लाल सिंह चढ्ढा : 'हे' हिंदी चित्रपट आहेत गाजलेल्या हॉलिवूड सिनेमांची कॉपी

मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (18:19 IST)
आमिर खान त्याच्या बहुप्रतिक्षित 'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चार वर्षांच्या ब्रेकनंतर आमिर खान पुन्हा एकदा स्क्रीनवर येत आहे. लाल सिंह चढ्ढा हा 'फॉरेस्ट गम्प' या हॉलिवूड चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.
 
या चित्रपटाचा ट्रेलर जेव्हापासून रिलीज झाला आहे, तेव्हापासून चर्चेत आहे. मुळात 'फॉरेस्ट गम्प' सारख्या चित्रपटाचा रिमेक करण्याची गरज काय होती? 'फॉरेस्ट गम्प'च्या रिमेकचं आव्हान आमिर खान पेलू शकतो का? भारतीय सामाजिक-सांस्कृतिक चौकटीत फॉरेस्ट गम्प कसा बसणार? असे अनेक प्रश्नही अनेकांनी उपस्थित केले.
 
टॉम हँक्सची प्रमुख भूमिका असलेला 'फॉरेस्ट गम्प' हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं सहा ऑस्कर पुरस्कार पटकावले होते. पण या सिनेमाचं महत्त्व केवळ पुरस्कारांपुरतं मर्यादित नाहीये.
 
सार्वकालिक श्रेष्ठ सिनेमांपैकी एक म्हणून हा सिनेमा ओळखला जातो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वेगळ्या असलेल्या एका व्यक्तीचा प्रवास हा सिनेमा मांडतोच...पण त्याबरोबर फॉरेस्ट गम्प राजकीय-सामाजिक भाष्यही करतो. त्यामुळे स्वतः आमिर खानही या क्लासिक सिनेमाच्या रिमेकबद्दल सुरूवातीला साशंक होता.
 
कॉफी विथ करण या कार्यक्रमात आमिर खाननं सांगितलं, "14 वर्षांपूर्वी जेव्हा अतुल कुलकर्णीने मला त्यानं 'फॉरेस्ट गम्प'चं अॅडॉप्टेशन केल्याचं सांगितलं, तेव्हा माझी प्रतिक्रिया होती- या सिनेमाचा रिमेक करणार कोण? ऑस्कर मिळवलेला, लोकांनी भरभरून प्रेम दिलेला हा सिनेमा आहे. या सिनेमाचा रिमेक करणं अवघड आहे."
 
पण आता स्वतः आमिरच या चित्रपटाचा रिमेक करत आहे. फॉरेस्ट गम्पच्या रिमेक बनविण्यात आमिरला यश मिळालंय की नाही, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.
 
पण त्यानिमित्ताने याआधी झालेले हॉलिवूडमधल्या गाजलेल्या सिनेमांचे रिमेक, 'प्रेरणा घेत' बॉलिवूडनं केलेली नक्कल, नंतर कोरियन तसंच साउथ इंडियन सिनेमाकडे वळवलेला मोर्चा याचीही चर्चा सुरू झालीये. यातल्या काही रिमेकने भरभरून गल्ला कमावला तर काही सपशेल फसले...अशाच काही चित्रपटांबद्दल आपण जाणून घेऊया.
 
1. लायर लायर - क्यूँकी मैं झूठ नहीं बोलता
जिम कॅरीची प्रमुख भूमिका असलेल्या ''लायर लायर'ची हिंदी आवृत्ती होता गोविंदाचा 'क्यूँकी मैं झूठ नहीं बोलता'. या दोन्ही सिनेमांची कथा थोडक्यात अशी होती- पेशाने वकील असलेल्या नायकाला खोटं बोलायची सवय आहे. या सवयीला वैतागलेला त्याचा मुलगा आपल्या वडिलांची ही सवय सुटावी, त्यांनी खरं बोलावं म्हणून देवाकडे प्रार्थना करतो. त्याची ही प्रार्थना प्रत्यक्षात येते आणि मग नायकाच्या आयुष्यात सुरू होतो गोंधळ.
 
जिम कॅरीचं विनोदाचं टायमिंग अचूक आहेच, पण आपल्या शारिरीक लवचिकतेचा वापर तो ज्यापद्धतीनं करतो त्यातूनही विनोदनिर्मिती होते. सिनेमाची लांबी आटोपशीर आहे. शेवटचा कोर्टरूम ड्रामा आणि त्यानंतर फ्लेचरला (जिम कॅरी) आपल्या मुलाबद्दल झालेलं रिअलायझेशन या सगळ्याच गोष्टी विनोदाच्याच अंगाने मांडल्या आहेत.
 
गोविंदा आणि डेव्हिड धवन ही जोडगोळी क्यूँकी मैं झूठ नहीं बोलता साठी एकत्र आली होती. पण प्रेमकथा, मग थोडा फॅमिली ड्रामा, तोंडी लावायला व्हिलन, सत्य विरुद्ध असत्याची लढाई असा सगळा मालमसाला 'लायर लायर'च्या मूळ साच्यात भरला गेला आणि मग त्यातला निखळ विनोदच हरवला.
 
विशेष म्हणजे 'लायर लायर'ची मराठी आवृत्तीही निघाली होती. 'धांगडधिंगा' नावाच्या या सिनोमात महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
 
2. ब्रूस अलमायटी-गॉड तुस्सी ग्रेट हो
कामाच्या ठिकाणी सतत डावला जाणारा पत्रकार, अँकर, जो आपल्यावर होणाऱ्या 'अन्याया'साठी सतत देवाला दोष देत असतो. शेवटी एके दिवशी देव त्याला आपल्या शक्ती देतो. या शक्तींचा वापर करून तो आधी स्वतःच्या समस्या निस्तरायला जातो आणि मग त्याच्या हिशोबाने आजूबाजूच्या प्रश्नांवर उत्तरं शोधतो. पण खरंच त्यानं हे प्रश्न सोडवलेले असतात की अजून काही गोंधळ घालून ठेवलेले असतात?
 
ब्रूस अलमायटीमध्येही जिम कॅरीच नायक होता. देवाच्या भूमिकेत होते मॉर्गन फ्रीमन. याच्या हिंदी रिमेकमध्ये या भूमिका केल्या होत्या सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांनी.
 
मूळ भूमिकेत जिथे जिम कॅरी आहे, त्याजागी सलमान असणं हाच मुळात सिनेमाचा सगळ्यात कच्चा दुवा होता. त्यात सोबत सोहेल खानही...शिवाय ओव्हर ड्रॅमाटिक नायिका, जोडीला अर्थहीन गाणी या सगळ्यामुळे ओरिजिनल सिनेमाच्या आसपासही गॉड तुस्सी ग्रेट हो पोहोचला नाही.
 
3. फ्रेंच किस- प्यार तो होना ही था
काजोल आणि अजय देवगणचा 'प्यार तो होना ही था' 1998 मध्ये रिलीज झाला होता. पण हा सिनेमाही ओरिजिनल नव्हता... हा फ्रेंच किस या सिनेमाचं अॅडॉप्टेड व्हर्जन होतं.
 
आपला प्रियकर दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात आहे हे कळल्यावर नायिकेला त्याला परत आपल्याकडे आणायचं आहे. तिला विमान प्रवासाची भीती आहे, तरीही ती त्याच्यासाठी विमान प्रवास करते. या प्रवासात तिला एक चोर भेटतो...त्या दोघांना एकमेकांची गरज आहे. एकमेकांची मदत करता करता ते दोघं प्रेमात पडतात.... त्यांचा हा सगळा प्रवास या दोन्ही सिनेमात आहे.
 
फ्रेंच किसमधल्या मेग रायनचं कॅरेक्टर अगदी जसंच्या तसं काजोलनं साकारलंय. अनेक प्रसंग तर अगदी कॉपी पेस्ट आहेत.
 
त्या काळात अजय देवगणला मिशीमध्ये बघायची सवय नव्हती. पण 'फ्रेंच किस'चा हिरो जसा आहे, तसंच दाखवण्यासाठी अजय देवगणचा जवळपास निम्म्या चित्रपटात मिशीवाला लूक आहे.
 
इतक्या सगळ्या गोष्टी सारख्या असल्या तरी फ्रेंच किस खूप सहज वाटतो. पहिल्यांदा 'प्यार तो होना ही था' पाहिला तेव्हा आवडलाही असेल, पण आज पाहताना तो तितका आवडेल याची खात्री नाही....पण फ्रेंच किसचं मात्र आजही तितकाच गोड वाटतो.
 
4. अनफेथफुल- मर्डर
बोल्ड सीन्समुळे चर्चेत आलेला भट्ट कॅम्पच्या मर्डर सिनेमाचं मूळ आहे अनफेथफुल. रिचर्ड गेअर आणि डिअॅन लॅन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या अनफेथफुलचं मर्डरमध्ये बऱ्यापैकी भारतीयीकरण झालं होतं.
 
नवरा-बायको आणि मुलगा असं सुखी कुटुंब. पण तिच्या आयुष्यात एक मोहाचा क्षण येतो आणि मग सगळंच उलटंसुलटं होऊन जातं. एवढा चांगला संसार, देखणा आणि समजूतदार नवरा असं सगळं नीट असताना दुसऱ्या पुरूषाकडं आकर्षित व्हायचं कारण काय असा प्रश्न आपल्या प्रेक्षकांना पडू शकतो हे कदाचित दिग्दर्शक अनुराग बासूच्या लक्षात आलं असावं.
 
म्हणून मग आपल्या दिवंगत बहिणीच्या नवऱ्याशी तडजोड म्हणून लग्न केलेली नायिका, नवरा-बायकोच्या नात्यात आधीपासून असलेला तणाव अशी पार्श्वभूमी मर्डरमध्ये तयार केली होती.
 
शिवाय नायिकेला क्लीन चीट देण्यासाठी मूळ चित्रपटात नसलेला एक ट्वीस्टही अॅड केला होता. अर्थात, अनफेथफुलमधली बोल्ड दृश्यं मात्र मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मीमध्ये जशीच्या तशी चित्रीत केली होती.
 
दोन लोकांच्या नात्यात वरकरणी काहीच बिघडलेलं दिसत नसलं तरी मध्ये तिसरी व्यक्ती येऊ शकते. ते आकर्षण, त्यातून सुरू झालेला लपाछपीचा खेळ, अपराधभावना आणि तरी पुन्हा मोहाला शरण जाणं....जेव्हा ही फसवणूक समोर येते तेव्हा जोडीदाराची घालमेल, त्यातून उचलेलं टोकाचं पाऊल... हा अनफेथफुलचा गाभा होता. मर्डरमध्ये तो काही प्रमाणात आला होता. पण मूळ कथेला जोडलेल्या रहस्याचं ठिगळ विजोडच दिसत होतं.
 
5. स्टेप मॉम- वुई आर फॅमिली
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं 'स्टेप मॉम' या चित्रपटाचा अधिकृत रिमेक 'वुई आर फॅमिली' या नावानं केला होता.
 
ज्युलिया रॉबर्ट्स आणि सुझन सॅराँडन यांच्या भूमिका हिंदी व्हर्जनमध्ये करीना कपूर आणि काजोलनं केल्या होत्या.
 
आपल्याला दुर्धर आजार झाल्याचं कळल्यानंतर आपल्या नवऱ्याच्या प्रेयसीला आपल्या मुलांची जबाबदारी देऊ करणारी माया आणि आपल्याला ही जबाबदारी पेलेल का नाही या साशंकतेत असलेली श्रेया या दोघींची ही गोष्ट.
 
आपल्या माजी नवऱ्याच्या प्रेयसीला स्वीकारून तिला आपल्या आयुष्यातली सर्वांत मोठी जबाबदारी देणं हे एखाद्या बाईसाठी भावनिकदृष्ट्या कठीण असतंच. त्याचबरोबर आई नसताना आईपण निभावण्यासाठी तयार होणं हेही अवघडच. हा वेगळ्या वयांच्या, वेगळ्या विचारसरणीच्या दोन बायकांचा हा संघर्ष स्टेप मॉममधून दाखवला होता.
 
करीना आणि काजोल यांनीही ही घालमेल दाखवण्याचा प्रयत्न केला होता, पण मुळात करण जोहरच्या चित्रपटांप्रमाणे यातही पात्रं सशक्तपणे उभी करण्यापेक्षा सगळा जोर चकचकीतपणावरच होता...शिवाय हिट सिनेमाचा सगळा फॉर्म्युला रेडीमेड मिळालाच आहे, मग कथेवर पुन्हा नव्याने मेहनत वगैरे करण्यापेक्षा सिनेमाचा ग्लॅमर कोशंट वाढवण्यावरच जास्त कष्ट घेतले गेले. त्यामुळे प्रेक्षकांना त्या दोघींच्या भावनांशी जोडून घेताच आलं नाही.
 
6. वॉरिअर -ब्रदर्स
टॉम हार्डीची प्रमुख भूमिका असलेला वॉरिअर या चित्रपटाचा ऑफिशिअल रिमेक असं म्हणून अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्राचा ब्रदर्स हा चित्रपट झळकला होता.
 
अनेक वर्षांपासून भावनिकरित्या दुरावलेले दोन सख्खे भाऊ मिक्स मार्शल आर्टच्या स्पर्धेत उतरतात आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत हरवत ते दोघे फायनलला पोहोचतात. तिथे त्यांचा मुकाबला एकमेकांशी आहे. स्पर्धा कोण जिंकणार हा तर प्रश्न महत्त्वाचा आहे पण दोन्ही भावात असलेला दुरावा कमी होईल की या स्पर्धेमुळे तो आणखी टोकाला जाईल, या थिमवर या चित्रपट आधारलेला आहे.
 
वॉरिअरमध्ये असलेला सहजपणा, अॅक्शन सिक्वेन्स ब्रदर्समध्ये तर पाहायला मिळाले नाहीतच उलट मेलोड्रामाटिक करण्याच्या नादात ब्रदर्स बटबटित होऊन गेला. वॉरिअरचं खरं यश हे रिंगमध्ये असलेल्या फायटिंगमध्येच आहे पण त्याला दोन भावांच्या भावनिक नातेसंबंधाची किनार आहे.
 
ब्रदर्समध्ये या गोष्टी पाहायला नाही मिळाल्या परिणामी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही.
 
रिमेक, अॅडॉप्टेशनची ही यादी इथेच संपत नाहीये. कन्सेंटिंग अॅडल्टसवरून घेतलेला अब्बास-मस्तानचा अजनबी, नाइट अँड डे चा रिमेक असलेला ऋतिक रोशनचा बँग बँग, माय बेस्ट फ्रेंड्स वेडिंगचं भारतीय व्हर्जन असलेला मेरे यार की शादी है,
 
विल स्मिथच्या हिचवरून घेतलेला सलमान खानचा पार्टनर...अशी बरीच नावं आहेत.
 
रिमेक आणि अॅडॉप्टेशन हा एक भाग झाला, पण बॉलिवूडमधल्या सिनेमांचा 'based on' किंवा 'inspired by' असाही एक गट करता येईल.
 
1996 साली जूही चावलाचा 'दरार' सिनेमा आला होता. ईशा देओलचा कोई मेरे दिल से पूछे हे दोन्ही सिनेमे ज्युलिया रॉबर्ट्सच्या 'स्लीपिंग विथ द एनिमी'वर आधारित होते. यामध्ये ती आपल्या नवऱ्याच्या अत्याचाराला घाबरून पळून जाते आणि नवीन आयुष्याला सुरूवात करते. मात्र, तिचा नवरा परत येतो.
 
1934 साली प्रसिद्ध झालेला 'इट हॅपन्ड वन नाइट' हा एक क्लासिक सिनेमा म्हणून गणला जातो. या सिनेमावर बॉलिवूडमधले गाजलेले दोन चित्रपट बेतलेले आहेत. एक म्हणजे राज कपूर आणि नर्गिस दत्त यांचा 'चोरी चोरी' आणि दुसरा म्हणजे आमीर खान-पूजा भट्टचा 'दिल है की मानता नहीं'
 
ऋषी कपूर यांचा 'कर्ज'ही 'रिइन्कारनेशन ऑफ पीटर प्राउड'वरून बेतला होता.
 
या यादीतल्या सिनेमांचीही नावं बरीच लांबत जातील.
 
कोरियन-साउथ इंडियन सिनेमांचे रिमेक
हॉलिवूडमधल्या सिनेमांच्या रिमेकनंतर बॉलिवूडला हिट सिनेमांचा अजून एक हमखास फॉर्म्युला सापडला होता...तो म्हणजे कोरियन सिनेमे.
 
सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख असलेला एक व्हिलन हा 'आय सॉ डेव्हिल' या कोरियन सिनेमाचा रिमेक होता.
 
ऐश्वर्या राय आणि इरफान खानचा जज्बा, जॉन अब्राहमचा रॉकी हँडसम, अक्षय कुमारचा सिंग इज ब्लिंग, सलमान खानचा राधे हे अलीकडच्या काळातले कोरियन चित्रपटांचे रिमेक.
 
एकीकडे हॉलिवूड आणि कोरियन सिनेमा, तर दुसरीकडे आपल्याकडच्याच दक्षिण भारतीय भाषांमधल्या सिनेमांचेही रिमेक बॉलिवूडनं केले.
 
अगदी सुरूवातीला निर्माते 'प्रेरणा घेऊन'च्या नावाखाली फ्रेम टू फ्रेम सिनेमा कॉपी करायचे. मग नंतर नियम कठोर झाल्यानंतर अधिकृतपणे कॉपी राइट्स घ्यायला सुरूवात झाली.
 
सलमान खानचा बॅड पॅच संपविण्यात साउथ इंडियन सिनेमांचा रोल खूप महत्त्वाचा ठरला.
 
तेरे नाम (तमीळमधला सेतू), वॉन्टेड (तेलुगूमधील पोक्केरी), नो एंट्री (तमीळमधील चार्ली चॅप्लीन), क्यूँकी (मल्याळममधला थलावट्टम, रेडी (तेलुगूमधील रेडी), बॉडीगार्ड (मल्याळमध्येही बॉडीगार्ड) - सलमानचे हे सगळे चित्रपट रिमेक होते.
 
रिमेकचा फॉर्म्युला किती फायद्याचा?
गेल्या काही काळात दाक्षिणात्य चित्रपट हे डब करून प्रदर्शित केले जात आहेत. नेटफ्लिक्स, अॅमेझॉनसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर केवळ भारतीय किंवा हॉलिवूडचेच नाही, तर इतरही अनेक जागतिक चित्रपट पाहायला मिळतात.
 
त्यामुळेच आता रिमेकचा फॉर्म्युला भविष्यात फायद्याचा ठरणार का? मूळ चित्रपट आपल्या भाषेत किंवा इंग्लिश सबटायटलसह पाहण्याची सोय असताना लोक त्याचा रिमेक पाहणं किती पसंत करतील? असेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
ज्येष्ठ सिनेपत्रकार पराग छापेकर यांनी यासंदर्भात बीबीसी हिंदीसाठी एक लेख लिहिला होता.
 
या लेखात परसेप्ट पिक्चर्सचे बिझनेस हेड युसूफ शेख राय यांनी याबद्दल आपलं मत व्यक्त करताना म्हटलं होतं की, रिमेकसाठी राइट्स घेणं हे आता निरर्थक आहे.
त्यांनी आपलं हे मत दाक्षिणात्य चित्रपटांच्या संदर्भानं मांडलं होतं.
 
त्यांनी म्हटलं होतं, "आता साउथच्या सुपरहिट सिनेमांचा रिमेक कोण पाहणार? पुन्हा हे चित्रपट बनवून फायदा काय आहे? जर हे चित्रपट हिंदीमध्ये डब होऊन येत आहेत, तर ते पुन्हा त्याच भाषेत बनवण्याचं कारण काय आहे? हे लोक आपलं बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि बॅलन्स शीट पाहतात. त्यांना प्रेक्षकांशी काय देणंघेणं? 15 कोटींच्या कन्टेन्ट आणि सामान्य माणसाच्या गोष्टीनं कोट्यवधी कमावून दिले आहेत. पण मल्टिप्लेक्सची 150 कोटींची थिअरीही बदललीये. त्या प्रेक्षकांना आता नवीन काहीतरी हवं आहे. बॉलिवूडवाले आता बाहुबली आणि आरआरआरच्या स्केलचे चित्रपट बनवू शकत नाहीत.
 
युसूफ शेख याचं हे मत दाक्षिणात्य चित्रपटांसाठी असलं तरी ते इतर जागतिक चित्रपटांसाठीही लागू होऊ शकतं.
 
यावर्षी बॉलिवूडला भूल भुलैय्या वगळता कोणत्याही चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. त्यामुळे एकीकडे आमिरच्या लाल सिंह चढ्ढाकडून अपेक्षा आहेत, पण दुसरीकडे बॉलिवुडचा रिमेकचा इतिहास पाहता तो मूळ सिनेमाला किती न्याय देईल याचीही अनेकांना शंका आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती