राज्यसभेत मांडण्यात आलेल्या कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्यांना दहशतवादी म्हणून उल्लेख केल्याने अभिनेत्री कंगना रणौतवर टीका होत आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत कंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली असून मोदी सरकार आणि भाजपा नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली होती. दरम्यान कंगनाने नव्याने ट्विट करत आपण शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणालो असल्याचं सिद्ध केल्यास माफी मागून ट्विटर (Twitter)कायमचं सोडून देईल असं आव्हान दिलं आहे.
कंगनाने ट्विटमध्ये काय म्हटलं आहे-
“ज्याप्रमाणे श्रीकृष्णाची नारायणी सेना होती, त्याचप्रमाणे पप्पूची एक चंपू सेना आहे जी फक्त अफवांच्या आधारे लढते. जर माझ्या मुख्य ट्विटमध्ये मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं असल्याचं कोणी सिद्ध केलं तर माफी मागून कायमचं ट्विटर (twitter)सोडून देईन,” असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.