गोंविदाचे सुपर फॅन असलेल्या डांसिंग अंकल डब्बूंचं आयुष्य असं बदलून गेलं आहे

मंगळवार, 18 जुलै 2023 (19:57 IST)
सुप्रिया सोगळे
 मे 2018 मध्ये एक व्हीडिओ व्हायरल झाल्याचं आठवत असेल. यामध्ये मरून शर्ट आणि सिल्व्हर-ग्रे नेहरू जॅकेट घातलेले एक व्यक्ती खुदगर्झ या चित्रपटातील गोविंदाच्या एका प्रसिद्ध गाण्यावर स्टेजवर डान्स करताना दिसत होते.
 
त्यांचा हा डान्स हुबेहुब अभिनेता गोविंदाच्या डान्स सारखाच होता. रातोरात हा व्हीडिओ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आणि प्रोफेसर संजीव श्रीवास्तव हे मध्य प्रदेशचे डान्सिंग अंकल डब्बू बनले.
 
52 वर्षांच्या संजीव श्रीवास्तव यांचा जन्म मध्य प्रदेशमधला आहे. ते तिथेच वाढले. भोपाळच्या भाभा इंजिनिअरिंग रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे प्राध्यापक आहेत.
 
मे 2018 मध्ये एका लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी ते आपल्या कुटुंबासह ग्वाल्हेरला गेले होते.
 
तिथे त्यांनी गोविंदा आणि नीलमवर चित्रित झालेल्या "आप के आ जाने से" या गाण्यावर डान्स केला. लोकांना त्यांचा हा डान्स प्रचंड आवडला. हा डान्स मोबाईलमध्ये रेकार्ड करून सोशल मीडियावर टाकला गेला.
 
संजीव श्रीवास्तव यांचा हा व्हीडिओ रातोरात इतका व्हायरल झाला की, त्यांचा फोन वाजायचा थांबत नव्हता. अमेरिकेत बसलेल्या त्याच्या मित्राने फोन करून व्हायरल व्हीडिओबद्दल त्यांच्याशी चर्चा केली.
 
तेव्हा सोशल मीडिया या गोष्टीशी अनभिज्ञ असलेले संजीव श्रीवास्तव सुरुवातीला घाबरले. पण नंतर यात काही गैर नसल्याचं त्यांच्या मेहुण्याने त्यांना समजावून सांगितलं.
 
त्यांचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर, कॉलेजमधून शिकवून ते घरी पोहोचले तेव्हा लोकांनी ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केलं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घराबाहेर प्रसारमाध्यमांची गर्दी झाली होती.
 
बालपण आणि नृत्य
लहानपणापासून नृत्याची आवड असलेल्या संजीव श्रीवास्तव यांच्या आई पैसे न घेता शेजारच्या मुलींना शास्त्रीय नृत्य शिकवत असत.
 
याच वातावरणात संजीव श्रीवास्तव यांच्यातही नृत्याची आवड निर्माण झाली. वयाच्या 10-11 व्या वर्षी त्यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘तकदीर का बादशाह’ या चित्रपटातील गाण्यावर पहिल्यांदा स्टेजवर डान्स केला, तेव्हा त्यांना पहिला पुरस्कार मिळाला.
 
यांनंतर त्यांच्या शेजारच्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घरी आणलं. ते मिथुन आणि गोविंदाच्या गाण्यांवर नाचायला लागले. पण लोकांना त्यांचा गोविंदाच्या गाण्यावरचा डान्स जास्त आवडू लागला.
 
लहान वयातच त्यांनी अनेक स्पर्धाही जिंकल्या.
 
त्या काळी चित्रपटांमधलं नृत्य शिकण्यासाठी संजीव एक शक्कल लढवायचे. जवळच्या सिनेमागृहातील गेटकीपरशी बोलून एक-दोन रुपये किंवा ६० पैशांचे तिकीट काढायचे आणि फक्त गाण्याच्या वेळी आत जायचे. गाणे पाहिल्यानंतर बाहेर यायचे.
 
अशी गाणी पाहून ते डान्स शिकले. नागपुरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाही त्यांनी आपलं नृत्य सुरूच ठेवलं. घरातल्या लग्नांमध्ये त्यांचा डान्स असणं ही परंपराच बनली होती.
 
जीवनात झालेले बदल
आपल्या कौटुंबिक आणि महाविद्यालयीन विश्वात व्यग्र असलेल्या संजीव श्रीवास्तव यांच्या व्हायरल झालेल्या व्हीडिओने त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं.
 
व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतरच्या वर्षांमध्ये त्यांनी 15-16 जाहिराती केल्या आहेत. गायक बैनी दयाळ यांच्या म्युझिक व्हीडिओमध्ये काम केलं आहे.
 
कंगना राणावतच्या 'पंगा' आणि जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस' या चित्रपटातही ते झळकले. आता ते खूप बिझी झाले आहेत.
 
वगवेगळ्या शहरात होणाऱ्या इव्हेंट्समध्ये ते आपलं टॅलेंट दाखवत राहतात आणि शोस्टॉपर बनतात. दर आठ-दहा दिवसांनी मुंबईला जातात. दररोज त्यांना टीव्ही आणि चित्रपटांच्या ऑफर्स येत असतात.
 
संजीव सोशल मीडियाचे आभार मानतात ज्यामुळे त्यांना ही प्रसिद्धी मिळाली.
 
सिनेकलाकारांसोबत गाठीभेटी
डान्सिंग अंकल डब्बू यांच्या टॅलेंटचा डंका हिंदी सिनेसृष्टीपर्यंतही पोहोचला. गोविंदाच्या गाण्यांवर डान्स करणारे संजीव श्रीवास्तव आतापर्यंत चार ते पाच वेळा गोविंदाला भेटले आहेत.
 
त्यांच्यासोबत संजीव डान्स दिवाने शोमध्ये आणि एका जाहिरीतमध्येही दिसले. सिनेसृष्टीतील कलाकारांना भेटणे हे संजीव यांच्यासाठी स्वप्नवतच होतं.
 
हिंदी सिनेसृष्टीमधून त्यांना सगळ्यांत आधी सुनील शेट्टी यांचा फोन आला होता. त्यांनी संजीवला मुंबईत बोलावलं आणि भेटही घेतली. पण काही कारणास्तव ते एकत्र काम करू शकले नाहीत.
 
मिळालेल्या या प्रसिद्धीनंतरही ते मध्य प्रदेशातील सर्वकाही सोडून पूर्णपणे मुंबईत स्थायिक होऊ शकले नाहीत. कारण त्यांना आपल्या आई-वडिलांना सोडायचं नव्हतं. त्यामुळे ते कामाच्या निमित्ताने मुंबईत येत राहतात. डान्ससोबतच ते आता आपल्या अभिनयाकडेही लक्ष देत आहे.
 
सामान्य लोकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत चाहते
संजीव यांचे सामान्य माणसापासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत चाहते आहेत. संजीव श्रीवास्तव यांचं आयुष्य आता सामान्य राहिलेलं नाही. ते दररोज आपल्या चाहत्यांना भेटत असतात. सगळीकडे लोक आता त्यांच्यासोबत सेल्फी काढतात.
 
एकदा ते उत्तर प्रदेशमध्ये गेले. तिथे एका मुलाने सांगितलं की त्यांची आई आजारी आहे आणि रुग्णालयात दाखल आहे. ती रोज 60 ते 70 वेळा संजीव श्रीवास्तवचा डान्स व्हीडिओ बघते असं तो म्हणाला. संजीव त्या मुलाच्या आईशी व्हीडिओ कॉलवर बोलले.
 
नेपाळहून आणखी एक व्यक्ती भोपाळला आली होती. त्याच्या बॉसने अट घातली की जर त्याने डान्सिंग अंकल डब्बूला फोनवर बोलायला लावले तर त्याची तीन दिवसांची सुट्टी सात दिवसांची केली जाईल.
 
कुटुंब, पत्नी आणि मुलं
दोन मुलांचे वडील असलेले संजीव श्रीवास्तव आपल्या आयुष्यातील या बदलाचे श्रेय पत्नीला देतात.
 
त्यांचं असं म्हणणं आहे की, ते नेहमीच डान्स करत असतात. पण त्याचा व्हीडिओ त्यांच्या पत्नीसोबत स्टेजवर डान्स केल्यानंतरच व्हायरल झाला आहे.
 
संजीवची मुलं जिथे जातात तिथे लोक त्यांच्याकडे विशेष लक्ष देतात आणि त्यांच्या वडिलांबद्दल विचारतात. संजीव सध्या त्याच्या प्रसिद्धीसह आपल्या कुटुंबासह आपल्या सामान्य जीवनाचा आनंद घेत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती