माधुरी दीक्षित : ‘... आणि मी तातडीने लग्नाचा निर्णय घेतला

सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (23:22 IST)
मधु पाल
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. 'द फेम गेम' या वेब सीरीजमध्ये माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकेत आहे. माधुरीची या सीरिजमधली भूमिका तिच्या रिअल लाइफपेक्षा फार वेगळी नाहीये. म्हणजे या सीरिजमध्ये माधुरी एका यशस्वी अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे... तिचं नाव आहे अनामिका आनंद.
 
याच सीरिजच्या निमित्तानं बीबीसीच्या प्रतिनिधी मधु पाल यांनी माधुरी दीक्षितशी संवाद साधला होता. त्याचाच संपादित अंश...
 
ही वेबसीरिज एक सस्पेन्स थ्रिलर आहे. याची कथा अनामिका आनंद हिच्या अचानक गायब होण्याभोवती फिरते. या सीरिजमध्ये स्टार्सचं पडद्यावरचं आणि खाजगी आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
 
अनामिका आणि माझं आयुष्य एकदम वेगळं
स्टार्सचं खरंखुरं आयुष्य असंच असतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना माधुरीनं म्हटलं की, कधीकधी रिअल लाइफमध्येही लोकांचे नातेसंबंध हे कमकुवत असू शकतात. फिल्म स्टार्सचं आयुष्यही सामान्य असतं.
 
अनामिका आनंद ही व्यक्तिरेखा काल्पनिक आहे. लेखकानं सगळं काही अशापद्धतीनं लिहिलं आहे, जेणेकरून तिचं आयुष्य रंजक वाटू शकेल. तिच्या आयुष्यात खूप रहस्य आहे. ती जेव्हा गायब होते, तेव्हा तिच्या आयुष्यातलं रहस्य दूर व्हायला लागतं.
 
हा काल्पनिक शो असल्याने त्यातल्या गोष्टी थोड्या अतिरंजित आहेत, पण सहसा असं होत नाही. सगळे कलाकार असे नसतात.
 
माधुरीनं आपल्या करिअरमध्ये अनेक यशस्वी चित्रपट केले. ती सुपरस्टार आहे आणि शोमध्येही तिची व्यक्तिरेखा एका सुपरस्टारची आहे. त्यामुळे दोघींच्या आयुष्यात किती साम्य आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना माधुरीनं म्हटलं, की मी अभिनेत्री आहे आणि अनामिका आनंदही अभिनेत्री आहे. पण कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास माझी खऱ्या आयुष्यातली नाती खूप वेगळी आहेत. अनामिका आनंदच्या व्यक्तिरेखेचे तिच्या नवऱ्यासोबत किंवा आईसोबत जसे संबंध आहेत, ते अतिशय वेगळे आहेत.
 
मी स्टारडमची नाही, कुटुंबाची निवड केली
माधुरीच्या सीरिजचं नावच 'द फेम गेम' आहे. बॉलिवूडमध्येही कलाकार प्रसिद्धीसाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात. चित्रपटसृष्टीत इतका काळ कार्यरत राहिल्यानंतर माधुरीला प्रसिद्धीबद्दल काय वाटतं, असं विचारलं.
 
त्यावर बोलताना माधुरीनं म्हटलं की, आपल्याला किती प्रसिद्धी मिळाली किंवा मिळतीये याचा विचार मी नाही करत. घरी असताना मी केवळ माझ्या मुलांची आई असते.
 
प्रसिद्धीचं वलय चांगलं असतं, पण कधीकधी त्यामुळे नुकसानही होऊ शकतं. जेव्हा तुम्हाला प्रसिद्धीची चटक लागते, तुम्ही सतत त्याच गोष्टीचा विचार करायला लागता तेव्हा काहीतरी गडबड आहे हे समजावं.
 
पण माझ्या आयुष्यातल्या गोष्टींचे प्राधान्यक्रम मी ठरवले होते. मी लग्न करायचा निर्णय घेतला, मुलांबद्दलचा निर्णय घेतला. कारण मला माझं कुटुंब हवं होतं आणि मला त्यातून खूप आनंदही मिळाला.
 
प्रत्येकाची स्वतःची स्वप्नं असतात आणि जेव्हा ती पूर्ण होतात, तेव्हा खूप आनंदही होतो. मला मुलं आवडतात. माझी मुलं माझ्या स्वप्नांचा खूप मोठा भाग आहेत आणि मी माझं ते स्वप्न जगतोय.
 
मी खूप उंची गाठलीये, असा विचारच मी कधी केला नाही. मला माझ्या आवडीची व्यक्ती भेटल्यावर मी तातडीने लग्नाचा निर्णय घेतला. त्यावेळी मी माझ्या स्टारडमचा विचार केला नाही. मी माझं आयुष्य माझ्या स्वतःच्या मर्जीनं जगले आहे.
 
'तेजाब' प्रदर्शित झाला आणि सगळंच बदललं...
आपल्या करिअरमधल्या संघर्षाबद्दल बोलताना माधुरीनं म्हटलं की, मला काम मिळवण्यासाठी खूप झगडावं लागलं नाही. जेव्हा आपण अभिनेत्री होऊ असा विचारही मी केला नव्हता तेव्हा मला 'अबोध' मिळाला. त्यानंतर मला जाणवलं की आपल्याला अभिनय करायचा आहे.
 
मी छोट्यामोठ्या भूमिका करत होते, पण म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. मात्र 'तेजाब' प्रदर्शित झाला आणि सगळं चित्रच बदललं.
 
पण मी माझ्या आयुष्यात एक धडा नक्कीच घेतला होता की, तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कठोर मेहनत करायला हवी. जेव्हा तुम्हाला प्रसिद्धी मिळते, तेव्हा तर तुम्हाला अजून जास्तच मेहनत करायला लागते. कारण लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढलेल्या असतात.
 
'द फेम गेम' चित्रपटातल्या माझ्या अनामिका या व्यक्तिरेखेबद्दलही असंच आहे. तिच्याकडून लोकांच्या अपेक्षा खूप आहेत आणि ती त्या सगळ्या पूर्ण करू शकते का? तिच्या कुटुंबाचाही तिच्यावर दबाव आहे. सुदैवाने माझ्या कुटुंबाच्या माझ्याकडून काही फार अपेक्षा नाहीयेत. मी बदलावं असा त्यांचा आग्रह कधीच नव्हता. त्यामुळेच अनामिकाची व्यक्तिरेखा साकारताना मी सतत किती भाग्यशाली आहे, हेच मला जाणवत होतं.
 
सध्याचा काळ अभिनेत्रींसाठी चांगला
80 च्या दशकापासून अभिनय क्षेत्रात असलेल्या माधुरीनं या सगळ्या वर्षांमध्ये चित्रपटसृष्टीत झालेले बदलही खूप जवळून अनुभवले आहेत.
 
चित्रपटांमधील अभिनेत्रींच्या व्यक्तिरेखा आणि त्यांना पडद्यावर ज्यापद्धतीनं सादर केलं जातं त्याबद्दल माधुरीनं म्हटलं, "माझ्यामते आता गोष्टी हळूहळू बदलत आहेत. कोणताही बदल रातोरात होत नाही. गेल्या आठ वर्षांत प्रेक्षक खूप प्रगल्भ झाले आहेत आणि हे वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे होत आहे. त्यांना जगभरातील चित्रपट पाहायला मिळत आहेत. ते स्पॅनिश चित्रपट पाहात आहेत, कोरियन ड्रामा पाहात आहेत.
 
समाजात महिलांचा सहभाग ज्यापद्धतीनं बदलत आहे, त्यांच्या भूमिका ज्यापद्धतीनं बदलत आहेत, हेही प्रेक्षक पाहात आहेत.
 
हिंदी सिनेमांमध्येही खूप बदल होत आहेत. मी जेव्हा सिनेमात काम करत होते, तेव्हा अभिनेत्रींच्या व्यक्तिरेखा एकतर पीडित म्हणून दाखवल्या जायच्या किंवा अव्हेंजर्ससारखं त्यांचं चित्रण व्हायचं.
 
महिलाप्रधान चित्रपटातही नायिका स्वतःवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेताना दिसायच्या. पण आता महिलांच्या व्यक्तिरेखा वास्तव आयुष्याशी साधर्म्य दाखवणाऱ्या असतात. कधी त्या गणितज्ज्ञ असतात, कधी खेळाडू, तर कधी शास्त्रज्ञ. आता महिला आई किंवा बदला घेण्याच्या भूमिकेत दिसत नाहीत. माझ्या मते अभिनेत्रींसाठी हा काळ खूप चांगला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती