या भारतीय अभिनेत्याची गोष्ट चीनमधील विद्यार्थ्यांना सातवीत शिकवली जाते

शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (18:06 IST)
आसिफ अली
 'Be water my friend'.
 
म्हणजे 'तुम्ही पाण्यासारखे व्हा'. परिवर्तनशील तसंच प्रत्येक परिस्थिती आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी स्वतःला पुरेसे लवचिक बनवा.
 
या संवादाने आपल्या गोष्टीची सुरुवात करताना देव रतूडी म्हणतात, 'ब्रुस ली (प्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट) यांच्या या संवादामुळे माझ्या आयुष्याने एक वेगळं वळण घेतलं. दुसरा बदल ब्रूस लीच्या जीवनावर आधारित 'ड्रॅगन' चित्रपट पाहिल्यानंतर झाला.'
 
'मी ब्रूस लीकडे पाहून मार्शल आर्ट शिकलो, ती कला आज माझ्यासाठी उपयुक्त ठरत आहे. माझ्या चित्रपटांमध्ये भरपूर अॅक्शन असते, त्यामुळे मी या कलेचा पुरेपूर वापर करतो.'
 
ही गोष्ट आहे भारतातील उत्तराखंड राज्यातील केमरिया सौड गावातील 46 वर्षांच्या द्वारकाप्रसाद रतूडी यांची ज्याला संपूर्ण जग आता देव रतूडी या नावानं ओळखतं.
 
1998 साली मुंबईत पहिल्यांदा कॅमेऱ्याला सामोरं जाण्याची संधी मिळाली तेव्हा ते खूप घाबरले होते.
 
एक दिवस आपण फक्त चिनी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध होणार नाहीत तर इतके यशस्वी होतील की त्यांच्या कामगिरीचा उल्लेख चीनच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्येही केला जाईल, अशी त्यांना आजिबात वाटलं नव्हतं.
 
देव रतूडीच्या संघर्षाची कहाणी त्यांच्याच शब्दात वाचा.
 
 असं अनेकदा व्हायचं की मी शाळेतून घरी परतल्यावर घरात खायला काहीच नसायचं. आम्ही पाच भाऊ-बहीण होतो, माझ्या वडिलांच्या पगारावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं खूप कठीण होतं. त्यामुळे इच्छा असूनही मला दहावीच्या पुढे शिक्षण घेता आलं नाही.
 
माझी दहावी पूर्ण झाल्यानंतर गरीब परिस्थितीमुळे 1991 साली मी नोकरीसाठी दिल्लीला आलो. तिथं एका दुधाच्या डेअरीमध्ये 350 रुपये मासिक पगारावर काम करण्यास सुरुवात केली. दिल्लीत राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या माझ्या काकांच्या शिफारशीवरून मला ती नोकरी मिळाली होती.
 
काप सहीरा आणि आजूबाजूच्या गावातील दुधाच्या डेअऱ्यांमधील दूध मी सायकलवरून विकत असे. नोकरी मिळण्याबरोबरच मी सायकल चालवायलाही शिकलो याचा मला आनंद होता.
 
साधरणपणे वर्षभर डेअरीमध्ये काम केल्यानंतर मी तिथल्या एका बिल्डरसोबत काम करू लागलो.
 
इथे मी कधी त्यांची गाडी साफ करायचो तर कधी ड्रायव्हर म्हणून चालवायचो. आता माझा पगार 500 रुपये होता. 1993 ते 2004 अशी 11 वर्षे मी त्यांच्यासोबत काम केलं.
 
कधी कधी त्यांच्या कडक शिस्तीचा त्रास व्हायचा.
 
आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉइंटबद्दल बोलताना ते म्हणाले, '1998 ची गोष्ट आहे, एकदा मला त्यांचा खूप राग आला, मी हिरो होणार आहे असं सांगून नोकरी सोडली.'
 
