रिया-कंगना : महाराष्ट्रात कोरोना आल्यानंतर ड्रग्जचं सेवन वाढलंय का?

बुधवार, 16 सप्टेंबर 2020 (15:46 IST)
जान्हवी मुळे
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, त्याची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीला ड्रग्स तस्करीच्या आरोपांखाली झालेली अटक आणि अभिनेत्री कंगना राणावतनं ड्रग्स रॅकेटसंबंधी केलेली वक्तव्यं या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधल्या अंमली पदार्थांच्या समस्येनं पुन्हा लक्ष वेधून घेतलं आहे.
 
खरं तर व्यसनांच्या आहारी गेल्यानं सेलिब्रिटींची नावं अनेकदा चर्चेत आली होती.
प्रतीक बब्बरसारख्या अभिनेत्यानं तर ड्रग्जच्या विळख्यातून सुटण्यासाठी आपल्या संघर्षाविषयी खुलेपणानं लिहिलं होतं.
पण अंमली पदार्थांचा वापर किंवा व्यसन ही फिल्म आणि मॉडेलिंग इंडस्ट्रीपुरती समस्या नाही. नेमका हा प्रश्न किती गंभीर आहे? हे आम्ही व्यसन मुक्तीसाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या दोन तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.
मुक्तांगण या महाराष्ट्रातल्या आघाडीच्या व्यसन मुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर सांगतात की, "सेलिब्रिटीज दिसतात किंवा हा विषय बातम्यांमध्ये आहे म्हणून लोकांना वाटतं की हा इंडस्ट्रीमधला, उच्चभ्रू लोकांचा प्रश्न आहे, किंवा दारू हा फक्त गरीब घरांतला प्रश्न आहे. पण तसं नाही ना. आमच्याकडे सगळ्या आर्थिक स्तरांतून, लहान-मोठे, पुरुष स्त्रिया उपचारांसाठी येतात."
 
हा प्रश्न एका वर्गापुरता आणि मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांपुरता मर्यादित नसून औरंगाबाद, अहमदनगर अशा ठिकाणही अंमली पदार्थांचा प्रश्न गंभीर असल्याचं त्या सांगतात.
नागपूरच्या 'मैत्री' व्यसनमुक्ती केंद्राचे तुषार नातू त्याला दुजोरा देतात. "मौज मस्ती करताना कोकेन, हेरॉईन अशा हार्ड ड्रग्जचा वापर झाल्याच्या घटना याआधीही समोर आल्या आहेत. हे दोन्ही अंमली पदार्थ लैंगिक शक्ती वाढवतात असा गैरसमज आहे. पण या महागड्या ड्रग्सपेक्षा आपल्या देशात आणि राज्यातही गांजा आणि अफूच्या सेवनाचं प्रमाण अधिक आहे."
महाराष्ट्रात ड्रग्जची समस्या केवढी मोठी आहे?
भारतात नशेची समस्या किती गंभीर आहे, हे गेल्या वर्षी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं जाहीर केलेला हा अहवाल सांगतो.
त्यात देशात 16 कोटी म्हणजे सुमारे 14.6 टक्के लोक दारूचं सेवन करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. भारतात 3.1 कोटी लोक ओपियॉईड्स म्हणजे अफूजन्य द्रव्यांचं सेवन करतात तर कॅनाबिस म्हणजे गांजा किंवा भांग यांचं सेवन करणाऱ्यांचा आकडा 2.3 कोटी आहे.
तसंच इन्हेलंट हुंगून किंवा इंजेक्शनद्वारा सेवन केले जाणारे अंमली पदार्थ, सिडेटिव्ज किंवा वेदना शामक औषधं अशा वेगवेगळ्या द्रव्यांची नशा करणाऱ्यांची संख्याही लाखांमध्ये आहे.
 
यात ओपियॉईड आणि कॅनाबीसचं व्यसन असणाऱ्यांच्या संख्येचा विचार केला, तर भारतातील राज्यांत महाराष्ट्र पहिल्या पाचांत आहे. कोकेनची नशा करणाऱ्यांच्या बाबतीत देशात सर्वाधिक 90,0000 व्यक्ती महाराष्ट्रात आहेत, असंही हा अहवाल सांगतो.
कुठल्या पदार्थांचं व्यसन?
व्यसनाचं प्रमाण आणि प्रकार कसे बदलत गेले आहेत, हे मुक्ता पुणतांबेकर स्पष्ट करतात. "माझ्या आईबाबांनी 1986 साली मुक्तांगणची स्थापना केली, तेव्हा ड्रग्जची समस्या एखाद्या साथीसारखी पसरत होती. सुरुवातीला इथले 80 टक्के रुग्ण ड्रग अॅडिक्ट होते आणि वीस टक्के दारूच्या आहारी गेलेले होते. "
"आता प्रमाण उलटं आहे. पण तेव्हा मुक्तांगण पंधरा बेड्सचं होतं, आता ते दीडशे बेड्सचं आहे. म्हणजे प्रमाण घटलं असलं, तरी संख्या मात्र चिंताजनकच आहे.
"आधी 'ब्राऊन शुगर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरॉईनचं व्यसन हा गंभीर प्रश्न होता. पण आजकाल गांजाचं व्यसन जास्त वाढलं आहे. ही चिंतेची बाब आहे कारण गांजा थेट मेंदूवर आणि पर्यायानं मानसिकतेवर परिणाम करतो. स्मृतीभ्रंश, आक्रमकता, भास होणं अशी लक्षणं दिसतात."
 
कॉलेज तरुणांमध्ये हे प्रमाण वाढत चाललं असल्याचं निरीक्षण तुषार नातू नोंदवतात. "गांजाविषयी तरुण पिढीत अनेक गैरसमज दिसून येतात. इंटरनेटवर ते वाचतात की, अमेरिकेतल्या काही राज्यांत कॅनाबीसला कायदेशीर मान्यता मिळाली आहे आणि वैद्यकीय वापरासाठी गांजा विकत घेता येऊ शकतो.
"त्यामुळे लोक गांजाला सर्रास निरुपद्रवी वनस्पती मानू लागले आहेत. पण ते खरं नाही. अमेरिकेत इतर ड्रग्जचा सर्रास प्रसार झाल्यावर दगडापेक्षा वीट मऊ म्हणून गांजा विक्रीला परवानगी देण्यात आली. अर्थात त्यावरही निर्बंध आहेत," नातू सांगतात.
दारूचा वास तोंडाला येतो तसं गांजाचं होत नाही. त्यामुळे एखाद्यानं नशा केल्याचं त्याच्या घरच्यांच्या लक्षात येत नाही, छुपी नशा वाढत जाते, व्यसनाधीन झाल्यावर त्या व्यक्तीचं सगळं घरदारही अनेकदा उध्वस्थ होतं.
येत्या काळात ही समस्या आणखी गंभीर होईल अशी भीती या क्षेत्रातले मानसोपचारतज्ज्ञही व्यक्त करतात.
कोव्हिडनंतर व्यसनाधीनता वाढण्याची भीती
कोव्हिडची साथ, लॉकडाऊन, आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी अशा सध्याच्या परिस्थितीत ताणतणाव आणि मानसिक आजारांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. याच कारणांनी व्यसनाधीनतेची समस्या वाढवू शकते.
मुक्ता पुणतांबेकर सांगतात, "आपल्याकडे एक गैरसमज आहे, की तुम्हाला टेन्शन आलं आहे का, दारू प्या, नशा करा, टेन्शन कमी होईल. तुम्हाला आनंद हवा हे का, दारू प्या, तुम्हाला रिलॅक्स्ड वाटेल. या सगळ्या गैरसमजांमुळे वैद्यकीय मदत न घेता लोक नशेकडे वळतात. त्यामुळे अशा काळात व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे."
तुषार नातू यांच्या मते आपली वृत्ती आणि आनंदाची व्याख्याच बदलली आहे आणि आनंद म्हणजे नशा करणं असंच समीकरण बनलं आहे. "आसपासच्या मित्रमंडळींच्या दबावामुळे, हातातला रिकामा वेळ सकारात्मक गोष्टींत कसा गुंतवायचा हे न समजल्यानंही अंमली पदार्थांचा वापर वाढतो."
 
अंमली पदार्थांची सहज उपलब्धता व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकानंही बंद होती. तेव्हा व्यसनाधीनतेचं प्रमाण कमी झालं होतं, असं निरीक्षण दोघांनीही नोंदवलं आहे.
व्यसनाधीन लोक स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत, इतरांची काळजी घ्यायला हवी याचं भान त्यांना राहात नाही. मुक्ता सांगतात, "व्यसनाधीन व्यक्ती मास्क न घालणं, कुठेही जाणं, गर्दीत मिसळणं अशा गोष्टी करू शकतात, ज्यामुळे त्यांना कोव्हिडची बाधाही होण्याच धोका वाढतो. व्यसनानं त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते."
अशा रुग्णांना सांभाळणं, त्यांच्यावर उपचार करणं हे नशा मुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मोठं आव्हानच आहे.
 
कोव्हिड काळात व्यसनमुक्तीची कामं
कोव्हिडच्या काळात अनेक नशा मुक्ती केंद्र पुरेशा सुविधांअभावी, कर्मचारी नसल्यानं किंवा विलगीकरण करता येत नसल्यानं बंद ठेवावी लागली आहेत.
तुषार नातूंनीही नवी मुंबईतलं त्यांचं 'निर्धार' केंद्र बंद ठेवलं आहे. "कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार करणं सोपं नसतं. आमच्याकडे पेशंट आला तर आम्ही त्याची आधी टेस्ट करून घेतो. डॉक्टरांना दाखवतो. आणि त्याला इतर लोकांपासून दूर कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करतो."
 
मुक्तांगणमध्ये मोठी जागा आणि वेगवेगळे वॉर्ड्स असल्यानं विलगीकरण शक्य झालं आहे. पण कर्मचाऱ्यांना अनेक समस्यचा भेडसावत असल्याचं मुक्ता सांगतात.
"डॉक्टर्स आणि कर्मचारी मास्क आणि पीपीई किट घालून काम करतात पण चोविस तास तसं राहणं शक्य नाही. एखादा रुग्ण अचानक आक्रमक झाला, तर पीपीई किट घालण्याइतका वेळही मिळत नाही. आमचेही कर्मचारी त्यामुळे पॉझिटिव्ह आले आहेत. पण सुदैवानं कुणाला गंभीर लक्षणं नाहीत."
 
व्यसनांच्या विळख्यातून मार्ग कसा काढणार?
तुषार स्वतः ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडले होते आणि आता इतरांना त्यासाठी मदत करत आहेत. ते तरुणांना सल्ला देतात, "काही झालं, तरी मोहात पडू नका. मित्रांनाही नाही म्हणता आलं पाहिजे. चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचा पुरस्कार करा. विशेषतः लहान मुला-मुलींवर पालकांनीही नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे."
मुक्ता सांगतात, "सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बोला. मनात ठेवू नका. जितक्या नकारात्मक भावना मनात साठतील तितका त्रास वाढतो. तुम्ही हेल्पलाईनला फोन करू शकता, मित्रांशी बोलू शकता. घरच्यांवर चिडण्यापेक्षा त्यांच्याशी मोकळेपणानं संवाद साधला तर अशा गोष्टींकडे वळण्याची वेळही येणार नाही."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती