गेल्या चार महिन्यांपासून कपिल शर्मा शो मध्ये सेल्फी मौसी या भूमिकेत दिसणारा प्रसिद्ध कॉमेडियन सिद्धार्थ सागर बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. नसीरुद्दीन शहाची मिमिक्री ते महिला बनवून केलेली कॉमेडी या शो मध्ये पाहायला मिळाली. पण आता हा टॅलेंटेड कॉमेडियन गायब झाला आहे. ही बातमी सोशल मीडियावरुन सर्वप्रथम समोर आली. सोमी सक्सेना नावाच्या एका महिलेने सिद्धार्थ गायब असल्याची माहिती आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन दिली. ती सिद्धार्थची जवळची मैत्रिण असल्याचा दावा तिने केला आहे.
सोमी सक्सेनाने आपल्या फेसबुक पोस्टवर लिहिले की, तुम्हाला सिद्धार्थ सागर म्हणजेच सेल्फी मौसी लक्षात आहे. तो 4 महिन्यांपासून बेपत्ता आहे आणि 18 नोव्हेंबर 2017 मध्ये त्याला शेवटचे पाहिले गेले होते. कोणाला माहित आहे का की तो कुठे आहे? तो माझा खूप चांगला मित्र आहे. कृपया त्याला शोधायला माझी मदत करा. मात्र सोमीने आता ही पोस्ट डिलीट केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थच्या कोणत्याही मित्राला त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. सिद्धार्थने कॉमेडी सर्कस, छोटे मिया बडे मिया, लाफ्टर के फटके आणि कॉमेडी सर्कस के अजूबे यांसारख्या कॉमेडी शो मध्ये काम केले होते.