PS : 'पोन्नियिन सेल्वन' कोणाचा इतिहास सांगतो? ही गोष्ट खरी आहे?

रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (15:13 IST)
मणिरत्नम दिग्दर्शित तामिळ चित्रपट 'पोन्नियिन सेल्वन' या वर्षातला बिग बजेट सिनेमा आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी तामिळ, हिंदी, कन्नड, तेलुगु आणि मल्याळम या पाच भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
या चित्रपटात विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा, ऐश्वर्या राय-बच्चन, प्रकाश राज, पार्थिवन, ईश्वरा लक्ष्मी, प्रभू, सरथ कुमार, विक्रम प्रभू, जयराम, रघुमन आणि निझलगल रवी अशी तगडी स्टारकास्ट आहे.
 
ए.आर. रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलंय. ज्येष्ठ तमिळ लेखक जयमोहन यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. रवी वर्मन यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे.
 
हा चित्रपट एक तामिळ कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही लोकप्रिय कादंबरी काय आहे? ती किती खरी-किती काल्पनिक आहे? त्यानिमित्ताने या चित्रपटातली चोल साम्राज्याची गोष्ट काय आहे हेही जाणून घेऊ.
'पोन्नियिन सेल्वन' हा चित्रपट पोन्नियिन सेल्वन नावाच्याच कादंबरीवर आधारित आहे. ही कादंबरी लिहिली आहे कल्की कृष्णमूर्ती (1899-1954) यांनी. त्यांनी आपल्या मासिकासाठी 1950 मध्ये ही कादंबरी लिहायला घेतली होती. पुढे जवळपास तीन वर्ष या कादंबरीचं लिखाण सुरूच होतं.
 
कल्की यांनी इतिहासात घडून गेलेली पात्र आणि काल्पनिक जग अशा दोहोंचा मिलाफ करून ही अनोखी कादंबरी लिहिली. ही कादंबरी दक्षिणेकडील राजा 'परांथक चोल- दुसरा' याच्यावर आधारित आहे. त्याला सुंदरा चोल असंही म्हणतात. चोल साम्राज्यातील प्रसिद्ध राजा 'राज राजा प्रथम' याचे ते वडील.
 
ही कादंबरी लिहिण्यासाठी कल्की यांनी कानिलकंद शास्त्री लिखित 'द चोल', टी.व्ही. सदाशिव पंडरथर लिखित 'हिस्ट्री ऑफ द लॅटर चोला' आणि आर. गोपालन लिखित 'पल्लवाज ऑफ कांची' या ऐतिहासिक पुस्तकांचे संदर्भ वापरले.
 
ही कादंबरी लिहिण्यासाठी कल्की यांनी तत्कालीन चोल साम्राज्यातील अनेक ठिकाणी प्रवास केला. यात त्यांनी तंजावर, नागापट्टिनम, तिरुवरूर आणि अरियालूर, तर श्रीलंकेतील अनेक ठिकाणी भेटी दिल्या. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या सोबतीला चित्रकार मनियमही होते. मनियम यांनी या मालिकेसाठी कल्की मासिकात चित्र काढली.
 
2400 पानांच्या या कादंबरीचे एकूण 5 भाग आहेत.
 
कादंबरीची कथा नेमकी काय आहे?
कादंबरीत लिहिलेल्या घटना या परांथक चोल- दुसरा उर्फ सुंदरा चोलच्या कारकिर्दीत घडतात. परांथकला कुंतवई, अदिथा करिकालन आणि अरुणमौळी वर्मन ही तीन मुले असतात. परांथक नंतर चोल साम्राज्याचा सम्राट म्हणून अदिथा करिकालनचा राज्याभिषेक होतो.
 
आपल्या राज्याभिषेकानंतर अदिथा करिकालन कांचीपुरममध्ये सोन्याचा राजवाडा बांधतो. आपल्या वडिलांनी त्यांचे पुढचे दिवस कांचीपुरममधील या राजवाड्यात घालवावे असं त्याला वाटतं आणि तसं तो बोलावणंही धाडतो.
 
वाटेवर कदंबूरमध्ये अदिथा करिकालनचा सेनापती वंथियादेवन राहत असतो. त्यांचा खजिनदार पझुवेत्तराय्यार हा अदिथा करिकालन विरुद्ध कट रचणार असल्याची माहिती सेनापती वंथियादेवनला मिळते.
वंथियादेवन यांनी सुंदरा चोल यांची कन्या आणि अदिथा करिकालन याच्या कुंतवई या मोठ्या बहिणीसोबत लग्न केलेलं असतं. कुंतवई आणि वंथियादेवन सुंदरा चोल यांना या कटाचा निरोप पाठवतात.
 
तिकडे युद्धात लढत असलेल्या आपल्या धाकट्या भावाची काळजी कुंतवईला लागून राहिलेली असते. ती वंथियादेवन यांना आपल्या भावाला परत घेऊन येण्याची विनंती करते..
 
वंथियादेवन यांचे श्रीलंकेच्या दिशेने प्रयाण
दरम्यानच्या काळात पझुवेत्तराय्यार, अरुणमौळी वर्मनला अटक करण्यासाठी दोन जहाज श्रीलंकेच्या दिशेने पाठवतो. दुसरीकडे वंथियादेवन आणि अरुणमौळी वर्मन ज्या जहाजांमधून प्रवास करत असतात ती जहाजं वादळात अडकतात.
 
पोंगुझाली नावाची एक मच्छिमार महिला त्या दोघांची त्या वादळातून सुटका करते.
 
या सगळ्या घडामोडींमुळे अरुणमौळी वर्मन आजारी पडतो. त्याला नागपट्टिनम येथील बुद्ध मंदिरात उपचारासाठी नेण्यात येतं.
 
या सगळ्यात बंडखोर असलेला पझुवेत्तराय्यार, अदिथा करिकालनचे काका मदुरंथागन यांना सिंहासनावर बसवण्यासाठी उतावीळ झालेला असतो. त्याच्या या कटात त्याची पत्नी नंदिनी सुद्धा सहभागी असते.
 
या बंडखोरांचा अदिथा करिकालनला ठार मारण्याचा विचार डोक्यात असतो. त्यासाठी ते त्याच्या बहिणीच्या कदंबूरमधल्या राजवाड्याची निवड करतात. जेणेकरून करिकालनच्या हत्येचा दोष वंथियादेवनवर येईल. आता पुढं काय घडतं ? अरुणमौळी वाचतो का? राज्य कोणाला मिळतं? बंडखोर असलेल्या पझुवेत्तराय्यारचं पुढं काय होतं? वंथियादेवन आणि कुंतवई यांचं प्रेम संपुष्टात येतं का? या सर्वांची उत्तर तुम्हाला कादंबरीच्या पाच भागातून मिळतात. चित्रपटाचा पहिला भागही अरुणमौळीच्या अपघातापर्यंत आहे. दुसऱ्या भागातच प्रेक्षकांना बाकी रहस्यांचा उलगडा होईल.
 
सर्वाधिक खपाची कादंबरी
जेव्हापासून ही कादंबरी प्रकाशित झाली आहे अगदी त्यादिवसापासून तामिळनाडूमधील सर्वाधिक खपाची आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ही एक कादंबरी आहे. आजवर या कादंबरीच्या लाखो प्रति विकल्या गेल्यात. राष्ट्रीय स्तरावरही इतर अनेक भाषांमध्ये ही कादंबरी उपलब्ध आहे.
 
ही कादंबरी कल्की यांनी त्यांच्या मासिकात मालिकेच्या रुपात प्रसिद्ध केली. विशेष म्हणजे जेव्हाजेव्हा ही मालिका त्या मासिकात प्रकाशित केली गेली तेव्हातेव्हा मासिकाचा खप वाढला.
 
चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर लोकांमध्ये पुन्हा त्या कादंबरीबद्दल उत्सुकता निर्माण झालीय. अनेक प्रकाशकांनी त्याची छपाई पुन्हा सुरू केली आहे. ही कादंबरी इंग्रजी भाषेतही अनुवादित झालीय.
या कादंबरीची एक छोटी आवृत्तीही प्रकाशित करण्यात आली होती. आतापर्यंत तिच्या हजारो प्रति हातोहात खपल्या आहेत.
 
मणिरत्नम यांचा 'पोन्नियिन सेल्वन' हा चित्रपट येण्याआधीही बऱ्याच जणांनी या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. यात तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते एम.जी. रामचंद्रन यांचा देखील समावेश आहे.
 
त्यांनी 1958 मध्ये या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती.
 
या चित्रपटात वैजयंतीमाला, सावित्री, जेमिनी गणेशन, सरोजा देवी आणि बलैय्या यांच्या प्रमुख भूमिका असणार होत्या. मात्र हा चित्रपट बनवण्याची कल्पना काही कारणांमुळे बारगळली.
 
पुढे दाक्षिणात्य अभिनेते आणि सुपरस्टार कमल हसन यांनी सुद्धा हा चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. पण तेही शक्य झालं नाही.
 
1990 मध्ये मणिरत्नम यांनी हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं होतं. शेवटी हा चित्रपट प्रत्यक्षात यायला 2022 साल उजाडावं लागलं.
2019 मध्ये मणिरत्नम यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाच्या या दोन्ही भागांसाठी सुमारे 500 कोटींच्या घरात खर्च आला असण्याची शक्यता आहे.
 
हा भव्यदिव्य असा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी देशभरातील सुमारे 250 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. बऱ्याच चित्रपटगृहांमध्ये तर पहाटे 4. 30 चा शो सुद्धा हाऊसफुल्ल होता.
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती