'आदिपुरुषवर मीम्स बनवण्याची गरज नाही, कारण...', सोशल मीडियावर भन्नाट प्रतिक्रिया
शनिवार, 17 जून 2023 (14:46 IST)
रामायणावर आधारित आदिपुरुष सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सोशल मीडियावर तर प्रतिक्रिया, मीम्स यांचा अक्षरश: पाऊस पडताना दिसतोय. ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात रामाच्या भूमिकेत अभिनेता प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन, हनुमानाच्या भूमिकेत देवदत्त नागे, तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहे.
रामायण हे भारतात आस्थेचं केंद्र आहे. रामायणाला कुणी महाकाव्य म्हणतं, कुणी कथा म्हणतं, कुणी इतिहास म्हणतं. यात मतमतांतरं असली तरी रामायणाचं भारतीय जनमानसांत अढळ स्थान आहे, हे सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे.
त्यामुळे रामायणावर आधारित गोष्टींबाबत उत्सुकता आणि चर्चा भारतात दिसणं साहजिक आहे आणि ते ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाच्या निमित्तानंही दिसून आलं.
सिनेमाच्या ट्रेलरनंतरच खरंतर चर्चेला तोंड फुटलं होतं. मात्र, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक सिनेमावरील आपापली मतं सोशल मीडियाच्या आधारे मांडताना दिसतायेत. यात अनेकांचा सूर टीकेचा दिसून येतो.
आदिपुरुष सिनेमा नियोजित वेळेच्या उशिरा प्रदर्शित होण्याचं कारणच मुळात ग्राफिक्समधील सुधारणा हे सांगण्यात आलं होतं आणि आता या सिनेमावरील टीकेचा सर्वात मोठा निशाणा ग्राफिक्सच बनलंय.
आदिपुरुष सिनेमाच्या शो दरम्यान एक सीट हनुमानाच्या नावानं रिकामी ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती. हाच धाग पकडत ट्रेंडुलकर नावाच्या ट्विटर युजरनं टोला लगावला आहे.
आदिपुरुष प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेची आठवण काढत आहेत.
राजस्थानमधील जगदगुरु रामाननंदाचार्य राजस्थान संस्कृत विद्यापीठातील तत्वज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्री कोसलेन्द्रदास यांनीही टीका केलीय.
आशिष सिंग नामक ट्विटर युजरनं मीम शेअर करत सिनेमा पाहायला आल्यानं अडकल्याची भावना व्यक्त केलीय.
अंकित यादव नामक फेसबुक युजरनं आदिपुरुष सिनेमातील हा फोटो शेअर करत म्हटलंय की, "किचन में जगह कम होने की वजह से, एक के ऊपर एक रखे मसालों के डिब्बे…"
वरिष्ठ पत्रकार नरेंद्र नाथ मिश्रा यांनी आदिपुरुष सिनेमातील संवादाचा उल्लेख करत म्हटलंय की, ज्यानं हे संवाद लिहिलेत, ते भावनांना धरून नाहीत.
सोल्जर नामक ट्विटर युजरनं सलमान खानचा उल्लेख करत आदिपुरुष सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत याला टोमणा मारला आहे.
नेपाळमध्येही 'आदिपुरुष'वरून वाद
आदिपुरुष चित्रपटात सीतेला 'भारत की बेटी' संबोधण्यावरून शेजारी देश नेपाळमध्ये वाद निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
या संवादांवर काठमांडूच्या महापौरांनी आक्षेप घेतला असून तत्काळ तो हटवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सीतेचा जन्म नेपाळच्या जनकपूरमध्ये झाल्याचा दावा नेपाळकडून केला जातो. यामुळेच नेपाळमध्ये या डायलॉगवरून वाद सुरू झाला.
नेपाळचे महापौर बालेंद्र शाह म्हणाले, “आदिपुरुष चित्रपटात सीतेला भारत की बेटी संबोधल्याचा डायलॉग हटवला जात नाही, तोपर्यंत कोणताही हिंदी चित्रपट काठमांडूमध्ये चालवू दिला जाणार नाही.”
ही चूक सुधारण्यासाठी बालेंद्र शाह यांनी निर्मात्यांना 3 दिवसांची मुदत दिली.
नेपाळच्या सेन्सॉर बोर्डचे सदस्य ऋषिराज आचार्य म्हणाले, “आम्ही बुधवारी चित्रपट पाहिला. त्यावेळी आम्ही वितरकांना सांगितलं की डायलॉग हटवल्यानंतरच आम्ही त्याच्या स्क्रिनिंगसाठी परवानगी देऊ शकतो.”
नेपाळमध्ये चित्रपटातून हा डायलॉग कापण्यात आल्याचं आचार्य यांनी सांगितलं.
ते म्हणाले, “आम्ही नेपाळमध्ये दाखवण्यात येत असलेल्या शोमधून तो भाग वगळला आहे. पण सर्वच आवृत्तींमधून हा भाग वगळण्यात आला पाहिजे.