बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे . मुंबई पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे. गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आलेली बंदूक पोलिसांनी सुरतमधील तापी नदीतून जप्त केली आहे. बंदुकीशिवाय पोलिसांनी नदीतून काही जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. तापी नदीतून जप्त केलेली बंदूक आणि जिवंत काडतूस सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात वापरण्यात आल्याचे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे.
शोधमोहिमेतून गुन्हे शाखेला आणखी एक बंदूक सापडली आहे. मुंबई क्राईम ब्रँचला सुरतच्या नदीत लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शूटर्सच्या दोन्ही बंदुका सापडल्या आहेत. पोलीस नदीत आरोपींचे फोन शोधत होते. आरोपीच्या बँकेत अनेक वेळा फोनद्वारे पैसे ट्रान्सफर झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा लवकरच मोक्का लावणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांनी गोळीबाराचा आरोपी विकी गुप्ता याला बंदुकीचा शोध घेण्यासाठी गुजरातमधील तापी नदीजवळ नेले होते. यानंतर पोलिसांनी नदीतून बंदूक जप्त केली. आता पुरावे सापडले असून, पोलीस या प्रकरणात आरोपींविरुद्ध अन्य कलमे जोडू शकतात.
क्राइम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्याजवळ दोन बंदुका होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोन आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की, सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्यानंतर ते मुंबईहून रस्त्याने सुरतला पोहोचले होते. तेथून दोघे रेल्वेने भुजला पोहोचले. प्रवासादरम्यानच दोघांनी ही बंदूक रेल्वे पुलावरून तापी नदीत फेकली होती.