घ आजाराने त्यांचे मुंबईत निधन झाले होते. त्याप्रसंगी ते पंजाबमधील गुरुदासपुर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजग सरकारमध्येही ते केंद्रीय मंत्री होते.