ब्रुस लीचा 'एंटर द ड्रॅगन' हा मी पाहिलेला पहिला चित्रपट. ब्रूस लीचे चित्रपट पाहिल्यानंतर मला मार्शल आर्ट्समध्ये रस निर्माण झाला. हे सिनेमे डब केलेले असायचे आणि त्यामुळे त्यामध्ये बोलले जाणारे इंग्रजी स्पष्ट आणि सोपे होते, जी माझ्यासाठी इंग्रजी शिकण्याची एक चांगली संधी होती. खाली लिहिलेली सबटायटल्स वाचून मी इंग्रजी शिकायचो.
 
ब्रूस लीच्या जीवनावर आधारित ड्रॅगन या चित्रपटाने मी सर्वाधिक प्रभावित झालो. ब्रूस लीच्या हाँगकाँगमधून अमेरिकेत जाण्यापर्यंतच्या संघर्षाचे चित्रण यात करण्यात आले आहे. ते पाहून मला वाटले की हा माणूस करू शकतो तर मीही करू शकतो.
 
हा चित्रपट पाहिल्यानंतर मला भूताने झपाटल्यासारखे झाले आणि मी हिरो बनण्यासाठी मुंबईला गेलो. तिथे मी एक वर्ष मार्शल आर्ट्सचा अभ्यास केला.
 
1998 मध्ये, पुनीत इस्सार (ज्यांच्यासोबत कुली चित्रपटात मारामारी करताना अमिताभ बच्चन जखमी झाले होते.) हिंदुस्तानी नावाच्या टीव्ही मालिकेचे दिग्दर्शन करत होते आणि त्यांनी मला कॅमेरासमोर एक छोटा संवाद बोलण्यास सांगितले.
 
मी संवाद पाठ केला होता, पण चेहऱ्यावर प्रकाश पडताच आणि कॅमेरा सुरू झाल्यावर मी सर्व काही विसरलो आणि काहीच बोलू शकलो नाही. त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं.
 
काही दिवसांनी मी पुन्हा दिल्लीला आलो. चित्रपटात काम करण्याची माझी महत्त्वाकांक्षा अपयशी ठरली होती, पण मुंबईत राहून मी मार्शल आर्टवर प्रभुत्व मिळवलं होतं.
 
दिल्लीतील वेटरच्या नोकरीपासून चीनपर्यंतचा प्रवास
आपली गोष्ट पुढे सांगताना, ते म्हणाले; '2004 मध्ये दिल्लीला परतल्यानंतर, मला हरियाणवी चित्रपट 'छनू दी ग्रेट'मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये माझी सुमारे सहा मिनिटांची साहसी भूमिका होती.'
 
पण मी ब्रूस लीला माझ्या डोक्यातून बाहेर काढू शकलो नाही. मी ब्रूस लीच्या देशात कसा पोहोचू शकतो याच चिंतेत असे. मला तिथे जायचं होतं. मार्शल आर्ट शिकायचं होतं. त्यावेळी माझा एक गैरसमज होता की सर्व चीनी लोकांना मार्शल आर्ट येतं.
 
चीनला जाण्यात येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करताना देव म्हणतात, 'माझ्यासमोर सर्वात मोठी समस्या होती की चीनला जाण्यासाठी पैसे कुठून आणायचे. मी संभ्रमात होतो. दरम्यान, माझ्या एका मित्राने मला सांगितलं की, त्याच्या ओळखीचे चीनमध्ये एक रेस्टॉरंट आहे आणि मला तिथे नोकरी मिळू शकते.'
 
मालकाने मला काम येतं का म्हणून विचारल्यावर मी म्हणालो, काम येत नाही पण मी शिकेन, फक्त एक संधी द्या.
 
त्यांनी मला दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये तीन-चार महिने काम करण्याचा सल्ला दिला, त्यानंतर मी एका रेस्टॉरंटमध्ये काम करू लागलो जिथे मला दरमहा सुमारे पाच हजार रुपये पगारावर वेटरची नोकरी मिळाली.
 
तीन महिने दिल्लीत काम केल्यानंतर एका चायनीज रेस्टॉरंटच्या मालकाने माझ्आ व्हिसाला मदत केली आणि मी 2005 मध्ये चीनमध्ये दाखल झालो.
 
चीनला येण्यापूर्वी माझ्या काही मित्रांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला होता की, तू इथे चांगला स्थिरावलायस. पण तू तिथे गेल्यावर काय करशील? पण मी तिथे जाण्याचा आणि मार्शल आर्ट शिकण्याचा निर्धार केला होता.
 
जेव्हा मी हाँगकाँगला पोहोचलो तेव्हा उंच इमारती आणि रस्ते पाहून आश्चर्यचकित झालो होतो. तिथून मी हाय-स्पीड मेट्रोने शेन्झेनला गेलो, तिथे मी पंजाबी रेस्टॉरंटमध्ये काम करू लागलो. मी जवळपास दीड वर्ष तिथे काम केलं.
 
'मी सगळ्यांना त्यावेळी मार्शल आर्ट शिकवायला सांगायचो, तेव्हा ते आम्हाला योगासनं शिकवा म्हणायचे. मी त्यांना उत्तर देत असे की, मला योगा माहित नाही, मग ते मला सांगायचे की जसे तुम्हाला योगा येत नाही,
 
तसंच आम्हाला मार्शल आर्ट माहित नाही. चीनमधील प्रत्येकाला मार्शल आर्ट माहिती असतं, हा माझा गैरसमज खूप दिवसांनी दूर झाला.
 
जवळपास दोन वर्ष पंजाबी रेस्टॉरंटमध्ये काम केल्यानंतर मला बीजिंगमधील जर्मन रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर 2010 मध्ये मी बीजिंगमधील एका अमेरिकन रेस्टॉरंटमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करायला सुरुवात केली. मी चांगले पैसे कमवू लागलो होतो म्हणून रेस्टॉरंटला माझा व्यवसाय बनवण्याचा निर्णय घेतला.
 
चीनमधील लोकांना भारतीय खाद्यपदार्थांची ओळख नव्हती, म्हणून मी येथे सांस्कृतिक संकल्पनेवर आधारीत रेस्टॉरंट चालवण्याचा निर्णय घेतला आणि 2013 मध्ये मी शिआन शहरात 'लाल किल्ला' नावाचे माझे पहिले रेस्टॉरंट उघडले.
 
'द रेड फोर्ट' (लाल किल्ला) रेस्टॉरंटचे सर्वांकडून कौतुक झाले आणि हा प्रवास सुरू झाला. दोन वर्षांच्या काळात, मी सहा रेस्टॉरंट्स उघडली.
 
चित्रपट प्रवासाची सुरुवात
2015 साली थान नावाचे एक चित्रपट दिग्दर्शक माझ्या रेस्टॉरंटमध्ये आले होते. त्यांना इथं एक चित्रिकरण करायचे आहे त्यात तुझीही छोटी भूमिका आहे, असं त्यांनी सांगितलं.
 
यात मला चित्रपटाच्या नायकाला मुख्य प्रवेशद्वारापासून ओढत आणून टेबलवर बसवून भारतीय खाद्यपदार्थांबद्दल सांगायचे आहे, मग मला 1998 मधील तो दिवस आठवतो, जेव्हा कॅमेरा पाहताच माझे पाय थरथरू लागले होते. आज मला पुन्हा ती संधी मिळाली होती. मला वाटलं, 'देव आज नाही तर पुन्हा कधीच नाही.' 
 
जेव्हा तो प्रसंग चित्रित केला गेला, तेव्हा मी माझी भूमिका खूप उत्तमरित्या साकारली होती. तो 'स्वात' नावाचा ऑनलाइन चित्रपट होता.
 
हा चित्रपट पाहिल्यानंतर दुसर्‍या एका दिग्दर्शकाने मला त्यांच्या चित्रपटात मुख्य गँगस्टरची भूमिका दिली, दुसरा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर मला चित्रपट मिळू लागले.
 
आतापर्यंत त्यांनी 35 हून अधिक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केल्याचं सांगितलं. चीनमध्ये त्यांची एकूण 11 रेस्टॉरंट्स आहेत, त्यापैकी आठ भारतीय आणि एक चायनीज आहे.
 
चीनी पाठ्यपुस्तकात 'देव'वर धडा
ते सांगतात की, एकदा एका शाळेतील काही मुलं त्यांना भेटायला आली, त्यात त्यांच्या चिनी मित्राच्या मुलीचाही समावेश होता.
 
या मुलांनी सांगितलं की, देव रतूडीची गोष्ट त्यांच्या इयत्ता सातवीच्या इंग्रजीच्या पुस्तकात शिकवली जाते.
 
तेव्हा मित्राच्या मुलीने त्यांना सांगितले, 'काका, मी तुम्हाला ओळखतो यावर या मुलांचा विश्वास बसत नाही, म्हणून मी त्यांना इथे आणलं.'
 
"2018 मध्ये माझा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला," असं ते म्हणाले. चीनपर्यंतचा माझा प्रवास आणि यशस्वी कारकिर्दीची ती गोष्ट आहे. ही माझ्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट आहे. मी जरी महाविद्यालयाचं तोंड पाहिलेलं नसलं तरी आज चीनमधील प्रमुख विद्यापीठं मला मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बोलावतात. चीनमध्ये मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत."
 
पासपोर्ट मिळवून परदेशात जाणारा मी उत्तराखंडमधील माझ्या केमरिया सौड या गावातील पहिला माणूस आहे. मी उत्तराखंडमधील सुमारे 150 लोकांना चीनमध्ये आमंत्रित केलंय. त्यापैकी जवळपास 50 लोक माझ्या स्वतःच्या रेस्टॉरंटमध्ये काम करत आहेत. आज माझ्या गावातील लोक चीनमध्ये आहेत.
 
अनेक अडचणींमुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही याची मला नेहमी खंत वाटते. म्हणूनच मी रतूडी फाउंडेशनची स्थापना केली आहे जी उत्तराखंडच्या मुलांना, विशेषतः माझ्या भागातील मुलांना मदत करते.
 
देव रतूडीचे जुने मित्र काय म्हणतात?
देव यांचे जवळपास 23 वर्षांपासूनचे मित्र असलेले महावीर रावत म्हणाले: '2000 साली एका बांधकाम कंपनीत काम करत असताना आमची मैत्री झाली. त्यावेळी मला त्यांची आवड लक्षात आली. तेव्हा मला असे वाटले की ही सर्वसामान्य व्यक्ती असू शकत नाही.'
 
'देव यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना केला आणि आजही त्यांना कुठे ना कुठे अडचणींचा सामना करावा लागत आहे. असं नाही की जर ते आज यशस्वी व्यक्ती असतील तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. पण देव यांच्या हिंमतीला खरंच दाद द्यायला हवी की ते सर्व आव्हानांना धैर्याने सामोरे जातात. ते खरोखरच जगावेगळे आहेत.'
 
ते म्हणतात, 'आम्ही दोघांनी दोन वर्षे चीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र काम केले. एकेकाळी मी देवला मार्गदर्शन करायचो, पण आज देव मला मार्गदर्शन करतो. आज देवला पाहून खूप आनंद होतो.'
 
देवचा बालपणीचा मित्र रमेश पनोली पंजाबमध्ये राहतो.
 
रमेश सांगतो की, तो देवचा बालपणीचा मित्र आहे. देव दिल्लीला गेल्यानंतर तेही दिल्लीत आले आणि त्यांनी जवळपास सात महिने एकत्र घालवले.
 
देव यांनी त्यांना चीनमध्ये येण्याचे निमंत्रणही दिले होते, मात्र कौटुंबिक कारणांमुळे ते तेथे जाऊ शकले नाहीत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती