राज ठाकरे म्हणाले हा तर ट्रेलर आहे. गुढीपाडव्याला शिवतीर्थावर बाकीचा पिक्चर पाहायला मिळेल

बुधवार, 9 मार्च 2022 (21:35 IST)
हा तर ट्रेलर आहे. गुढीपाडव्याला शिवतीर्थावर बाकीचा पिक्चर पाहायला मिळेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. यावेळी आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल चढवला.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 16 वा वर्धापन दिन पुण्यात साजरा करण्यात आला. यावेळी राज ठाकरे म्हणाले, भाषण करायचं सोळा वर्ष पूर्ण होत आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद करतो. याच्या पुढची आपली वाटचाल आपण जोरात करु. सध्या राज्यात काय चालले आहे ते आपण पाहत आहोत, असे ते म्हणाले.
 
आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि सध्याचे राज्यातले राजकारण याविषयी राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. केवळ हे लोक जातीचे राजकारण करत आहेत. निवडणुकीचे वातावरण चढायचे आहे. मात्र, ओबीसीचे कारण देत निवडणुका पुढे ढकलत आहे. तीन महिन्यानंतर निवडणुका होतील, असे सांगितले आहे. मी सांगतो या निवडणुका होत नाहीत. जून महिन्यात पाऊस सुरु होतो. त्यावेळी हे निवडणुका घेणार आहेत का? निवडणुका  या दिवाळीनंतरच होतील. तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांत प्रशासक नेमायचा. यांचे सरकार आणि यांचा प्रशासक. हे सगळं यासाठीच आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
 
सध्या राज्यात विरोधी पक्ष म्हणतो हे आम्हाला संपावायला निघाले आहेत. तर सत्ताधारी म्हणात हे आम्हाला संपवत आहेत. आता शिल्लक कोण आहे, आपणच ना! आता आपण आपली वाटचाल जोरात करु. प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार येत असतात. आपल्यालाही याचा सामना करावा लागला आहे. आपण निवडणुकीला तयार आहोत. अजून अंगावर निवडणुकीचा जोर चढलेला नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती